श्री देवी सातेरीचं जलमंदिर, बिळवस

Spread the love

सतीश पाटणकर

     अनेक रीतिरिवाज व धार्मिक परंपरा कोकणात मोठ्या श्रद्धेने झोपसल्या जातात. मालवण तालुक्यातील बिळवस सातेरी मंदिर हे प्रसिद्ध असून कोकणात आढळणाऱ्या सातेरी देवींच्या मंदिरापैकी हे एकमेव जलमंदिर आसून आषाढ महिन्यात या देवीचा जत्रोत्सव होतो.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यात असलेल्या मसुरे गावातल्या बारा वाडय़ांची ग्रामदेवता असलेल्या श्री देवी सातेरीचं जलमंदिर बिळवस येथे आहे. हे गाव जिल्ह्यातच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं आहे. कोकण प्रांतातलं एकमेव जलमंदिर या गावात पाहायला मिळतं.

         मालवण तालुक्यातलं बिळवस गाव ही मसुरे गावातली एक वाडी असली तरीही या वाडीस गावाचं महत्त्व प्राप्त झालं आहे, ते सुमारे ७०० वर्षापूर्वी उभारलेल्या श्री सातेरी देवीच्या जलमंदिरामुळेच! जैन घराण्यातल्या एका देवी भक्तानं हे मंदिर बांधलं आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून तिन्ही बाजूंनी ते पूर्णपणे पाण्यानं वेढलेलं आहे. मंदिरात एक मोठा मंडप व सभामंडप आहे. पूर्वी गाभा-यात मूर्ती नव्हती, तेव्हा एका उंच वारुळाची पूजा केली जात होती. त्या वारुळातच शेष रूपात देवीचं वास्तव्य असून अनेक भक्तांना देवीचं दर्शन शेष रू पानं झाल्याचं जुनेजाणते ग्रामस्थ सांगतात. मंदिराचा संपूर्ण परिसर निसर्गसौंदर्यानं नटलेला आहे. मंदिराच्या उजवीकडे एक विहीरवजा कुंड असून या कुंडातील पाणी कधीही आटत नाही. या तळीत भारताच्या पवित्र तीर्थक्षेत्रांच्या नद्यांचं पाणी आणून सोडलेलं आहे, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. कुंडाच्या तळाशी महादेवाची पिंड आहे.

    मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. त्यानुसार मंदिर सभोवतालच्या तलावात गाई-म्हशींना पाणी पाजलं जात असे. एके दिवशी तलावातील वारुळातून रक्त येऊ लागलं. त्यावेळी एका ग्रामस्थाच्या स्वप्नात देवीनं दृष्टांत देऊन ‘माझं वास्तव्य या तलावातील वारुळात आहे. जनावरांपासून मला त्रास होत असल्यानं या वारुळावर माझ्यासाठी देवालय बांध!’ असं सांगितलं. देवीनं दिलेला हा दृष्टांत आदेश मानून ग्रामस्थांनी या ठिकाणी देवालय बांधलं. देवीच्या यात्रोत्सवाबरोबरच गावात धार्मिक पूजाअर्चा, विधींना देवदिवाळीपासून सुरुवात होते. यामध्ये गावपळण, देवीची पारध, होलीकोत्सव, दसरोत्सव, दहीकाला व गोंधळ हे उत्सव मोठय़ा भक्तिभावानं आणि जल्लोषात साजरे केले जातात.

       या गावचा सर्वात मोठा यात्रोत्सव आषाढ महिन्यात असतो. यासाठी प्रमुख गावकरी मंडळी व ग्रामस्थ मंदिरात जमून या जत्रेची तारीख ठरवतात. या दिवशी गावातले चाकरमानी, माहेरवाशिणी व देवीचे दूरवर पसरलेले भक्त या यात्रेदरम्यानच्या देवीच्या रूपाचं दर्शन घेण्यासाठी न चुकता येतात. यात्रेच्या दिवशी सकाळी देवीला निळ घालतात. एका भांडय़ात पाणी घेऊन त्यात तेल व गवताची राख मिसळून ही नीळ बनवली जाते. नंतर देवीचा पेटारा वाजत-गाजत मानकरी मंडळींकडून मंदिरात आणला जातो. देवीला वस्त्रालंकार नेसवून, मुखवटा घातला जातो. यानंतर देवीच्या समोर मडक्यात भात ठेवतात व त्यात खोब-याच्या वाटीत पेटता काकडा (दिवा) तेल ओतून पेटत ठेवतात. दुपारी देवीला गावातल्या प्रत्येक घरातून नैवेद्य आणला जातो. मानकरी मानाप्रमाणे धार्मिक विधी होऊन पूर्वरीतीनुसार गा-हाणी होतात. मग ओटय़ा भरण्यास प्रारंभ होतो. या वेळी देवीचे असंख्य भक्त दर्शन घेतात. संपूर्ण मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीनं फुलतो.

      सायंकाळी देवीसमोर ठेवलेलं मडकं गावकर मंडळी घेऊन वाजतगाजत गांगोची राय येथे नेतात व त्या ठिकाणी वाडी करून गाऱ्हाणं घालतात. पुन्हा मंदिराकडे ते मडकं घेऊन येतात. ग्रामस्थांनी देवीसमोर ठेवलेल्या नैवेद्याचे दोन भाग करून ते देवीसमोर ठेवले जातात. त्यानंतर गाऱ्हाणं घालून एक भाग मानकरी कुळकर यांना देतात. तर दुसरा भाग जमलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येतो. त्यानंतर देवीच्या मूर्तीवरील वस्त्रं, दागिने उतरवून देवीच्या पेटा-यात ठेवून तो पुन्हा वाजत-गाजत नेऊन मानकऱ्यांकडे पोहोचवला जातो. यात्रेदिवशी रात्री मंदिरात कुणीही थांबत नाही. दुस-या दिवशी सकाळी नारळ, तांदूळ व आलेले पैसे परंपरेनुसार नोकरचाकरांना देऊन उरलेलं उत्पन्न न्यासात जमा केलं जातं. दुपारी वाडी भरून गाऱ्हाणं घातलं जातं. मसु-याहून आलेल्या चाक-यानं तोडावळ केल्यावर ती वाडी माळगाव इथं नेली जाते व अशा रीतीनं या यात्रेची सांगता होते.

श्री देवी सातेरी जलमंदिर बिळवस, ता.मालवण

सातेरी देवी आणि तिच्या मंदिरातील वारुळाची कहाणी

     कोकण म्हटलं की आपल्या तिकडच्या नारळाच्या बाग, हापूस आंबे, फणस, त्याचबरोबर तिथले समुद्र किनारे इत्यादी आठवतात. याच कोकणच्या भूमीला परशुरामाची भूमी असे संबोधले जाते. पण याच कोकणात अनेक देवींची पण जागृत देवस्थाने आहे आणि अशा प्रत्येक देवस्थानाची काही ना काही कथा आणि त्याच्या मागे इतिहास देखील आहे. जर तुम्ही कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भटकंती करीत असाल आणि एखाद्या मंदिरामध्ये जर वारुळ दिसले तर आश्चर्यचकित नका होऊ. ती वारुळे नुसती वारुळे नसून, मंदिराचाच अविभाज्य भाग, म्हणजेच देवी आहे. देवीचं वास्तव्य त्या वारुळांत आहे. कोकणात वारुळ आणि सातेरी देवस्थान असे समीकरण दिसून येते. सातेरी देवी ही नागकन्या असल्याने कोकणात सातेरी देवीच्या मंदिरात मोठी वारुळे आढळतात.

मसुरे देऊळवाडा येथील माऊली

सतीश पाटणकर

निसर्गाच्या विविधतेने नटलेल्या मसुरे गावात देऊळवाडा येथील श्री माऊली मंदिर हे वारुळ असलेले मंदिर आहे. या मंदिराचं गाभारा प्रशस्त व चौकोनी असून त्यामध्ये श्री देवी माऊली वारुळ स्वरूपात आहे. वारुळाचा परीघ सुमारे २० फूट असून शेंड्याकडे निमुळती होत जाऊन तिची उंची १५ फूट आहे. नवरात्रौउत्सवा अगोदर वारुळ काळसर दगडी रंगाने रंगवून त्यावर चुन्याच्या उभ्या रेषा काढतात. येथे दसऱ्याला मोठा उत्सव होतो. 

—————————————————————————————