जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटातील आंबोलीत आजवर अनेक प्राणी व पक्ष्यांच्या दुर्मीळ प्रजाती आढळून आल्या आहेत. त्यामुळे वन्यप्राणी अभ्यासकांसाठी आंबोली हे अभ्यास केंद्र ठरू लागले आहे. पश्चिम घाट हा जैविक संपत्तीचा मोठा साठा आहे. खरोखर त्याच्या अंतरंगात अगणितता आहे. त्याची निर्मितीच मुळी ज्वालामुखीतून प्राचीन काळी झालेली होती. याचे अनेक पुरावे दृष्टोत्पत्तीस येतात.
औषधी गुण असलेल्या अनेकविध वनस्पती पश्चिम घाटात आहेत. आंबोलीच्या नितांत रमणीय प्रदेशातील राखीव जंगल हे देशी-परदेशी विद्यार्थ्यांचे संशोधनाचे स्थळ आहे. या जंगलात सरडा, कोळी, बेडूक यांच्या विविध प्रकारच्या दुर्मीळ प्रजाती आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२० ते २२५ प्रजातीची फुलपाखरू आहेत. आंबोली आणि पारपोली भागात २१८ प्रजातीची फुलपाखरू आढळतात काही दिवसांपूर्वी अशाच अभ्यास दौ-यावर आलेल्या गिरीश पंजारी यांना या भागात दुर्मीळ ‘ब्राऊन पाम सिव्हेट’ हा रानमांजर प्रजातीतील प्राणी आढळून आला. केरळ-कर्नाटक येथील जंगलात दिसणारा हा प्राणी आंबोलीत आढळल्याने प्राणीप्रेमींमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. या प्राण्याचा अधिक शोध घेताना त्याचे अनेक साथीदार गेल्या कित्येक वर्षापासून राहत असल्याचे लक्षात आले. यापूर्वीही आंबोलीतील जंगलात ‘कॅस्टोज कोरल स्नेक’ ही दुर्मीळ सापाची प्रजाती आढळली होती. ‘उडता सोनसर्प’ आणि ‘ब्लू नवाब’ हे फुलपाखरू याच भूमीत आढळते. ब्राऊन पाम सिव्हेट हा उदीर-मांजरांसारखा प्राणी महाराष्ट्रात प्रथमच आढळून आला आहे. वडासारख्या वृक्षांवर फळे खाणारा हा प्राणी रानमांजरसदृश आहे.
महाराष्ट्रातून गिधाडांच्या अनेक प्रजातींची नोंद असली, तरी ‘पांढऱ्या पुठ्ठ्याची’, ‘लांब चोचीची’ आणि ‘पांढरी गिधाडे’ १९९० आणि त्यापूर्वी मोठय़ा संख्येने आढळत होती. गिधाडांमधील अशाच एका दुर्मीळ प्रजातीची नोंद आंबोलीतून करण्यात आली आहे. हौशी पक्षीनिरीक्षकांना ‘इजिप्शिअन गिधाड’ दिसले. आंबोली या जैववैविध्याने समृद्ध गावात नवीन संवर्धन मोहीम सुरू होत आहे. या गावात आढळणाऱ्या वाघ्या बेडकाला (आंबोली टोड) वाचविण्यासाठी गावकरी एकत्र आले आहेत. जगात केवळ आंबोलीत आढळणाऱ्या या बेडकाच्या संवर्धनासाठी गावकरी अनेक उपक्रम राबविणार आहेत. हवामान बदल, रानावनातील वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे बेडकाचा अधिवास नष्ट होत आहे. पश्चिम घाटात बेडकांच्या अनेक प्रजाती आढळत असून, यातील काही प्रदेशनिष्ठ म्हणजेच पृथ्वीतलावर केवळ त्याच भागात आढळतात. आंबोली टोड, स्थानिक भाषेत वाघ्या बेडूक हे यांपैकीच एक! वन्यजीव अभ्यासक वरद गिरी आणि एस. डी. बिजू यांनी २००९मध्ये आंबोली टोड या बेडकाचा शोध लावला. गेल्या काही वर्षांत या बेडकाचा अधिवास धोक्यात आला आहे. आंबोलीची ओळख असलेले हे बेडूक दुर्मीळ होऊ नये, यासाठी आंबोलीत काम करणाऱ्या मलबार नेचरक्लबने गावकऱ्यांच्या सहभागातून बेडकाचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात मलबार नेचर कॉन्झर्व्हेशन संस्थेचे काका भिसे, फुलपाखरांचे अभ्यासक हेमंत ओगले यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. बेडकाला वाचविण्यासाठी गावकऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या मोहिमेसाठी पुण्यातील ग्रीन फाउंडेशनचे सचिन नायर यांनी आर्थिक मदत केली आहे. आंबोली टोड हा प्रदेशनिष्ठ बेडूक असून, दुर्मीळ आहे. आंबोलीतील सड्यांवरच तो आढळतो. तेथील ठरावीक दगडांवरच त्यांचे वास्तव्य असते.जगात मोजक्या संख्येने असलेली ही प्रजाती वाचविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकतेच घोषित झालेल्या ‘आंबोली-दोडामार्ग संवर्धन राखीव वनक्षेत्रा’त दुर्मीळ ‘लाजवंती’ म्हणजेच ‘स्लेंडर लोरीस’ प्राण्याचे दर्शन घडले आहे. शनिवारी रात्री स्थानिक निसर्गप्रेमींना हा प्राणी आढळून आला. लाजवंती’ हा माकड कुळातील एक दुर्मीळ प्राणी आहे. केवळ भारत आणि श्रीलंकेतील घनदाट जंगलांमध्ये हा प्राणी आढळतो. पश्चिम घाटाच्या जंगलामध्ये ‘लाजवंती’चे वास्तव्य असून घाटाच्या उत्तरेकडील सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत या प्राण्याचे अधिवास क्षेत्र मर्यादित आहे. निसर्गभ्रमंतीदरम्यान ‘लाजवंती’ हा प्राणी आढळून आल्याची माहिती संजय सावंत दिली. या प्राण्याचे छायाचित्र टिपण्यात यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ‘लाजवंती’चा अधिवास आंबोली ते तिलारी दरम्यानच्या परिसरातील जंगलाचे जैविकदृष्ट्या महत्त्व अधोरेखित करत असल्याचे अमित सुतार यांनी सांगितले. ‘लाजवंती’ निशाचर असून तो अत्यंत हळू हालचाल करतो. हुबेहूब एखाद्या लहान मुलासारखा दिसत असल्यामुळे त्याला ‘वनमानव’ देखील म्हटले जाते. ‘वन्यजीव संरक्षण कायद्या’अंतर्गत या प्राण्याला प्रथम श्रेणीचे म्हणजेच वाघाच्या दर्जाचे संरक्षण मिळाले आहे. लाजवंतीचा आकार ४० सेंटीमीटर असून त्याचे वजन १८० ग्रॅम असते. अत्यंत दुर्मीळ असणाऱ्या ‘लाजवंती’ प्राण्याचा प्रत्येक अवयव हा अत्यंत औषधी असल्याचा प्राणी तस्करांचा समज आहे. त्यामुळे या प्राण्याला वन्यजीवांच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. तसेच जादूटोणा, करणी यासाठी तांत्रिक मांत्रिकांकडून या प्राण्याला मोठी मागणी असल्याची चर्चा आहे. तामिळनाडूमध्ये अशाच प्रकारे या प्राण्याची तस्करी आणि शिकार झाल्यामुळे झपाट्याने त्यांची संख्या कमी झाली आहे.
एखादा सजीव प्राणी लोप पावणं ही दुर्मिळ घटना आहे, असंही वाटू शकतं. प्रत्यक्षात नामशेष होण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू असते आणि विश्वास बसणार नाही, इतक्या वेगाने ही प्रक्रिया सुरू आहे. पृथ्वीवर नेमक्या किती प्रजाती आहेत, याची निश्चित आकडेवारी माहिती नसल्यामुळे त्यापैकी दरवर्षी किती लोप पावतात, याचा नेमका आकडा सांगता येत नसल्याचं WWF चं म्हणणं आहे. (लेखक मुख्यमंत्रांचे माजी माहिती अधिकारीआहेत )
————————————————————————————–