श्री देवी भराडी, चौके

Spread the love

                प्रफुल्ल देसाई, मालवण मोबा – ९४२२५८४७५९

                भक्तीचे अनेक प्रकार असले तरी भक्तीचा उगम हा निस्सीम अशा श्रद्धेतून होत असतो आणि ही श्रद्धा जेव्हा शक्तीतून प्रकट होते तेव्हा ती शक्ती आपल्या समोर भवानी, भराडी, माऊली, सातेरी, पावणाई, भद्रकाली अशा विविध रूपातून प्रकट होते. मग ही रूप कुठल्यातरी झाडा पेडात आढळतात, पाना फुलात आढळतात एवढच कशाला माळरानावर…. भरडावर….होय..! एखाद्या भरडावर मग ते भरड असेल जंगलमय भागातले……ते भरड असेल अंगावर पांघरूण लपेटलेल्या गवताच….कधी कधी दगड धोंड्याच आणि ह्याच दगड धोंड्यात, पाषाण रुपात शक्ती बनून आपल्या समोर उभी राहते ती आदी शक्ती भराडी.भरडावर रुजली ती भराडी. साडेतीनशे- चारशे वर्ष झाली असतील ….चौक्याच्या त्या भरडावर अचल बनून स्थानापन्न झालेली भराडी जेव्हा आपल्या भक्तीत रममाण होणाऱ्या भक्तांना कल्याणमस्तूचा आशीर्वाद देत हित साधत भक्तांच्या कल्याणार्थ…रक्षणार्थ उभी आहे !

                मालवण पासून १० कि.मी. अंतरावर असणारे मालवण कसाल हमरस्त्यावरील चौके हे गाव चिरेखाणी व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या लोकांचा पूर्वापार शेती हा व्यवसाय असला तरी त्याला जोड धंदा म्हणून या गावात चिरेखाण व्यवसायाला जनमान्यता मिळाली आहे. त्यामुळे या चिरेखाण व्यवसायामुळे या भागातील लोकांना रोजगाराची चांगली संधी मिळाली आहे. फार पूर्वी हा गाव आंबेरी गावामध्ये मोडला जायचा. ब्रिटीश काळात या गावात ब्रिटीशांनी उभारलेल्या चौकी मुळे हे गाव चौके म्हणून उदयास आले. सुमारे ४५० घरे असणाऱ्या या गावाची लोकसंख्या १८०० एवढी आहे. या गावात ९ वाड्या असून थळकर वाडी, कुळकर वाडी, वावळ्याचे भरड, मांडखोल वाडी, नारायण वाडी, बावखोल वाडी, गोड्याची वाडी, सम्यकनगर, भवानी नगर अशा वाड्यांचा समावेश आहे. या गावचे ग्रामदैवत श्री देवी भराडी माता आहे. या मंदिराचे थळकर गावडे, कुळकर गावडे, आणि परब असे मानकरी असून या गावात गावडे वस, परब वस, चाळा, गिरोबा, हनुमान मंदिर, दत्त मंदिर, विठ्ठल मंदिर, रवळनाथ मंदिर अशी देवदेवतांची मंदिरे आहेत. श्री देवी भराडीच्या मंदिरात घटस्थापना, दसरा, तुलसी विवाह, त्रिपुरारी पौर्णिमा, वार्षिक जत्रोत्सव (दहीकाला), गुढीपाडवा, होळी असे उत्सव साजरे केले जातात. चौके गावची ग्रामदेवता श्री देवी भराडी माता म्हणजे एक स्वयंभू पाषाण असून देवीची छत्रछाया या गावावर सदैव आहे. देवी भराडी माता भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते त्यामुळे ती गावकऱ्यांचे श्रद्धास्थान बनली आहे.

                फार वर्षांपूर्वीपासून सांगितल्या जाणाऱ्या आख्यायिकेनुसार गावापासून काहीशा जंगलमय निर्जनस्थळी झाडाझुडपाने व्यापलेल्या अशा भरड भागात या पाषाणरुपी देवीचा उगम झाला. याठिकाणी असलेल्या भल्यामोठ्या करवंदीच्या झाडीमध्ये या पाषाणरूपी देवतेला रोज पान्हा सोडणारी गाय गावकऱ्यांना दिसून आली. चौकशी केली असता याठिकाणी देवता असल्याचे समजले. त्यानंतर या भरडा वरील जागेची साफसफाई करून या देवीला भराडी असे नाव देऊन पूजा अर्चा चालू केली.. भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने या देवीची ख्याती वाढली आहे . घटस्थापनेपासून या देवीच्या मंदिरात सर्व वार्षिक उत्सव मोठ्या थाटमाटात साजरे केले जातात. कार्तिक कृष्ण सप्तमीला परंपरेनुसार श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव साजरा होतो

                नवरात्रोत्सवाचे विशेष म्हणजे घटस्थापने दिवशी या मंदिरातील मानकऱ्यांची वर्सल बदलते. या मंदिरात थळकरांमधील गावड्यांची चार घरे ही मानकरी आहेत. चार घराण्यात वर्सल वाटली गेली असली तरी ह्या चारही घराण्यात वंशवृद्धी झाल्याने एखादया कुटुंबातील व्यक्तीची वर्सल ह्या वर्षी आली तर ती पुन्हा बऱ्याच वर्षांनी येते. असे असले तरी ही वर्सल चार घराण्यातच असते. देवीचे थळकरांमध्ये गावडे हे प्रमुख मानकरी असून त्याच्या बरोबर गणेश पूजेचा मान कुळकर गावडे आणि परब यांचा असतो. त्यांच्या सोबत बारापाच मानकरी पैकी देवीची नौबत करणारा दांडेकर (चौकेकर) व दिवाबत्ती निशाण घेणाऱ्या देवळी(चौकेकर) यांनाही देवीच्या वार्षिक कार्यक्रमात मान दिला जातो.चौके लगतच्या आंबेरी गावातही गावडे घराण्याच्या जमीन मिळकती आहेत. फक्त जमीन मिळकतच नव्हे तर तिथल्या देवस्थानात गावडे घराण्याला मानाचे पान असल्याने ते तिथेही मानकरी आहेत.

श्री देवी भराडी मंदिरात पाषाण स्वरूपात देवी आसनस्थ आहे. हे पाषाण रुजीव असल्याचे गावातील लोक अभिमानाने सांगतात. या पाषाणाची उंची अडीज फूट असून त्याची लांबी चार फूट आहे. वार्षिक जत्रोत्सवाला आणि दसऱ्याला पाषाण रुपी भराडी आपला मोहरा परिधान करून दागदागिन्यांनी नटून थटून भक्तांना दर्शन देते. भराडीचे ते रूप विलोभनिय असेच असते. या मंदिराचा २०१९ साली जिर्णोद्धार करण्यात आला असून एक देखणे मंदिर म्हणून मंदिराचा नावलौकिक आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने चौके गावचे भराडीचे मंदिर नजीकच्या काळात धार्मिक पर्यटनात आपला एक वेगळा ठसा उमटविल यात संदेह नाही