चपइ नृत्य

चपई नृत्य

Spread the love


सतीश पाटणकर


चपई नृत्य ही कोकणातल्या धनगरी समाजाची लोककला. कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगरी समाज सणवाराच्या काळात या नृत्यात रमून जातो. ‘आ रं आ रं..’ म्हणजे ‘केवळ तुझीच भक्ती मला प्रिय’ अशी आर्त हाक देत, धनगर बांधव देवीच्या नृत्यात रंगून जातात.उपजीविकेचं साधन शोधताना पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातील धनगर समाज फिरत-फिरत येऊन कोकणात स्थिरावला. कोकणातल्या संस्कृतीशी एकरूप झाला. दळणवळणाच्या वाढत्या पर्यायांमध्येदेखील त्याचं मन मात्र गुरं आणि मेंढपाळी करण्यातच स्थिरावलं. अशिक्षितपणाचं बिरुद मिरवणा-या या धनगर समाजानं सणोत्सवात रंगत आणण्यासाठी ‘चपई नृत्य’ सादर केलं आणि कोकणातली एक आगळीवेगळी कला नावारूपाला आणली.

      बिरुबा हे धनगर समाजाचं कुलदैवत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगरी समाज बिरुबाच्या नावानं दसरा, तुळशी विवाह, नवरात्री या सणाच्या दिवशी चपईनृत्य सादर करतात. तर कुडाळ तालुक्यात ‘गजा’ हे नृत्य सादर केलं जातं. या नृत्यप्रकारात केवळ पुरुषमंडळींचाच सहभाग असतो. चपई खेळणारे गडी अंगात पायगोळ झगा घालतात. डोक्याला फेटा बांधतात. कमरेला कमरबंध / कमरशेला बांधतात. हातात वेताची छडी आणि पायात वाक्या असतात. कपाळाला भंडारा लावतात. डोक्यास फेटा / पागोटे बांधल्याखेरीज कोणीही खेळगडी खेळत नाही.चपई नृत्यासाठी एका बाजूला शेळीचे आणि दुसऱ्या बाजूला गायीचे कातडे लावलेला ढोल वाजवितात. मुरलीचे सूर सूरावट देतात.विशेष म्हणजे कपाळी भंडारा लावलेला असतो.
        नृत्य सादर करणारे, हातात वेताची काठी घेऊन ढोलकी वाजविणा-यांभोवती फिरतात. ढोलक-याचा ढोल वाजू लागला की, नृत्याची सुरुवात होते. नृत्यकलाकार हातातील काठी हळुवार फिरवत, पायातला खुळखुळा वाजवत कसरती, उडय़ा मारत एका टोकापासून दुसरीकडे सरकतात. या हरकती करताना झग्याचं एक टोक हातानं पकडून गोल उडय़ा मारताना नृत्याची झलक काही औरच दिसते. बोल असतात.

बिरुबाच्या नावानं चांगभलं..
बाळू मामाच्या नावानं चांगभलं..
गज्जा बिरुबाच्या नावानं चांगभलं..
चंद्रासूर्या देवाच्या नावानं चांगभलं..
गज्जा शोबय वाकून चांगभलं..
या नृत्यात कुठेही धांगडधिंगा आढळत नाही. ढोलाचा ताल जसा सरकेल तसे नृत्यप्रकारात बदल घडतात.नवरात्रीत देवीची घटस्थापना झाल्यानंतर देवीसमोर हे नृत्य खेळले जाते. तसेच दसऱ्यादिवशी सीमोल्लंघनाला धनगरांचे देव सीमेवर जातात तिथे मांड भरला जातो आणि त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात हे नृत्य खेळले जाते. चपई हा विधीनृत्य प्रकार असल्याने यातील खेळगडी हे धनगर जातीतीलच असतात. खेळ खेळता खेळता एखाद्या खेळगड्याच्या किंवा भक्तांच्या अंगी दैवी संचार होऊन ते घुमू लागतात.
नवरात्रीपासून दसऱ्यापर्यंत आणि दिवाळी या सणांना हे नृत्य केले जाते. देवतांना केलेल्या नवसाची परतफेड म्हणूनही चपईनृत्य खेळविले जाते त्याला पवा खेळविणे असे म्हणतात, चपई नृत्य खेळत असताना “हार हार चांग भलं” आणि “भली ग भली ग व्हयी” असा जयघोष सुरु असतो. प्रथम संथ लयीत चालणारे हे नृत्य हळूहळू द्रुततलय पकडते आणि मग खेळगड्यांची चपळता दिसून येते.

अहिर खुटेकर धनगर आणि मेंढे धनगर यांचे गजनृत्य प्रसिद्ध आहे. त्यावरून काही ठिकाणी चपईनृत्याला गजा किंवा गजनृत्य म्हणून संबोधतात. गजनृत्य आणि चपई नृत्य यांत काही भेद आहेत. मात्र चपईनृत्याचे मूळ स्त्रोत हे गजनृत्यच आहे. चपई नृत्य फक्त गवळी / कोकणी धनगर जातीपुरते मर्यादितआहे.