कुंभार

कुंभारकला पर्यटकांसाठी आकर्षण ठरावे

Spread the love

सतीश पाटणकर

         त्रिपुरा राज्याने टेराकोटा माध्यमातून त्या राज्यात येणाऱ्या पर्यटकांना खेचले असून तीच गोष्ट राजस्थान राज्याने केली आहे. या दोन राज्यात तयार होणाऱ्या मातीपासून बनविलेल्या हस्तकलेच्या वस्तुंना प्रचंड मागणी असते. कर्नाटकातील खानापूर या गावात मातीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी पर्यटकांची रांग लागते. जर हे सारे राजस्थान, त्रिपुरा आणि कर्नाटकमध्ये  होऊ शकते तर ते कोकणात का होऊ शकत नाही याचा या समाजातील कारागीर आणि शिक्षित तरुण वर्गाने डोळसपणे विचारकरून त्या दृष्टीने मार्केटिंग करण्याची गरज आहे.. कुंभारकला हा आपला ‘कला-परंपरांचा वारसा’ अथवा ‘अमूर्त वारसा’ हा देखील आपल्या पर्यटनाचा एक भाग होऊ शकतो.

       युनेस्कोनेसुद्धा जगभरातील अशा वारशाची एक यादी प्रसिद्ध केलेली आहे. त्यात चालीरीती, परंपरा, कला, संगीत अशा गोष्टी येतात. की ज्या गोष्टी दिसत नाहीत पण अनुभवल्या जातात. आपल्या भटकंतीत आपण देखील कोकणातील अशा काही गोष्टींचा जाणीवपूर्वक समावेश करून घेऊ शकतो. सिंधुदुर्ग जिल्यातील दोडामार्ग तालुक्यातील आई आणि वेंगुर्ला  तुळस या दोन गावांची पॉटरी व्हिलेज म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाला पाठविला आहे.मुळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बराचसा भाग हा सावंतवाडी संस्थानाचा होता. सावंतवाडी संस्थानाला कलेचा फार मोठा वारसा लाभलेला आहे.आज कुंभार बांधव मातीच्या विटा,चुली भांडी,गणेश मूर्ती बनवितात .कोकणातील कुंभार समाज अनेक गावात विखुरलेला आहे. त्यांना या मातीतून हस्तकलेच्या वस्तुनिर्मितीचे प्रशिक्षण दिल्यास या समाजातील लोकांना रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होतील. त्यासाठी या समाजातील कलाकारांनी काळाची गरज ओळखून बदल घडवून आणण्याची गरज आहे.या संदर्भात माजगाव येथील मांजरेकर बंधू,भोगण  यांनी केलेले बदल कालानुरूप आहेत.

     भारतीय समाजव्यवस्थेचा मूळ घटक असलेला कुंभार समाज. त्यांच्या हातातील कौशल्य आणि कला हीच त्यांची ओळख. मोहेंजदडो व हडप्पा येथे झालेल्या उत्खननात त्यांनी घडविलेल्या मातीची भांडी व खेळण्यामुळे सिंधू संस्कृतीची ओळख पटण्यास मदत झाली. अॅल्युमिनीअम, स्टील, प्लॅस्टिकची भांडी बाजारात उपलब्ध होण्यापूर्वी प्रत्येकाच्या घरात, दैनंदिन उपयोगात मातीच्या वस्तूंचा वापर होत होता.

     औद्योगिकीकरण व यांत्रिकीकरणाने कुंभार समाजातर्फे निर्मित दैनंदिन वापराच्या वस्तू कमी झाल्या. कालौघात कुंभार समाजाला रोजगाराची अन्य साधने शोधावी लागली. असे असले तरी या समाजाच्या कलेचे महत्त्व कमी झालेले नाही. प्राचीन भारतीय कलेचा सांस्कृतिक वारसा जपणारा कुंभार समाज आजही आपले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत आहे. मातीशी नाळ जुडलेला हा समाज उदरनिर्वाहासाठी माठ, मडके, मूर्ती, कवेलू व विटा बनविणाऱ्या वेगवेगळ्या मातीकामाच्या वर्गात विभागला गेला आहे. उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आणि घशाला कोरड पडली की, डोळ्यासमोर येतो तो मातीचा माठ. असे असले तरी आता हे मातीचे माठ बनविणारे पारंपरिक कारागीर फारच कमी राहिले आहेत. या कलेत केवळ जुनीच पिढी शिल्लक राहिली आहे. नवीन पिढी शिक्षण घेऊन नोकरीला पसंती देत आहेत. परिणामी उत्कृष्ट कलेचा नमुना समजल्या जाणार्‍या कुंभार कामाला शासकीय मदत मिळण्याची गरज आहे, काळाच्या ओघात आधुनिक यंत्र आली आणि पारंपरिक पद्धती मागे पडू लागल्या.

      असे असले तरी ग्रामीण भागात आज देखील कुंभार समाजातील अनेकांनी आपली हस्तकला जपण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. याकरिता लागणारी माती जरी मोफत असली तरी अन्य साहित्य मात्र विकत घेऊनच ही कामे तयार करावे लागतात. तरीही माठ, महाड, तसेच बिरवाडीमध्ये औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे जमिनी शिल्लक राहिलेल्या नाहीत. बारा बलुतेदार पद्धतीतील व्यवसायापैकी कुंभार कला हा प्राचीन, परंपरागत व्यवसाय आहे. दुर्देवाने या कलेवर अवकळा आली. मात्र, या व्यावसायिक कलेला नवसंजीवनी देण्याच्या प्रयत्नातून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात ई-कुंभार ऑनलाईनची निर्मिती करण्यात आली. गेल्या काही वर्षात कुंभार समाज उपेक्षित जीवन जगत असून त्यांच्यातील कलेच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यांच्या कलेला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मुख्य बाजारपेठेत आणण्यासाठी ‘माती-आमची ओळख, आमचा विश्वास’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘ई-कुंभार’ ऑनलाईन बिजनेस पोर्टलद्वारे कुंभार बांधवांना व्यावसायिकदृष्ट्या नवसंजीवनी मिळणार आहे. त्यांचे उत्पादन, कलेला जागतिक स्तरावर हक्काचे व्यासपीठ मिळेल. या उपक्रमांतर्गत कुंभार समाजाला व्यावसायिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने प्रकल्प संचालक व ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशनचे सचिव अजित पारसे यांनी संकेतस्थळ तयार केले. www.ekumbhar.in या संकेतस्थळाचे लोकार्पण केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

       यामुळे अनेकांना माती देखील विकत घ्यावी लागत आहे. या संदर्भात मंडळाचे अध्यक्ष प्रा. गणपत शिरोडकर,प्रदेश उपाध्यक्ष यशवंत शेडेपुलकर ,कोकण कार्याध्यक्ष विलास गुडेकर ,अनिल शेटकर,खडपकर,सुहास पिकुलकर आदी पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. (लेखक मुख्यमंत्रांचे माजी माहिती अधिकारीआहेत )

———————————————————————————-