किल्ले नारायणगड आणि मनोहर-मनसंतोषगड

किल्ले नारायणगड आणि मनोहर-मनसंतोषगड.

Spread the love


सतीश पाटणकर      

         आंबोलीच्या अलीकडे गेळे गावाकडे जाणारा उजवीकडे फाटा आहे.. इथे पुढे २ किमी गेल्यावर ‘T’ रस्ता लागतो इकडे डावीकडे गेळे गाव तर उजवीकडे कावळेसाद कडे जाणारा रस्ता आहे. गेळे गावातून नारायणगडावर जाण्यास एक-दीड तास लागतात पण वाटाड्या पाहिजेच.गडावर अस्वल रान-डुक्कर यांचा मुक्त वावर असल्याचे गावकरी सांगतात. एक तास वाटाड्या मिळवण्यासाठी प्रयत्न केले पण.. उसतोडणीची कामे सुरु असल्याने.. वाटाड्या मिळवण्यात अपयशी ठरल्याने.. नारायणगडाचा बेत रद्द करून टाकला आणि कावळेसाद कडे निघालो.. कावळे साद हा आंबोली तील पावसाळी भटकंती मधला एक फेमस टप्पा.. इथून सह्याद्रीच्या दरी-खोऱ्याचे एक भव्य आणि अफलातून दर्शन घडते.. इथून पश्चिमेकडे पाहताना.. दुबाजूस डोंगर रांगा आणि मध्ये खोल दरी दिसते.. धबधब्याचे सुकलेले ओहोळ आणि खाली दरीत पसरलेली वनराई विलक्षण भासते.   

    कावळेसाद कडून डावीकडच्या डोंगररांगेतील तिसऱ्या डोंगराचे टोक म्हणजे नारायणगड.. तर उजवीकडे.. एका सुळक्याच्या मागे.. मनसंतोष गडाची कातळभिंत दिसते..थोडं डावीकडच्या डोंगरावर गेल्यास मनोहर-मनसंतोष हि जोडगोळी दिसते. कावळेसाद पॉइंट च्या पुढे एक गाव आहे.. तिथून खाली उतरून.मनोहर-मनसंतोष किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शिरशिंगे गावी जाता येते.

किल्ले महादेवगड

आंबोली गावातून पुढे आल्यास महादेवगड पॉइंट कडे अशी पाटी दिसते.. इथे उजवीकडे फाटा घ्यायचा.. साधारण दोन किमी जंगलातून गेल्यावर.. सरकारने बांधलेल्या सिमेंट च्या पायऱ्या उतरून महादेवगड च्या वरच्या नाकावर आपण पोहोचतो.. इथून खालच्या सोंडेला जोडून महादेवगडचा डोंगर आहे.. इथे उतरण्यासाठी मात्र.. सिमेंट पायऱ्या च्या आधी उजवीकडे एक वाट सिद्धेश्वर मंदिराकडे जाते.. तिथून महादेवगड पॉइंट चा डोंगर डावीकडे ठेवत.. खाली वळसा मारून महादेव गड आणि अलीकडच्या डोंगर यांना जोडणाऱ्या सोंडेवर पोहोचता येते.. गडावर सध्या काहीही अवशेष नाहीत.. पण इथला नजारा विलक्षण आहे.. महादेवगड पॉइंट वरून पारपोली घाटाची घनदाट जंगलातील बोडक्या  सोन्डेवरची वाट विलक्षण भासते.. महादेवगडाचे दुरून बर्डस आय दर्शन घेवून.आंबोली ते माणगाव ४० किमी आणि पुढे शिवापूर – ३५ किमी. मनोहरगडाकडे कूच केली..

किल्ले मनोहरमनसंतोषगड.

 शाळेतून समोर पाहताना उंच उठावलेला मनोहरगड दिसतो.. आणि त्या समोरची उजव्या अंगावरची सोंड.. हिच आपली वाट.. शिवापूर गावातून गडकरवाडी कडे निघायचं इथे किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी असलेल्या टेकडावर जनाय्यासाठी दोन वाटा आहेत.. एक गडकरवाडीतून जाणारी तर दुसरी थेट मधून जाणारी.. शिवापूर शाळेपासून पुढे गेल्यावर एक सिमेंट रस्ता उजवीकडे जातो.. इथून उजवीकडे जाताच एक ओढा पुलावरून पार करायचा आणि एक वाट डावीकडे रानात शिरते.. इथून मग उजवीकडे वर जायचं आणि मळलेल्या वाटेने साधारण अर्धा पाउण तासाची चढण पार करताच आपण एक माळावर येतो,, इथे डावीकडे एक वाट.. झाडी-झुडुपातून सोंडेवर जाते तिकडे निघायचं.. थोडी खुरट्या झाडामधील चढण पार करताच.. सोंडेवरून चढाई सुरु होते.. अर्ध्या तासाने.. बऱ्यापैकी.. सपाटी येते आणि वाट.. दुबाजूस दाट जंगल अशी पुढे जाते.. इथे साधारण १५-२० मिनिटे सपाटीवरून चालत गेल्यास.. कारवीचे जंगल सुरु होते.. आणि सोन्डेवरची चढाई.. पुढे वाट डावीकडे वळते आणि आपण एक २० मिनिटांचा ट्राव्हर्स मारीत.. मनसंतोषगडाच्या कातळभिंतीखाली पोहोचतो इकडे उजवीकडे तिरपे वर जाताच.. समोर कातळभिंत दिसते.. आणि आपण गडाच्या समीप येवून पोहोचतो.. इथे पुन्हा डावीकडे जाताच.. काही तुटक्या पायऱ्या दिसतात.. त्या चढण्यासाठी किरकोळ प्रस्तरारोहण तंत्र वापरावे लागते..     

  या पायऱ्या चढून उजवीकडे वर जाताच.. मनसंतोषगडाच्या कातळ भिंतीमध्ये खोदून काढलेल्या पायऱ्या डावीकडे वर कातळाला खेटून वर जाताना दिसतात.. हा जिना मात्र वाहून आलेल्या मातीने माखला होता.. कातळाच्या बाजूने पायऱ्यांचा दगड डोकं वर काढताना दिसला आणि दमाने पायऱ्या चढून वर जायचं.. इथे २० एक पायऱ्या चढून जाताच.. मध्ये साधारण पंधरा फुटाची वाट ढासळली आहे.. इथे.. पायऱ्या नाहीत.. तेंव्हा जीव मुठीत घेवून.. मुरमाड चिंचोळ्या पायवाटेने वर जायचं.. इथे चुकीला क्षमा नाही.. नजर हटी आणि दरीच्या भेटी असा बेमालूम जुल्मी असा हा टप्पा आहे.. तेंव्हा दमादमाने पाय टाकीत.. उजव्या अंगाच्या कातळाचा आधार घेत वर सरकायचं.. की आपण थोडं वर येतो साधारण शे-दीडशे फुट.. मग वाट पुन्हा उजवीकडे वळते आणि मनसंतोषगडाचा भग्न दरवाजा वर दिसू लागतो.. इथेही कातळाला चिटकून.. हळूहळू वर सरकायचं.. ३०-४० ओबडधोबड पायऱ्या चढून जाताच आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाजासमोर येवून पोहोचतो.. इथे शिवरायांचे स्मरण करायचे आणि जोरदार शिवगर्जना करीत.. किल्ल्यावर दिमाखात पाऊल टाकायचं.. किल्ला सर करण्याची कामगिरी फत्ते झालेली असते पण.. आता निसरड्या मुरमाड वाट उतरण्याचे दिव्य ओंजळीत येवून पडलेले असते.. पुढचे पुढं म्हणून गड धुंडाळायला निघायचं.. डाव्या अंगाने.. डावीकडे.. खुरट्या जंगलातून पुढे जाताच.. डावीकडे प्रशस्त तटबंदी खालच्या अंगाला बांधल्याचे दिसते.. उजवीकडे.. एक भक्कम कोठार दिसते.. तिकडे निघायचं.. कोठाराच्या पुढ्यातून जाताच एक ओढा पार करायचा आणि मग उजवीकडे एक भलेमोठे झाड आहे.. हे झाड या गडावरचे.. एकमेव मोठे झाड.. तिकडे काय हे ते पाहायला निघालो.. झाडाखाली एक भग्न मूर्ती आणि दगडी समई आहे.. इथे लंचब्रेक उरकण्यात आला.. मंडळी.. पायवाटेचे थरार अनुभवून गात्रगलीत झालेली दिसली.. पायवाटेचे भय त्यांच्या नजरेत स्पष्ट दिसत होतं.. गडाच्या पूर्वेकडील बाजूस.. विहीर आहे आणि दक्षिणेकडे.. मनोहरगड.. तिकडे निघालो.      
   

पुन्हा ओढ्यापाशी पोहोचायचं.. तिथून उजवीकडे निघायचं.. थोडं खडकाळ वाटेने जाताच समोर एक इवलंसं झाड आणि एक बांधीव विहीर दिसते.. विहिरीतून पाणी काढण्यासाठी पोहरा पाहून.. एकदा पाणी शेंदून.. गडावरचं पाणी पिवून तृप्त व्हायचं.. झेंडा बुरुजाकडे पाठ करायची आणि मागे तटबंदीच्या कडेकडेने पुढे निघायचं ही वाट आपल्याला मनोहरगड आणि मनसंतोषगड यांना जोडणाऱ्या दरीकडे घेवून जाते.. पंधरा मिनिटात आपण.. मनोहरगडाच्या समोरील बाजूस असणाऱ्या मनसंतोषगडाच्या खांद्यावर जावून पोहोचतो.. इथे अलीकडे एक टेपाड आहे .. त्यावर चढून मनोहरगडाचा एक सुंदर नजरा पहायचा.. डावीकडे.. कावलेसाद चा कडा पुसटसा दिसत राहतो.. आणि नारायणगड दिमाखात उभा ठाकलेला दिसतो.. या गडावरून त्य गडाकडे एक कटाक्ष टाकायचा आणि पुन्हा पाण्याच्या बारमाही विहिरीपाशी येवून पोहोचायचं..  

      इथे विखुरलेल्या सावलीत.. दोन क्षण रेंगाळून.. गडाच्या पश्चिमेकडील टोकाकडे एक चक्कर मारायची .. कोकण प्रदेशावरून एखाद्या घारीसारखी नजर फिरवायची आणि पुन्हा ओढा.. कोठार.. आणि खाली दिसणाऱ्या लक्षवेधी तटबंदीकडे निघायचं.. या तटबंदी मध्ये बांधलेल्या गुप्त खोल्या.. शौचालये पाहून गड उतरण्यास सुरुवात करायची.. आता.. गडभ्रमंतीचे धाडस मनात चिंतेचे फुत्कार सोडत असतात.. त्याकडे दुर्लक्ष करीत.. दरवाजापाशी यायचं.. आणि मनाचा हिय्या करून.. वाट उतरण्यास सुरुवात करायची.. १२ पैकी ९ जण फर्स्ट टायमर गड क्लायंबर असल्याने.. मुरमाड प्याच वर कृष्णा ला दोर लावण्यास सांगितले.. आणि एक एक शिडाचे जहाज गडावरून उतरू लागले.. दरवाजाजवळील कातळ पायऱ्या शेजारी पायाखाली दिसणारे दरीचे दृश्य.. मंडळाच्या काळजाचा ठोका चुकवीत होते.. असे दृष्टीभय क्र. १ इथे आहे.. हा टप्पा पार करताच.. तुटलेल्या वाटेवरून.. ४०-५० फुटांचा फॉल उजवीकडे असताना.. मुरमाड वाटेवरून घसरगुंडी न होऊ देता सहीसलामत पायऱ्या पाशी पोहोचणे एक दिव्यच होते.. म्हणून मंडळाला बूट काढून उतरण्याचा सल्ला दिला.. काही शिडाची जहाजे.. या युक्तीने पायऱ्यापाशी सुखारून पोचली.. तर काही लटपट लटपट करीत.. दोराला धरून मार्गी लागली.. एकदाचा हा जीवघेणा टप्पा पार केला आणि एक एक करीत.. पायऱ्या उतरू लागलो.. पुन्हा तुटलेल्या पायऱ्यांचा टप्पा.. पार करताच डावीकडे.. निघालो.. इथे उजवीकडची वाट आपल्याला मनोहरगडाकडे घेवून जाते.. पुन्हा कधीतरी म्हणून आल्या पावली माघारी फिरायचं.. कातळभिंतीला डावीकडे ठेवत तिरपं खाली उतरायचं.. मग.. खाली दाट जंगलात पुन्हा डावीकडे फिरायचं आणि.. मग साधारण ५००-६०० मिटर वर उजवीकडे कारवीच्या वनातून खाली उतरणी ला सुरुवात करायची .. .. कारवीचे बन संपताच.. सोंडेवरच्या सखल पायवाटेवरून.. दुबाजूस जंगलाचा थरार अनुभवीत.. उजव्या अंगाच्या पायवाटेने आधी वस्तीवर मग खालच्या शिवापूर गावात पोहोचायचं..


असा मनोहर – मनसंतोष गडाचा थरार अनुभवून शिवापूरात दाखल झालो.. इथे चौकशी करता.. इथून एक शोर्टकट गाडी वाट.. गोठवे गावात जात असल्याचे कळले.. इथून गेल्यास कमीत कमी ४० किमी अंतर वाचणार असल्याने.. याच रस्त्याने जायचे ठरले.. दत्तमंदिराच्या समोरून हा रस्ता घाटवाटेने आपल्याला शिरशिंगे गावाकडे घेवून जातो.शिरशिंगे – आंबोली

पारगड , सिंधुदुर्ग,