वाडातर या खाडीने देवगड तालुक्याचे दोन भाग केले आणि हिरव्यागार खाडीकिना-याने निसर्गसौंदर्यात आणखी भर घातली. पडवणे, विजयदुर्ग, मिठमुंबरी, कुणकेश्वर, तांबळडेग येथील मुलायम, सोनेरी, पांड-या शुभ्र वाळूचे समुद्र किनारे, शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले देवगड-विजयदुर्ग किल्ले, विमलेश्वर, लिंगेश्वर, रामेश्वर, कुणकेश्वर, पावनाई, ब्रह्मदेव, ब्राह्मण देव, गणपती, दत्त, गजाबादेवी, दिर्बादेवी, खवळे गणपती इ. प्राचीन मंदिरे प्रत्येक घरासमोर असलेले तुळशी वृंदावन, शेणाने सारवलेली अंगणे, चौसोपी घरे, आमृता सारखी मालवणी बोली, माडासारखी मोठया मणाची माणसे, सर्वत्र आढळणा-या फणस, काजू, चिकू, जग प्रसिध्द हापूस आंब्याच्या बागा, किना-यावरील सुरूची बने, खाडी किनारी आणि गावोगावी असणा-या माडा-पोफळीच्या रांगा या डोळयांची पारणी फेडणा-या गोष्टींचा विचार करता ही भारताची स्वर्ग भूमीच आहे असे मानन्यास हरकत नाही.
विजयदुर्ग-देवगड ही विजयी देशभूमी आहे.परशुरामाने वसविलेली ही पावन भूमी आहे. विजयदुर्ग-देवगड नावातच सर्व काही आहे.देवगड तालुक्याला आध्यात्मिक, साहित्यीक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक वारसा आहे. याचे येथे पदोपदी प्रत्यंतर येते. या तालुक्यातील प्रत्येक गाव हे पर्यटन स्थळच आहे.
निपाणी-राधानगरी-फोंडाघाट-नांदगाव-देवगड म्हणून जो राज्यमार्ग ओळखला जातो, तो देवगडला ज्या ठिकाणी संपतो तेच देवगड बंदर होय. देवगड एस.टी. स्थानकापासून 2 कि. मी. अंतरावर देवगड बंदर आहे. स्थानकावरुन बंदराकडे जाताना देवगड शहरातूनच जावे लागते. वाटेत पूर्वेला आनंदवाडी जेटी तर पश्चिमेला देवगड समुद्र किनारा लागतो. येथे उत्तम रस्ता असल्याने पायीच फिरणे उत्तम. सुमारे 1 कि.मी. लांबीच्या खाडीच्या किना-यावरुन रस्ता गेला आहे. वाटेत हिरवीगार झाडी, वेडी वाकडी वळणे, मच्छिमारी नौकांची ये- जा, खाडीतील लहान लहान लाटा, नौकांची गर्दी आणि मच्छिमारांची वर्दळ हे दृश्य अतिशय सुरेख आहे
देवगड किल्ला
देवगड एस. टी. बस स्थानकापासून 2 कि.मी. अंतरावर देवगड किल्ला आहे. अर.बी. समुद्र, आनंदवाडी जेटी आणि वाडातरखाडी यांच्या संगमावर उभ्या असलेल्या देवगड किल्ल्यावरुनच या शहराला देवगड हे नांव देण्यात आले आहे. इ.स. 1705 साली बांधण्यात आलेल्या या सुंदर किल्ल्याच्या उभारणीत कान्होजी अंग्रे यांच्या मुलाचा हातभार लागला. सुमारे 120 एकर एवढया विस्तृत क्षेत्र फळामध्ये पसरलेल्या या किल्ल्याचा उपयोग प्रामुख्याने टेहळणी केंद्र म्हणूनच केला जात असे. दि. 7 एप्रिल 1818 रोजी या किल्ल्याचा ताबा इंग्रजांतर्फे कर्नल इम्लाकने घेतला. या किल्लयावर फारशा घडामोडी घडलेल्या आढळत नाही. हा किल्ला अद्याप सुरक्षीत आहे.
किल्ल्यावरील बुरुजापर्यन्त मोठा पुरातन रस्ता असून तो हल्ली डांबरी केला आहे. आतील पायी जाण्यासाठी रस्ताही उत्तम आहे. या किल्ल्यावर पुरातन श्री गणेश मंदिर, इ.स.1915 साली बांधलेले दिपगृह तसेच तीन तोफा आहेत. प्राचीन इमारती नसल्यातरी येथे काही शासकीय इमारती आहेत. किल्ल्यावरुन अथांग सागराचे सौंदर्य, आनंदवाडी जेटी वाडातर वाडी व खाडीवरील पुल सूर्यास्त, देवगड शहर, देवगड बीच, पवनचक्क्या पाहणे अप्रतिम म्हणावे लागेल. उत्तरेकडील फणसे-पडवण्याचा सदाहरितडोंगर पाहताना भान हरवून जाते.देवगड किल्ल्यावर अतिशय जाज्वल्य, मांगल्यमय अशा स्वयंभू श्री गणेशाचे मंदिर आहे. येथे भाविकांची सतत गर्दी असते. मच्छिमार आणि गाबित समजाचे हे श्रघ्दास्थान आहे. येथे मारुती मंदिर सुध्दा आहे.
देवगड बंदर
देवगड बंदराचे उद्घाटन दि. 3 मे 1958 रोजी झाले. पूर्वी या बंदराला वैभवशाली दिवस होते. सागरी मार्गाने कोकणचे प्रवेशव्दारच म्हणण्यास हरकत नाही. पूर्वी गुजरात, मुंबई, गोवा, मंगलोरहून येथे मालवाहतुक चाले. धान्य, पेट्रोल, रॉकेल,मसाल्याचे पदार्थ, लाकूड कौले, मीठ इ. माल घेऊन शिडाची तसेच यांत्रिक मोठमोठी जहाजे येत असत. तसेच पणजी, मुंबई अशी देवगड मार्गे प्रवासी वहातुकही चाले. रत्नागिरी ते सावंतवाडी आणि देवगड ते कोल्हापूर-सांगलीसाठी हेच बंदर जवळचे आणि सुरक्षित होते. ही वाहतुक म्हणजे कोकण विकासाच्या नाडयाच होत्या. परंतु आता वहातुकीची अन्य साधने उपलबध्द झाल्यामुळे तसेच प्रवाशी वहातुक तोटयात आल्यामुळे या बंदारातून होणारी सर्व प्रकारची वहातुक सध्या बंद आहे.असे असलेतरी देवगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले हे बंदर नैसर्गिकरित्याच मच्छिमारीसाठी अतिशय सुरक्षित असल्याने मच्छिमारी व्यवसायासाठी या बंदराचा उपयोग मोठया प्रमाणात केला जातो. वेळप्रसंगी शिडाच्या तसेच यांत्रिक अनेक छोटया- मोठया नौका, होडया, पाती, ट्रालर,गलबते या बंदराचा आश्रय घेतात. मच्छी हंगामात देवगड समुद्रात मिळणा-या मच्छीची लिलाव पध्दतीने खरेदी-विक्री येथेच केली जाते. यामुळे या व्यावसायातील हे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे.
मच्छिमारी व्यवसायासंबंधित येथे चार सहकारी संस्था आहेत. सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहकार्यातून संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील सर्व सोयीनी युक्त, अतयाधुनिक मच्छिमार बंदर म्हणून आनंदवाडी जेटी नावाने देवगड बंदर विकसित होत असून त्यासाठी शासनाने कित्येक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे देवगडचा विकास होणार आहेच, शिवाय मच्छिमारी व्यवसायाबाबतही देवगड जगाच्या नकाशावर येणार आहे.
देवगड समुद्र किनारा (बीच) झिप लाईन
देवगड एस. टी. बस स्थानकापासून 1 ।। कि.मी. अंतरावर देवगड शहरानजीक, देवगड पवन प्रकल्प आणि देवगड किल्ला-दीपगृह-बंदर यांच्या मध्ये देवगड समुद्र किनारा आहे. हा समुद्र किनारा फार विस्तीर्ण नसला तरी दोन डोंगरांच्या मध्ये निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. पांढरी शुभ्र आणि स्वच्छ वाळू नजर खिळवून ठेपते. पश्चिमेला निळा अथांग समुद्र, पूर्वेला सुरूचे बन, दक्षिण बाजूला डोंगरावर पवनचक्क्या, तर उत्तरेला देवगड दीपगृह असा रम्य परिसर आहे. येथील सूर्यास्त पहाणे हा एक अवर्णनीय क्षण आहे.येथपर्यंत जाण्यास उत्तम डांबरी रस्ता आहे.
आनंदवाडी जेटी
देवगड एस.टी. स्थानकापासून 1 किमी. अंतरावर देवगड जुने बंदर आणि देवगड गाव यांच्यामध्ये असणा-या खाडीत, अतिशय अत्याधुनिक जेटीचे काम चालू आहे. हा देवगडचा एक भाग आनंदवाडी या नावाने ओळखला जातो. म्हणून हिला आनंदवाडी जेटी म्हणतात. सध्या मासळीचा लिलाव येथेच होतो. तसेच बिगर हगामात येथे मच्छिमारी नौका बाहेर काढून अथवा नांगरून ठेवल्या जातात. येथे सुरमई, झिंगा/कोळंबी, पापलेट, सरंगा, रिबन फिश, म्हाकूल, स्फटल फिश या जातीचे मासे मोठया प्रमाणात मिळतात.मोठया मच्छिमारी बोटी खाडीत थांबून त्यातील मासळी लहान-लहान होडयांनी/पातींनी किनारी आणणे, लहान होडीतील मच्छी हाताने टोपलीतून किना-यावरील वाळूवर आणणे, त्यांची लिलाव पध्दती, त्या अन्ाुषंगाने येथील इतर व्यवसाय हे मच्छिमारी हंगामात दररोज चालणारे दृश्य पहाण्यासारखे आहे. मच्छिमार हंगामात (ऑक्टोबर ते मे ) दररोज सायेकाळी 4 ते रात्री 8 पर्यंत येथे अवश्य भेट द्यावी.
मात्र ही पारंपारीक मच्छिमारी पध्दत आता बदलणार आहे. दहाव्या पंचवार्षिक योजनेत कोकण किनारपटटीपरील 720 कि.मी. अंतरातील महत्वाच्या बंदराचा विकास करण्याचा राज्य सरकारने इ.स.2006 मध्ये निर्णय घेतला आहे. त्यात देवगड येथील आनंदवाडी जेटी चा समावेश आहे. सेंट्रल इन्स्टिटयुत ऑफ कोस्टल इंजिनियरींग फिशरीज, बेंगलोर या संस्थंने इ.स. 1983 मध्ये या ठिकाणी पहाणी करून 185 दशलक्ष अंदाजित ख्ार्चाचा अहवाल बनविला होता. आता तो अंदाजित खर्च दुप्पट झाला आहे. सध्या या साठी शासनाने 30 कोटी रूपयाची तरतूद केली असून यात केंद्र सरकारचा 50% वाटा आहे. हा एक मॉडेल प्रोजेक्ट म्हणून केला जात आहे.येथे 250 हून अधक ट्रॉलर्स असून तितक्याच पाती मत्स्य व्यवसायात गुंतल्या आहेत. दोन पर्सिनल नेट ट्रॉलर्सही आहेत. येथे स्थानिक आणि बाहेरचे मिळून 10 ते 15 हजार लोकांची वस्ती आहे. हे सर्व या व्यव् येथे वार्षिक सरासरी 10 ते 15 लाख टन मत्स्य उत्पादन केले जाते. देवगडमध्ये चार मत्स्य सहकारी संस्था आहेत.या आनंदवाडी जेटी प्रकल्पामध्ये मच्छी उतरवून येण्यासाठी धक्क्याची निर्मिती, बोटी नांगरणे आणि शाकारणे यासाठी स्वतंत्र धक्के आणि त्यासाठी सुविधा, मत्स्य प्रक्रिया केंद्रे, विक्री केंद्रे, शीतगृह, प्रशिक्षण केंद्रे, अग्निशामक यंत्रणा, दूरवाणी केंद्रे, नांगरणी धक्के, बोटी बाहेर काढण्यासाठी धक्के, इंजिन दुरूस्ती, मळनि:सारण केंद्रे, पॅकेजिंग युनिट, बर्फ निर्मिती कारखाना, मत्स्य साठवणूक केंद्र, कॅनिंग, फिश मिल प्लँट, फिश ऑईल निर्मिती कारखाना, जाळे विणणे आणि दुरूस्ती करणे, बोट बांधणी आणि दुरूस्ती कार्यशाळा, रेडिओ, दळणवळण, देखभाल, दुरूस्ती कार्यशाळा, विश्रांती गृहे, इंधन सुविधा, पार्किंग सुविधा, स्वच्छता गृहे, अप्रोच रेड आणि अंतर्गत वहातूक, इलेक्ट्रीक पॉवर हाऊस, विविध कार्यालये इ. सोयी असणार आहेत. येथे जलतरण सुविधा उपलब्ध होणार आहे.येथील देखावा अप्रतिम आहे. हा भारतातील पहिलाच अत्याधुनिक प्रकल्प होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पर्यटकांना गोवा किंवा जम्मू-काश्मिरला मुळीच जावे लागणार नाही.
पवन विद्युत प्रकल्प (पवनचक्क्या)
व्हॅक्स म्युझियम, कंटेनर सिनेमा, वाॅटर स्पोर्टस हे सुरु करण्याबरोबरच पंचतारांकित असलेला क्लब महिंद्राचा हॉटेल प्रकल्प देवगडमध्ये येत आहे. १६० एकरमध्ये हा प्रकल्प होणार आहे. या तालुक्यात फळबागायती आणि शेतीलाही प्राधान्यक्रम असून पर्यटन विकासामुळे याही क्षेत्राला उभारी मिळणार आहे. तसा प्रयत्न आम. नितेश राणे सातत्याने करित आहेत.
————————————————————————————