मालवणला सिंधुदुर्ग पाहून झाला की मग शहराच्या उत्तरेला असलेल्या कोळंबच्या किनाऱ्याची पुळण पाहायला जायचं. तिथूनच पुढं एखादा किलोमीटर उत्तरेला गेल्यावर सर्जेकोट बंदर लागते. तिथेच हा सिंधुदुर्गाचा सोबती असलेला उपदुर्ग सर्जेकोट आहे. अलिबागच्या कुलाबा किल्ल्याजवळ असलेल्या उपदुर्गाचं नावही सर्जेकोट आहे त्याच्याशी कधीकधी गल्लत केली जाते. हा किल्ला सिंधुदुर्ग किल्ल्यातून थेट दिसत नाही पण जिथं गड नदी समुद्राला जाऊन मिळते तिथं टेहेळणी करण्यासाठी नदीच्या मुखावरच किल्ल्याची बांधणी केली गेली आहे. आता किल्ल्यात वस्ती असून फारसं बांधकाम शिल्लक नाही. किल्ल्याचा दरवाजा मात्र तग धरून उभा आहे.
दरवाजाला लागून असलेली तटबंदी जांभा दगडाचे प्रचंड चिरे एकमेकांवर रचून बांधलेली दिसते. इथेही मध्ये काही जोडणी करणारे सिमेंटिंग मटेरियल चुना/ शिसे वगैरे वापरलेले दिसले नाही.
किल्ल्याच्या आजूबाजूला असणारा खंदक आज जवळजवळ बुजलेलाच दिसतो. किल्ल्याचे अवशेष पाहून झाले की सर्जेकोट बंदराकडे चालत जायचे. तिथं बसून खाडी आणि बंदरात नांगरलेल्या होड्यांचा देखावा पाहायचा.
इथंच गड नदी समुद्राला येऊन मिळते. याच नदीत पाणखोल आणि खोतजुवा नावाची बेटे आहेत. तिथं वस्ती आहे आणि निसर्गरम्य असे वातावरणही अनुभवता येते. नदीच्या पलीकडे तळाशील आणि तोंडवळीचा दांडा आलेला दिसतो.