सतीश पाटणकर
दुसरे फोंड सावंत अर्थात (आनासाहेब) यांच्या सत्ता काळात आरमाराची ताकद वाढली. त्या काळात युरोपातून व्यापाराच्या निमित्ताने येणाऱ्यांच्या दृष्टीने सावंतवाडी संस्थान ही दक्षिण कोकणातील एक महत्त्वाची ताकद बनली. सावंतवाडीकरांचे आरमार या परदेशी व्यापाऱ्यांसाठी अडचणीचे ठरत होते. यातून विशेषतः पोर्तुगिज आणि त्यापाठोपाठ इंग्रजांसोबत अनेक संघर्षाचे प्रसंग उद्भवले. दुसरे फोंड सावंत यांच्याच कारकीर्दीत इंग्रजांचा तहाच्या निमित्ताने सावंतवाडी संस्थानमध्ये पहिला शिरकाव झाला.
युरोपातील अनेक देशामधील लोक भारताकडे जलमार्गाने व्यापारासाठी येवू लागले होते. पोतुर्गिज आणि डच यांनी तर इथला काही मुलुख पण काबीज केला.
कोकणावर, विशेषतः येथील किनारपट्टीवर त्यांचा प्रभाव होता. सोळाव्या शतकाच्या अखेरीस इंग्रजांची यात भर पडली. 1612 मध्ये त्यांनी सुरतमध्ये आपली वखार टाकली.
हळूहळू इंग्रज भारतभर हातपाय पसरू लागले. 1662 मध्ये पोर्तुगिज राजाने इंग्लंडच्या दुसऱ्या चार्लस राजाला मुंबई बेट आंदण म्हणून दिले. इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली होती. राजाने हे मुंबई बेट 1668 मध्ये या कंपनीला विकले. तेथे त्यांनी पश्चिम किनाऱ्यांचे मुख्य ठाणे बनवून स्वतंत्र गव्हर्नरची नेमणूक केली.
सगळीकडे सत्ता मिळवायची असली तरी त्यांचा मुख्य उद्धेश व्यापार, तोही जलवाहतुकीने होणारा हाच होता. कोकण किनारपट्टीवरून जात येत असताना इंग्रजांच्या दृष्टीने सावंतवाडी संस्थान आणि कुलाब्याचे आंग्रे हे अडचणीचे होते. ते त्यांना चाचे म्हणत. विशेषतः सावंतवाडी संस्थानची वाढलेली ताकद त्यांच्यासाठी अडचणीची ठरत होती. त्यांची गलबते कोकण किनारपट्टीवरून बिनधास्त ये-जा करू शकत नव्हती. त्यामुळे सावंतवाडी संस्थानला शह देण्याचे इंग्रजांचे सुरवातीपासूनच प्रयत्न होते. मिस्तर बुन हा मुंबईचा गव्हर्नर असताना त्याने एप्रिल 1717 मध्ये सावंतवाडीच्या आरमारावर हल्ल्याची मोहीम आखली. त्यासाठी कोमोडोर विक्स या अधिकाऱ्याची नियुक्ती केली. वेंगुर्ले बंदर परिसरावर हल्ल्याचे टार्गेट निश्चित झाले.
फेम्, ब्रिटानिया आणि रिव्हेंज अशी तीन मोठी गलबते आणि इतर छोटी गलबते, तुटपुंजे सैन्य घेवून विक्स हा वेंगुर्लेवर चाल करून आला; मात्र तो खूप भित्रा होता. त्याच्याकडे पुरेसे सैन्यही नव्हते. वेंगुर्ले बंदराचा परीसर खडकाळ आहे. त्याच्या जवळ लाटाही मोठ्याने येवून आदळतात. त्यामुळे विक्स याला गलबते किनाऱ्यावर आणायला कित्येक दिवस लागले. शेवटी एक जागा मिळाली. तिथून त्यांनी किनाऱ्याकडे तोफांचा मारा सुरू केला. या मोहिमेत स्ट्यांटन नावाचा आणखी एक अधिकारी होता. सैन्य त्यांच्या अधिकाराखाली होते. हल्ला सुरू असतानाच विक्स आणि स्ट्यांटन यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. ते इतके विकोपाला गेले की इंग्रजांना ही मोहिमच गुंडाळावी लागली.
इंग्रजांचे सावंत आणि आंग्रे हे दोघेही शत्रू होते; पण सावंत आणि आंग्रे यांच्यातही वाद होता. कान्होजी आंग्रे यांनी सावंतवाडी संस्थानच्या काही गलबतांवर हल्ला केल्याने हे शत्रूत्व वाढले होते. 1720 मध्ये इंग्रजांनी आंग्य्रांना शह देण्यासाठी त्यांच्यावर हल्ल्याची योजना बनवली. सावंतवाडीकरांनी आंग्य्राना शह देण्यासाठी याकडे संधी म्हणून बघीतले. सप्टेंबर 1720 ला आपला वकील इंग्रजांकडे पाठवून आंग्य्रांवरील हल्ल्यासाठी मदत करण्याची तयारी दाखवली. आंग्य्रांचे अधिपत्य असलेल्या देवगड किल्ल्यावर पहिला हल्ला करावा, अशी अट घातली. तशीच हल्ल्याची योजना ठरली.
इंग्रजांनी देवगड किनाऱ्यांच्या टेहाळणीसाठी 7 ऑक्टोबर 1720 ला काही गलबते पाठवली. 18 ऑक्टोबर 1720ला ऍडमिरल ब्राऊन यांच्या नेतृत्वाखालील इंग्रजांचे आरमार देवगडात दाखल झाले. त्यांनी देवगड किल्ल्यावर तोफाचा हल्ला सुरू केला; पण या किरकोळ प्रमाणातील हल्ल्याचा उपयोग होईना. यामुळे ऍडमिरल ब्राऊन याने सैन्य जमिनीवर उतरवण्याचा आदेश दिला; पण त्याच्या हाताखालचे अधिकारी हा आदेश मानायला तयार होईनात. शेवटी इंग्रजांना आरमार परत मुंबईकडे न्यावे लागले. यात इंग्रजांचे बरेच नुकसान झाले. या सगळ्या घटनाक्रमात कबुल केल्याप्रमाणे सावंतवाडीकर राजांनी इंग्रजांना मदत केल्याचे संदर्भ मात्र कुठे मिळत नाही.
मुंबईचा गव्हर्नर मिस्तर बून याच्या मनात या सगळ्या घटनाक्रमांमुळे सावंतवाडी संस्थानला शह देता आला नसल्याचे शल्य होते. त्याच्या जागी फ्रिक्स या नव्या गव्हर्नरची नियुक्ती झाली. 9 जानेवारी 1722 ला बून इंग्लंडला निघाला. कारवार येथे व्हिक्टोरीया आणि रिव्हेंज नावाची गलबते माल घेवून जात होती. या गलबतांसोबत लंडन या नावाच्या आपल्या गलबतात बसून तो जात होता. अंजेदिवास येथे त्याची ही गलबते आली असता सावंतांच्या आरमारातील गुराबानी एका गलबतावर हल्ला चढवल्याचे त्याने पाहिले. हे अंजेदिवास (अंजेहिरा) गोव्याच्या मुरगावच्या दक्षिणेला असलेले बेट आहे. बून याने आपल्या ताब्यातील गलबतांना सावंतांच्या गुराबावर चाल करायचे आदेश दिले. तेथे चकमक झाली. याच दरम्यान तेथे आलेल्या नव्या गव्हर्नर फ्रिक्स याची साथ मिळाली. यामुळे सावंतांच्या अरमाराला माघार घ्यावी लागली. जाता जाता मिळालेला हा छोटा विजय बून याला समाधान देणारा ठरला.
सावंतवाडीकरांची आरमारी ताकद आणखी दोघांसाठी डोकेदुखी ठरत होती. गोव्यातले पोर्तुगीज आणि त्यांचे अधिपत्य मान्य केलेला सौंद्याचा राजा. 1726 मध्ये सावंत भोसले यांनी सौंद्याच्या राजाच्या ताब्यातला फोंडा किल्ला हस्तगत केला. त्याने पोर्तुगिजाकडे मदत मागितली. ती मदत देवून पोर्तुगिजांनी हा किल्ला सौंद्याच्या राजाला परत मिळवून दिला.
तिकडे कुलाब्याच्या आंग्रे यांच्या सत्तेतही नेतृत्व बदल झाला. 1729 ला कान्होजी आंग्रेंचा मृत्यु झाला. आंग्रे कुटुंबात गादीसाठी संघर्ष सुरू झाला. यात ताकदवान आणि मुत्सद्दी असलेल्या तुळाजी आंग्रेनी राजगादी मिळवली. त्यांच्या कारकीर्दीत इंग्रज आणि सावंतवाडीकर यांचा त्रास आणखी वाढला. यातून आंग्य्राना शह देण्यासाठी सावंतवाडीकर आणि इंग्रज यांच्यात तह करण्याचे ठरले. 30 जानेवारी 1730 ला जंजिरे-मुंबई येथे हा इंग्रजांसोबतचा पहिला तह झाला. यात सावंतवाडीकरांतर्फे आरमाराचे मुख्य अधिकारी बापूजी नाईक-तोंडोलकर तर इंग्रजांतर्फे मुंबईचा तत्कालीन गव्हर्नर राबर्ट कावन हा होता. सावंतवाडी संस्थानात इंग्रजांचा झालेला हा तहाच्या रूपाने पहिला शिरकाव म्हणता येईल.
*काय होता तह?
- * एकमेकांच्या गलबतांना त्रास देवू नये किंवा हल्ला करू नये
- * समुद्रात एकमेकांची गलबते संकटात असतील तर मदत करावी.
- * व्यापार करताना वाजवी जकात लावावी
- * तुळाजी आंग्रे यांना शह देण्यासाठी एकत्र येवून प्रयत्न करावे.
- * सावंतांना तोफांची गरज पडेल तेव्हा किंमत घेवून इंग्रजांनी त्या पुरवाव्या.
- * शत्रूच्या मुलखातील (आंग्रे) किल्ले कोट मिळाले तर ते सावंतांनी घ्यावे
* विजयदुर्ग किल्ला आणि खांदेरी बेट विजयानंतर इंग्रजांना मिळावी.