Spread the love
आरवली गावांचा देव वेतोबा

आजगाव आणि आरवली गावांचा देव वेतोबा

वेताळ-हिंदूंच्या देवताविश्वातील एक शिवगण आणि भूतप्रेत- पिशाचांचा अधिपती. भूतनाथ हे त्याचे एक पर्यायी नाव. आग्यावेताळ, ज्वालावेताळ आणि प्रलयवेताळ ह्या नावांनीही तो ओळखला जातो. महाभारत, पुराणे इ. प्राचीन साहित्यातून वेताळाची जी वर्णने आढळतात, त्यांनुसार तो क्रूर डोळ्यांचा आणि महाकाय आहे; तो रक्तमांस खातो; सदैव युद्धोद्यत आणि शस्त्रधारी असतो; वेताळाची आई ही स्कंदानुचारी मातृका असून स्वतः वेताळही स्कंदानुचर आहे, असे निर्देश आढळतात. भागवत, मत्स्यपुराण आणि ब्रह्मांडपुराण  ह्यांनी मात्र त्याला स्कंदानुचर न म्हणता शिवगण म्हटले आहे. आग्यावेताळ, ज्वालावेताळ आणि प्रलयवेताळ ही त्याची पर्यायी नावे त्याचे उग्र गुणविशेष दर्शवितात. 

शिवपुराण शतरुद्रसंहितेत   म्हटले आहे, की वेताळ हा मुळात शंकरपार्वतीचा द्वारपाल होता. एकदा दारापाशी आलेल्या पार्वतीला त्याने दाराबाहेर येण्यास अटकाव केला, म्हणून ‘तू पृथ्वीवर मनुष्यजन्म घेशील’ असा शाप तिने त्याला दिला. तेव्हा वेताळरुपाने तो पृथ्वीवर आला. कालिकापुराणात  म्हटले आहे, की वेताळ हा पूर्वजन्मी भृंगी नावाचा एक शिवदूत होता. महाकाल नावाचा त्याचा एक भाऊ होता. पार्वतीने शापिल्यामुळे ह्या दोघांनी पृथ्वीवर अनुक्रमे वेताळ व भैरव म्हणून चंद्रशेखर राजाची राणी तारावती हिच्या पोटी जन्म घेतला. तथापि हे दोघे चंद्रशेखराचे औरस पुत्र नव्हते. ते तारावतीला शंकरापासून झाले होते. चंद्रशेखर हा त्यांचा पालक-पिता होता. चंद्रशेखराने आपली सर्व संपत्ती आपल्या औरस पुत्रांमध्येच वाटून टाकली. त्यामुळे वेताळ व भैरव हे तप करण्यासाठी अरण्यात गेले. पुढे वसिष्ठ ऋषींच्या कृपेने त्यांना शिवाचे दर्शन घडले आणि कामाख्या देवीच्या अनुग्रहाने त्यांना शिवगणात स्थान मिळाले. 

आजगाव गावांचा देव वेतोबा

अनेक गावांत एक ग्रामदेवता म्हणून वेताळाची पूजाअर्चा केली जाते. वेताळाच्या मूर्ती काष्ठाच्या वा पाषाणाच्या असतात. काही ठिकाणी तो तांदळ्याच्या स्वरुपातही आढळतो. हातात दंडा आणि खांद्यावर घोंगडी घेऊन वेताळ मध्यरात्री गावातून हिंडतो, असा खेडोपाडी समज आहे. ह्या भ्रमंतीमुळे त्याचा वहाणा झिजतात; म्हणून वेताळाला दरमहा नव्या वहाणा अर्पण करण्याची प्रथाही काही ठिकाणी दिसते. भूत उतरवण्यासाठीही ग्रामीण भागांत वेताळाला आवाहन केले जाते. वैशाख,मार्गशीष आणि माघ महिन्यांत वेताळाचे उत्सव व जत्रा होतात.   

वेगवेगळ्या प्रांतांची संस्कृती म्हणजे हजारो वर्षे भारतात दृढमूल होऊन राहिलेल्या पवित्र भारतीय संस्कृतीचा अखंड वाहता प्रवाह आहे. परंतु गावागावांचा इतिहास कोणी लिहून ठेवला नाही. निसर्गसंपन्न कोकण नररत्नांची खाण आहे. त्या पुण्यभूमीतील खेड्यांनाही  प्रवाही इतिहास आहे. तो लिहिला गेला पाहिजे.ती गावे ग्रामदेवतांच्या व अन्य देवदेवतांच्या अधिपत्याखाली शतकानुशतके चालत आली आहेत. त्या गावांचा इतिहास हा मुख्यत: देवस्थानांचा इतिहास होय. मानापमान व न्यायदान या सर्व बाबतींत देवस्थानांचा अधिकार श्रेष्ठ होता. आता राजकारणी, पुढारी, ह्यांचे वर्चस्व असू शकते, पण आजही पुरातन दैवी कायदे पाळले जातात ते प्रथा किंवा वहिवाट म्हणून.

देव वेतोबा हे आरवलीचे भूषण व मुख्य आकर्षण तर आजगावचा देव वेतोबा हे एक सुंदर, संपन्न ठिकाण आहे.वेतोबा म्हणजे वेताळ. तो शिवभक्त आणि भूतपिशाच्चांचा अधिपती होय. वेताळ सदैव युद्धोधत व शस्त्रधारी सैनिक आहे. मराठी संतवांङ्मयातही वेताळ आणि त्याचे अनुचर यांचा युद्धप्रसंगी आढळ होतो. शिव हा भूतपिशाच्च्यांच्या प्रभावळीत वावरणारा स्मशानात हिंडणारा आणि गळ्यात रुंडमाळा घालणारा आहे. त्याने वेताळाला पिशाच्चांचे अधिपत्य दिले. भारतात अनेक ठिकाणी त्यांची देवळे आहेत.अष्टभैरवांपैकी एक असा हा वेतोबा!  सिंधुदुर्ग जिल्हा, गोवा येथे त्याला ग्रामदेवता, ग्रामसंरक्षणकर्ता असे बिरुद मिळाले आहे. हा भूतनाथ त्‍याच्‍या सैनिकांसह गावात रात्री संचार करतो. त्यावेळी त्याच्या हातात एक दंडा आणि खांद्यावर घोंगडी असते असे म्हणतात. त्या संचारात त्याच्या वहाणा झिजतात. म्‍हणूनच वेतोबाला भेट म्‍हणून त्‍याच्‍या भक्‍तांकडून वहाणा देण्‍याची प्रथा आहे. वेतोबाच्‍या आरवली येथील मंदिरामध्‍ये भक्‍तांनी अर्पण केलेल्‍या मोठमोठ्या आकाराच्‍या वहाणा पाहण्‍यास मिळतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात, वेंगुर्ला तालुक्यात, ओरोस येथून सुमारे चाळीस किलोमीटरवर आजगाव स्थित आहे. ते कोकणपट्टीतील अतिप्राचीन गाव. गावाला किती वर्षे झाली हे सांगणे कठीण आहे. तो गाव मुख्यत: शिवपंचायतन प्रमुख असा गाव आहे. सर्वेश्वराचे प्राचीन स्वयंभू देऊळ, त्यासमोर आदी चामुंडेश्वरी, रस्त्यालगतचे सूर्यनारायणाचे प्राचीन मंदिर, रवळनाथ, वेताळ व भूमिकादेवी ह्यांची मंदिरे ही सारी वेताळपंचयतनात म्हणजे शिवपंचायतनात येतात.

आजगावच्या देव वेताबाचे मंदिर म्हणजे ह्या गावच्या लोकांच्या सुबत्तेचे, उच्च अभिरूचीचे आणि श्रद्धेचे रूप आहे. आधुनिक पद्धतीने जीर्णोद्धार झालेले हे मंदिर खूप सुंदर आहे. आतबाहेर सर्व परिसर स्वच्छ आहे. सभामंडपात वरती चारी बाजूंनी कठडे असलेल्या गॅल-या आहेत. खाली दोन्ही बाजूंला बैठका आहेत. तेथून गाभा-यात शिरले, की उंच, काळीकभिन्न, शुभ्र वस्त्रांकित वेतोबाची मूर्ती दिसते. बाहेरच्या बाजूला देवाचे तरंग, पालखी, छत्र्या दिसल्या.

कोठलेही काम, आरंभ, समस्या ह्यांचा हल वेतोबाला कौल लावून होतो. कौल घेणे ही प्रथाच आहे. नवस बोलले जातात व ते पूर्ण होतातच. मग ते फेडताना वेतोबाला तेथीलच चर्मकारांनी बनवलेल्या चामड्याच्या चपलांचा जोड अर्पण करावा लागतो. त्‍या चपलांचे तळ नंतर झिजलेले आढळतात अशी समजूत आहे. तेथे बाहेरच्या सभामंडपात चपलांचे अनेक जोड मांडलेले होते. नवस फेड म्हणून प्राप्त झालेल्या त्या चपलांत एक खूप मोठा आणि सुंदर जोड होता. तो हरणाच्या कातड्याचा होता म्हणे. सभामंडपाच्या आत शिरताना उजव्या हाताला देवी भूमिकाचे देऊळ आहे. तिला छान साडी नेसवली होती. ती देवी दागिन्यांनी मढलेली होती.

आजगावच्या लोकांची वेतोबावर अढळ श्रद्धा आहे आणि त्याच्या कृपेबरोबरच त्यांच्यावर सरस्वती आणि लक्ष्मीचाही वरदहस्त आहे. त्यांनी सगळ्या क्षेत्रांत नावलौकीक आणि गौरव प्राप्त केला आहे. देवळाच्या परिसरात किमान सुखसोयी असलेली एक धर्मशाळाही आहे. वेळोवेळी बाहेर स्थायिक झालेले तेथील ग्रामस्थ आणि पाहुणे-रावळे ह्याचा लाभ घेतात. देवळात चैत्रापासून फाल्गुनपर्यंत निरनिराळ्या तिथीनुसार भजन सप्ताह, भाटाचा जागर, दसरा, कार्तिक स्नान, दशावतारंभ, वैकुंठ चतुर्दशी असे सोहळे पार पडतात. पालखी, जत्रा, उत्सव, तरंग सर्व उत्साहाने होते.कोणत्याही कामाचा शुभारंभ वेतोबाला कौल लावूनच केला जातो. भुताखेताने झपाटले तरी त्यावर उतारा घेण्‍यासाठी लोक वेतोबाकडे येतात. प्रभू मतकर हे प्रमुख मानकरी. मडवळ, सुतार, ब्राह्मण ह्यांनाही मानपानात स्थान असते. त्यांनाही नेमून दिलेली कामे असतात. योग्य ते खांबये निवडले जातात. काहींच्या अंगात देवाचा संचार होतो. वारं अंगात येते आणि ते प्रश्नांची उत्तरे देतात. आजगावमध्ये संचारी व्यक्ती बोलत नाही, खाणाखुणा करते. त्यामागे आख्यायिका आहे. 

वेंगुर्ल्याहून आरवली तेरा किलोमीटरवर आहे. देव वेतोबाचे आरवलीतळ देवस्थान हे एका बाजूला समुद्र, अवतीभोवती नारळ-पोफळी, काजू व फणसाच्या बागा आणि डोंगर यांनी वेढलेले निसर्गचित्र आहे.आरवलीबद्दल असे वाचले होते की, विजयनगरच्या हिंदू साम्राज्यात हरवल्ली नावाने अस्तित्त्वात असलेल्या गावाचे नाव कालौघात बदलून आरवली झाले. हर म्हणजे शिव आणि वल्ली म्हणजे वस्ती. पूर्वी ह्या क्षेत्राच्या आसपास ब-याच शिवमंदिरांची मालिका असावी म्हणून हरवल्ली! नाथपंथीय सिद्धपुरुष श्री भुमैया यांनी आरवलीचे देऊळ सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात स्थापन केले असे म्हणतात. सांप्रत मंदिर इसवी सन १६६० मध्ये बांधल्याचा तर पुढचा सभामंडप इसवी सन १८९२ ते १९०० च्या सुमारास बांधल्याचा उल्लेख आढळतो.

मंदिरात प्रवेश करताच भव्य अशी वेतोबाची मूर्ती नजरेत भरते. नऊ फुटाच्या आसपास उंची असलेली ती मूर्ती पंचधातूंची आहे. वेतोबा एका हातात लांब तलवार घेऊन उभा आहे. पूर्वी मूर्ती फणसाच्या लाकडापासून बनवत म्हणून त्या गावात फणसाचे लाकूड बांधकामात व इतर व्यवहारात वापरत नाहीत असे कळले. १९९६मध्ये भक्तांनी पंचधातूंची मूर्ती उभारली. देवाला केळीचे घड अर्पण होतात.देवळाच्या गाभा-यात वेतोबाच्या बाजूला श्रीदेव भुमैय्या, श्रीदेव पूर्वांस, श्री देवरामपुरुष, श्रीदेवबाराचा पूर्वंस (निरंकारी) आणि श्रीदेव भवकाई विराजमान आहेत. ह्या देवळातही चैत्रपाडवा, रामनवमी, चैत्रपौर्णिमेचा जागर, वैशाखात तीन दिवस मोठा उत्सव, ज्येष्ठात बापू-मामाचा पाडवा, आषाढात महारुद्र होतो. ह्यात आरत्या, पालखी उत्सव व जपांचा समावेश असतो. देव वेतोबाच्या समोर असलेल्या सातेरी देवी मंदिरातही सण, उत्सव, जत्रा साज-या  होतात.

समाजावर असणारा देवळांचा प्रभाव, श्रद्धा ह्यांना एक सकारात्मक वळण देऊन, आरवली देवस्थान विश्वस्तांनी आरवली वैद्यकीय संशोधन केंद्र, लालजी देसाई संगीत विद्यालय, अन्नछत्र योजना इत्यादी उपक्रम राबवून, मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणण्यात पुढाकार घेतला आहे. देवळामध्ये दर्शनीभागात आवाहन लिहिलेले आहे, की भक्तांनी वेतोबाचा नवस फेडताना, प्रत्येकाने चपलाचा जोड न देता, त्यासाठी लागणारी रक्कम, साधारणपणे दोन हजार रुपये संस्थेला (ट्रस्ट) दान करावी. त्या दानातून देवाला दर महिन्याला एक नवीन जोड देण्यात येईल. बाकी रक्कम साठवण्यात येईल. त्या निधीतून नियोजित चांदीच्या चपला बनवण्यात येतील व उरलेल्या दानधर्मातून विधायक काम करता येतील. असे पंचवीस लाख रुपये जमा करण्याचा मानस असून अर्धीअधिक रक्कम जमाही झाली आहे. ही डोळस श्रद्धा स्तुत्य व अनुकरणीय आहे.

चतुरस्र लेखक जयवंत दळवी हे आरवलीचे. त्यांच्या साहित्यातून ‘देव वेतोबा’ प्रथम भेटला. त्याचे प्रत्यक्ष दर्शनही आनंददायक आहे. तेथून एक किलोमीटरवर असलेला शिरोडा गावही सुंदर आहे. विशेषत: तेथील समुद्र किनारा आणि तेथे ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले, पद्मभूषण वि.स. खांडेकर हे तब्बल अठरा वर्षे तेथील शाळेत शिक्षक म्हणून वास्तव्यास होते. ते आरवलीच्या ‘भिके डोमगरी’ ह्या टेकडीवर तासन् तास बसत असत. त्यांनी समोरचा सुंदर समुद्र किनारा आणि आसपासचा मनोहर आसमंत न्याहळत चिंतन केले असेल. ते तेथील ज्या दगडावर बसत त्याला ‘खांडेकर खूर्ची’ असे नाव देण्यात आले आहे. साहित्यप्रेमी आणि स्थानिक जनता यांच्यासाठी ते स्थळ आदरस्थान बनले आहे. त्‍या सर्व परिसराला भेट देऊन मन प्रफुल्लित होते. सोबत कोकणवासियांची श्रद्धाही मनाला भावते.आजगाव हा संस्कृतोद्भव शब्द आहे. अजगवम्, अजगाव, आजगावम् या तिन्ही शब्दांचा अर्थ आहे शिवधनुष्य! अज म्हणजे ज्याला जन्म नाही असा म्हणजे शंकर! आजगाव ह्या नावावरूनही त्या गावचे अलौकीकत्व समजून येते. (लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Translate »
error: Content is protected !!