मराठी चित्रपटसृष्टीत एक जमाना असा होती की, बहुतांश चित्रपट घाटमाथ्यांवरील ग्रामीण बाजावर आधारीत असायचे. त्यावेळेस ‘संसार पाखरांचा’ व ‘चानी’ या चित्रपटांचा अपवाद वगळता क्वचितच मराठी चित्रपटातून कोकण दर्शन व्हायचे. दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘श्वास’ चित्रपटामुळे मराठीतील आघाडीचे निर्माते व दिग्दर्शकांना कोकणच्या लालमातीची ओढ लागली आहे. मराठी चित्रपटांमध्ये कोळीगीतेसुद्धा आता लोकप्रिय होऊ लागली आहेत.
गेल्या तीन–चार वर्षात मराठी चित्रपटांमधून कोकणची निसर्गरम्य भूमी रुपेरी पडद्यावर दिसली. मराठीच काय हिंदी चित्रपटांसाठीदेखील शूटिंगकरता सुंदर असं लोकेशन जवळपास हवं असेल तर कोकणाला पर्याय नाही. परराज्यात जाण्यापेक्षा कोकण नेहमीच जवळ आणि इथं चित्रीकरणासाठी पुरेशा सोयी–सुविधाही उपलब्ध आहेत. विस्तीर्ण व मनाचा ठाव घेणारे सागरकिनारे, पुरातन शैलीदार देवळं व सभामंडप, चिरेबांधणीची कौलारू घरं, वळणदार व गर्द झाडीतून जाणारे रस्ते, असं सर्वच वैभव कोकणानं स्वत:पाशी बाळगलेलं आहे. या मनोहारी लोकेशन्सचा पुरेपूर वापर करून घेण्याची संधी कोकण प्रांतानं मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवुडसमोर ठेवलेली आहे. सिंधुदुर्गचे सुपुत्र दिग्दर्शक साईनाथ जळवी जळवी यांनी अनेक लघु चित्रपटांची निर्मिती करून सर्वच मराठी निर्मात्यांचे लक्ष कोकणाकडे वळविले..आज अनेक चित्रपट आणि मालिकांची शूटिंग कोकणात होऊ लागली आहेत.याबद्दल आमचे मित्र साईनाथ याना धन्यवाद द्यायलाच हवेत.
कोकणातील नैसर्गिक सौंदर्य मराठी चित्रपट सृष्टीला उशिराने हा होईना पण भुरळ घालू लागले आहे. कोकणच्या लाल मातीतील काही चित्रपट निर्मात्यांना बऱ्यापैकी फायद्याचे ठरले आहेत. यामुळे हिंदी भाषेतीलही निर्मात्यांनी कोकणकडे मोर्चा वळविला. गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांचे चित्रीकरण रत्नागिरी सिंधुदुर्गात होताना दिसत आहे.
कोकणातील स्वच्छ, सुंदर आणि शांत समुद्रकिनारे नारळ पोफळीच्या बागा, हिरव्या घनदाट राईतून वाहणाऱ्या नद्या आणि खाड्या हे येथील स्वप्नवत सौंदर्य आहे. याची भूरळ पडलेल्या मराठीतील अष्टपैलू दिग्दर्शक रमेश मोरे यांनी एका मल्याळम निर्मात्याच्या मदतीने एक अनोखा प्रयोग सुरू केला आहे. चिरंजीव हा वेगळा चित्रपट ते साकारत आहेत. यामुळे कोकणच्या अर्थकारणालाही वेगळी दिशा मिळणार आहे.
‘डोंगर, द-या, हिरवी झाडे, नद्या-ओहोळ, पक्ष्यांचा किलबिलाट, नाना तऱ्हेची वनसंपदा व सोबतीला अनेक प्राणी, पक्षी. हे सारं कमी की काय म्हणून या कोकण भूमीला लाभलाय जवळजवळ साडेसातशे किलोमीटरचा विलक्षण सौंदर्याने नटलेला समुद्रकिनारा. सर्व त-हेच्या किना-यांची इथे तुम्हाला प्रचिती येईल. बंदराजवळचा शांत असा किनारा असो, नारळाच्या झाडांमधला किनारा असो, अलिबागजवळचा व इतर अनेक ठिकाणचा रॉकी शोअर म्हणजे दगडांचा समुद्रकिनारा असो. एका समुद्राचीच किंवा किना-याचीच कितीतरी रूपं या कोकणाला लाभलेली आहेत. त्यातही गावागावाजवळच्या खाडींच्या व समुद्रकिना-यांच्या सौंदर्याला तर तोडच नाही.
जे समुद्रकिना-यांबद्दल आहे तेच इथल्या भूमीच्या वैभवाबद्दलही म्हणता येईल. अगदी महाड-पोलादपूरच्या जवळची काहीशी पिवळी माती पुढे पुढे लाल होत जाते. या सगळय़ाच ठिकाणी तुम्हाला या सौंदर्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. जिथे नजर जाईल तिथे हे सृष्टीचे वैभव नजरेस पडते. इथे काय नाही, असं म्हणतात, जगातल्या काही समृद्ध भागांपैकी एक असा हा कोकणाचा भाग आहे. सौंदर्य निर्मिती हा चित्रपटांचा प्रमुख भाग असलेल्या चित्रपट क्षेत्राला सृष्टिसौंदर्याने नटलेल्या या कोकणाच्या भूमीची भुरळ पडली नसेल तरच नवल.
मराठी चित्रपटसृष्टीचा व कोकणाचा संबंध हा अगदी पहिल्यापासून आला आहे. भारतीय चित्रपटांच्या अगदी सुरुवातीपासून. भारतात तयार करण्यात आलेला पहिला चित्रपट म्हणजे दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं होतं ते कर्जतजवळ. हाही भाग कोकणातला. तेव्हापासून अनेक चित्रपटांनी कोकणाच्या या भूमीला आपल्या कॅमे-यात कैद करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
‘गोमू माहेरला जाते हो नाखवा, हिच्या घोवाला कोकण दाखवा..’ हे ‘वैशाखवणवा’ चित्रपटातलं गीत तुम्हाला आठवत असेल. अशा कितीतरी चित्रपटांमध्ये कोकणाचे हे सृष्टिसौंदर्य वापरण्यात आलंय, ते अगदी आजतागायात. मराठी चित्रपटांच्या उत्थापनासाठी ज्या प्रकारे ‘श्वास’ हा चित्रपट कारणीभूत ठरला त्याच प्रकारे तो कोकणासाठीही लकी ठरला. या चित्रपटात कोकणातले गाव फार थोडय़ा काळासाठी जरी दाखवण्यात आलेले असले तरी त्याचा परिणाम जनमानसावर चांगलाच झाला. त्यानंतर कोकणाच्या या भूमीकडे चित्रपटाच्या निर्मात्यांनी विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली. कोकणात चित्रित करण्यात आलेल्या गोजिरी, काकस्पर्श, नारबाची वाडी अशा अनेक चित्रपटांना जबरदस्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. आताही नजीकच्या भविष्यात कोकणात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण होत आहे.
एका अर्थाने कोकणासाठी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात एक नवे दालन सुरू होत आहे. ‘शंखासुर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आशुतोष राणा हा जेव्हा कोकणात गेला होता तेव्हा तो या भूमीच्या अगदी प्रेमातच पडला होता. ‘चिरंजीव’ हा चित्रपट तर संपूर्णपणे कोकणातच चित्रित होत आहे. पुढच्या काळात कोकणात अधिकाधिक चित्रपटांचं चित्रीकरण या भूमीत होत आहे. कोणत्याही चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी काही भौगौलिक व कॅमे-यांच्या दृष्टीने आवश्यक अशा गोष्टींची गरज असते. कोकणात त्या गोष्टी नैसर्गिकरीत्या उपलब्ध आहेत. चित्रीकरणासाठी अत्यंत आवश्यक असा घटक म्हणजे स्वच्छ सूर्यप्रकाश. तो या ठिकाणी विपुल प्रमाणात आहे. अगदी काही काही ठिकाणी नैसर्गिकरीत्या छायाप्रकाशाचा खेळ आहे. कोकणात अनेक जुन्या इमारती आहेतच, त्याचबरोबर खेडय़ांची रचनाही गेल्या अनेक वर्षात बदललेली नाही. काही काही ठिकाणं तर मनुष्यवस्तीपासून इतकी दूर आहेत की या ठिकाणी पौराणिक चित्रपटांचं चित्रीकरण अगदी सहज होऊ शकेल. प्रवासाचा कमीत कमी वेळ व अधिकाधिक साधनांची उपलब्धता या चित्रपटांसाठी आवश्यक अशा बाबी असतात. कोकणात कमीत कमी प्रवासात सहज जाता येते. दळणवळणाची उपलब्धताही मोठी आहे. रस्तेही चांगले आहेत. रेल्वे व झालंच तर विमानमार्गेही कोकणात जाता येतं. अनेक मोठय़ा मोठय़ा कलाकारांना कमीत कमी वेळेत प्रवास हवा असतो. त्याचीही सोय या ठिकाणी आहे.
खाण्यापिण्याची चांगली सोय अनेक ठिकाणी सहज होऊ शकते. त्यासाठी लागणारा कच्चा माल आताशा कोकणातल्या कोणत्याही तालुकास्तरावरच्या गावांमध्ये उपलब्ध असतो. इथे सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था ही चांगल्या प्रकारे असल्याकारणाने चित्रपटाशी संबंधित पडद्यामागच्या कलाकारांचीही येण्याजाण्याची चांगली सोय होऊ शकते. ज्याला ‘मल्टीपल लोकेशन’ असं म्हणतात त्याचीही सोय कोकणात चांगल्या प्रकारे होऊ शकते.
एकाच वेळेस समुद्र, हिरवळ, काही मोकळी मैदानं यासारख्या अनेक बाबी इथे सहज उपलब्ध होतात. कोकणात काही सुरेख अशी मंदिरे आहेत. कुणकेश्वर, संगमेश्वरचं कर्णेश्वर, भराडीदेवीचं मंदिर अशी अनेक सुरेख मंदिरं कोकणात आहेत. त्याचबरोबर इतरही वैविध्यपूर्ण लोकेशन्स कोकणात मिळू शकतात. कुठे नारळी-पोफळीच्या बागा आहेत तर कुठे फुलांनी बहरलेले ताटवे. कोकणात चित्रीकरण करण्यासाठी सगळय़ा अनुकूल बाब म्हणजे कोकणी माणसांकडे असेलेली अंगभूत अगत्यशीलता व आतिथ्य या अशा अनेक गोष्टींनी कोकणाची ही भूमी चित्रीकरणासाठी अगदी आदर्श अशी भूमी आहे.तारकर्ली, हर्णे, दापोली, श्रीवर्धन, जयगड, गणपतीपुळे, मालगुंड, मालवणचा समुद्रकिनारा, मुरुड-जंजिरा, सुवर्णदुर्ग, आंजर्ले, शिरोडा, तेरेखोल आणि सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे कोकणातलं प्रत्येक गाव हे आपल्या खास वैशिष्टय़ाने उठून दिसत असतं. एखादं गाव डोंगरात तर एखादं दरीत, एखादं समुद्रकिनारी तर कुठचं गाव हे खाडीवर, अशा अनेक ठिकाणी सहज चित्रीकरण करता येतं.कोकणाची भूमी ही निसर्गसौंदर्याने नटलेली असली तरी या भूमीतील साहित्यिकांनीही त्यांच्या लेखणीतून कोकणाचं सुंदर वर्णन करुन ठेवलं आहे. त्यांच्यातल्या अनेक साहित्यिकांनी कोकणाच्या भूमीची आपल्या सार्थ शब्दात ओळख करून दिली आहे. आज जरी चित्रपट या क्षेत्राचा बोलबाला असला तरी अनेक वर्षापासून कोकणातल्या अनेक साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून या भूमीचे वैशिष्टय़ अधोरेखित केलेले आहे. श्री.ना.पेंडसे, जयवंत दळवी, रत्नाकर मतकरी यांच्यापासून ते अगदी मधू मंगेश कर्णिक यांच्यापर्यंत अनेक साहित्यिकांनी या भूमीचं दर्शन आपल्या वाचकांना घडवलं आहे.
मराठी चित्रपट निर्मात्यांना कोकण भावत असल्याचे कारण म्हणजे चित्रपटांचे कथानक आपल्या लोकेशन्स्ना सूट होणारे आहे. त्यामुळे स्थानिक कलावंत व तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे.
(लेखक मुख्यमंत्रांचे माजी माहिती अधिकारीआहेत )