मोती तलाव सावंतवाडी

मोती तलाव

Spread the love

 

सतीश य. पाटणकर


  ‘सुंदरवाडीपरमेश्वराला पहाटे पडलेलं एक सुंदर स्वप्न. ऐतिहासिक गौरवशाली परंपरा लाभलेले हे संस्थानकालीन शहर. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी  ‘रामराज्यम्हणून उल्लेख केलेल्या ३५० वर्षाचा कलात्मक संस्कृतीचा देदीप्यमान इतिहास लाभलेल्या या सावंतवाडी संस्थानच्या गौरवशाली इतिहासाची सुवर्णपाने चाळण्याचा हा प्रयत्न ..
निसर्गरम्य सावंतवाडीत आल्या आल्या समोर दिसणारा मोती तलाव आणि संध्याकाळच्या सुरम्य अशा वातावरणातच सावंतवाडी च खर वैभव दडलय. संध्याकाळ च्या वेळी कधी मोती तलावाच्या कट्यावर न बसलेला सावंतवाडीकर तुम्हाला शोधूनही सापडणार नाही.

      तलावात पूर्वी कधी मोती सापडले होते म्हणून त्या तलावास “मोती तलाव” असे नाव पडले. चारही बाजूने सह्याद्रीच्या पर्वत रांगानी वेढलेले सावंतवाडी शहर आणि शहराच्या मध्यभागी मोती तलाव. सध्या तलावात बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. तलावात कारंजे सुध्दा बसविण्यात आलेले आहेत. तसेच संपूर्ण तलावाच्या कडेला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.मोती तलाव ही सावंतवाडी शहराची ओळख म्हणता येईल. एक रात्र मुक्काम करून सावंतवाडी पूर्ण फिरता येते. येथे राहण्यासाठी मोठे हॉटेल्स तसेच निवास – न्याहारी योजनाही उपलब्ध आहेत. मालवणी नाश्ता व जेवण येथे उत्तम मिळते. सावंतवाडी स्टेशनलगत तसेच मोती तलावाशेजारीही हॉटेल्स उपलब्ध आहेत.लेखक वि. स. खांडेकर, क्रिकेटपटू विजय मांजरेकर, क्रिकेटपटू संजय मांजरेकर, संगीतकार वसंत देसाई, ’चला हवा येऊ द्या’ फेम विनोदी नट भालचंद्र ऊर्फ भाऊ कदम हे सगळे मान्यवर सावंतवाडीच्या शिरपेचातील आहेत.

     सावंतवाडी मधील जगप्रसिद्ध लाकडी खेळण्यांची बाजारपेठ. भारतातील लाकडी खेळण्यांचे मुख्य मार्केट. सावंतवाडी संस्थानाला ३५० ते ४०० वर्षांचा इतिहास आहे. जवळ जवळ तेव्हा पासूनच हि कला येथे जोपासली जात आहे. सावंतवाडीच्या मालसावंत भोंसले घराण्याने नेहमीच कला आणि शिक्षणाला प्रोत्साहन आणि राजाश्रय दिला आहे.

      शहर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होत आहे. येथे शिल्पग्राम, जगन्नाथराव भोसले उद्यान आदी पर्यटन प्रकल्प सुरू झाले आहेत. आकेरी येथील रामेश्वराचा कलात्मक लाकडी रथ श्रीराम महाराजांनी बनवून घेतला असल्याचे दाखले मिळतात. तर पहिल्या खेमसावंतांच्या काळात माठेवाडयातील आत्मेश्वर मंदिरातील बारमाही जिवंत पाणी असलेली तळी बांधण्यात आली होती. त्याकाळी त्या ठिकाणी असलेल्या घनदाट जंगलात दामोदर भारती या साधूपुरुषाचे वास्तव्य होते. खेमसावंत शिकारीला गेले असताना या साधूपुरुषानेच त्रिशूल जमिनीत मारून पाणी काढून राजांची तहान शमविली. तेथेच पुढे तळी बांधण्यात आली. आजही त्यातून अखंडपणे पाणी पाझरताना दिसते. दामोदर भारती यांची मंदिरालगत असलेली समाधीही या इतिहासाची साक्ष ठरते.

सावंतवाडी शहर व इतर गावे निसर्गसौंदर्याने नटलेली आहेत.

      सावंतवाडी शहराच्या मधोमध सुंदर मोती तलाव आहे. संध्याकाळच्या सुंदर रोषणाईत हा तलाव आणखीच खुलुन दिसतो. संस्थानाच्या काळात 1874 मध्ये मोती तलावाची निर्मिती झाली. राजवाड्यासमोरील 31 एकराच्या परिसरात धरण बांधण्यात आले. चारी बाजुंनी भक्कम दगडांनी बांधकाम करण्यात आले. पाणी ठेवण्यासाठी मुशी ठेवण्यात आल्या. अशाप्रकारे मोती तलावाची निर्मिती झाली. त्याचबरोबर लगतच्या बाजारपेठेलाही भेट देऊन वेळ घालवता येतो.

नरेंद्र वनोद्यान:   
        सावंतवाडी शहरात समुद्रसपाटीपासुन 300 मीटर उंचीवर निसर्दसौंदर्याने नटलेले नरेंद्र वनोद्यान वसले आहे. या डोंगरावरून वेंगुर्ले समुद्र किनाऱ्यापर्यंतचा परीसर नजरेस पडतो. या डोंगरावर लहानमोठे धबधबे, संस्थानकालीन विहीरी, तसेच प्राचीन मारूती मंदिरदेखील आहे.

जगन्नाथराव भोसले उद्यान
     शहराच्या मध्यभागीच हे सुंदर उद्यान आहे. विरंगुळ्यासाठी येथे लहानथोरांची कायमच गर्दी असते. सुंदर रचना, विविध झाडं, खेळण्यांचा आनंद घेण्यासाठी या उद्यानात एखादा फेरफटका नक्की मारावा.

———————————————————————————————