पाण्यात वसली घुमडाई

Spread the love

प्रफुल्ल देसाई, मालवण

कोकण ही परशुरामाची भूमी  म्हणून ओळखली जाते. मात्र हा समज इथल्या निसर्ग सौन्दर्याने …इथल्या  झाडाझुडपात… दगड धोंड्यात  देवत्व प्राप्त केलेल्या गोष्टींमुळे खोटा ठरला अशी आजवरची परिस्थिती पाहिल्यावर वाटते. साऱ्यांच्याच  मनाला भुरळ घालणाऱ्या  निसर्ग सौंदर्यामुळे आज कोकण

विशेषत: सिंधुदुर्ग जिल्हा हा आकर्षण बिंदू राहीलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर निसर्ग सौंदर्याबरोबरच इथल्या धार्मिक पर्यटनालाही महत्व प्राप्त झाले. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात जी काही पुराण आणि जागृत देवालये आहे. त्यातील एक  जागृत देवस्थान म्हणून घुमडे येथील श्री देवी  घुमडाई मंदीर होय . 

दोन बाजूला हिरवेगार डोंगर त्यातच नारळ सुपारीच्या बागा, खळखळ वाहणारा ओढा आणि ओढ्याच्या काठी असलेले घुमडाईचे मंदिर व घुमडाईच्या  कृपाछत्राखाली वावरणारी घुमडे गावची साधीभोळी माणसं हे सार पाहिल्यानंतर परमेश्वराला भल्या पहाटे पडलेले सुंदर गावाचे स्थान म्हणजे घुमडे गाव तर नव्हे ना अशी शंका मनात आल्या वाचून राहत नाही.

मालवण येथून जाताना कुंभारमाठ येथून डावीकडे वळले की लागतो छोटेखानी घुमडे गाव. दोन  डोंगराच्या मध्ये वसलेल्या या गावात जाताना अनोळखी व्यक्तीला आपण दरीत तर जात नाही ना असेच काहीसे वाटते. मात्र या गावात प्रवेश केल्यानंतर समोरच दिसते ते ओहोळाकाठचे घुमडाई देवीचे मंदिर ! या  मंदिराच्या पाण्यात वसलेली घुमडाई आजही संकटग्रस्त भक्तांच्या हाकेला धावून जात जणू आशिर्वाद देत भक्तांना सांगते … भिक नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि श्रद्धावान भक्तही निर्धास्त मनाने आपल्या जीवनाची मार्गक्रमणा करतो तुमच्याकडे जर श्रद्धा असेल तर आणि तरच हे घडत !

घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई हीच्याविषयी जी आख्यायिका सांगितली जाते ती प्रचलित अशी आहे. एका ब्राम्हणाची गाय मालकास दूध न देता एका विशिष्ट ठिकाणी म्हणजे झाडा झुडपात जावून पान्हा सोडायची. हा प्रकार गावातील बिरमोळे नावाच्या गृहस्थाने पाहिले. दररोज गाय येवून ठराविक ठिकाणीच पान्हा का सोडते याविषयी त्याच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. त्या उत्सुकतेपोटी त्याने पाच सात फुट जमिन खोदली. अगोदरच ती जागा पाणथळ  असल्यामुळे त्याठिकाणी पाणी मिळाले, आणि त्या पाण्यात एक स्वयंभू पाषाण सापडले. याच पाषाणावर ती गाय पान्हा सोडायची

याचा अंदाज बिरमोळे नामक गृहस्थास आला. त्याने हात जोडले आणि ही गोष्ट ग्रामस्थाना सांगितली. घुमडे गावात पाषाण सापडले म्हणून  त्याचे नामकरण झाले घुमडे गावची आई म्हणजे घुमडाई. आजही घुमडाई देवी ही पाण्यात प्रकटलेली देवी म्हणून भाविक मोठ्या श्रध्देने या स्थानाला भेट देतात. हळूहळू गावच्या लोकांनी या पाषाणावर कौलारू छपराचे मंदिर उभे केले. १९५८ साली घुमडे गावच्यामंदिराचा जिर्णोध्दार करण्याचे ठरविले. प्रत्येकाच्या मनात हा विचार आला मात्र हा विचार कोणी बोलून दाखवत नसत. आणि २००४ साल उजाडले. घुमडे ग्रामस्थ मंडळ आणि या गावचे सुपुत्र श्री दत्ता सामंत यांनी मंदिराचा जिर्णोध्दार करण्याचा संकल्प ग्रामस्थांच्या सभेत सोडला. या गावातील लोकांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय हा फळे फुले सुपाऱ्या विकणे एवढाच आहे. या लोकांच्या देणगीतून…. भाविकांनी दिलेल्या देणगीतून मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम सुरू झाले आणि २०११ साली सुमारे १ कोटी रूपये खर्चाचे सुरेख आणि देखणे  मंदीर उभे राहिले आहे.  पर्यटनातून या गावचा विकास साघताना निसर्गसौंदर्य लाभलेल्या या गावात देशी विदेशी पर्यटक या गावाकडे कसे वळतील याचा विचार आज घुमडे ग्रामस्थ मंडळ करीत आहे. या मंदिरात गुढीपाडवा, रामनवमी, नारळी पौर्णिमा, ऋषीपंचमी, गौरीपूजन, घटस्थापना, दसरा, तुळसीविवाह, त्रिपुरारी पौर्णिमा, , मार्गशीर्ष एकादशीला देवी घुमडाईचा दहीकाला उत्सव, होळी, देवीचे निशाण मिरवणूक आदी सण ब उत्सव साजरे केले जातात.

 *श्री घुमडाई देवी मंदिराचे बांधकाम हे तिसऱ्या वेळी करण्यात आले आहे. अशी तिन्ही बांधकामे पाहणारी माणसे आज अस्तित्वात आहेत. पहिले नळ्याचे त्यानंतर कौलारू आणि आता स्लॅबचे, परंतु प्राचीनकाळी जेव्हा बांधकाम करण्यात आले तेव्हा फक्त चार खांबाचे होते. चार खांबावर छप्पर होते. कालांतराने या मंदिराची जागा गावकऱ्यांना कमी भासू लागली. त्यावेळी गावकऱ्यांनी मंदिराची जागा वाढविण्याचे व जीर्णोद्धार करण्याचे ठरविले. देवीचा कौल घेण्यात आला. माझे चार खांबांची जागा बदलता येणार नाही असा कौल आला. म्हणूनच मंदिराचा ज्या ज्या वेळी जीर्णोद्धार करण्यात आला त्यावेळी कौल घेतला गेला. चार खांबांची जागा न बदलत तुम्ही मंदिरात बदल करा असा निर्णय होत गेला. त्यामुळेच खार खांबाचे महत्व वाढत गेले. २०११ साली मंदिराच्या जीर्णोद्धाराचे बांधकाम करण्यात आले त्यावेळी सुद्धा खांबांची जागा होती तीच ठेवली, त्यात बदल केला नाही. चार खांब म्हणजे गाभारा, या भागात अजूनही मोठ्याने बोलले जात नाही