नापणे धबधबा सिंधुदुर्ग

नापणेचा धबधबा आणि श्री महादेव मंदिर

Spread the love

     तरळयावरून वैभववाडीकडे जाताना वाटेत नाधवडे लागते.या गावात गंगेचा शोध घेण्यासाठी जमीन खोदण्याची गरज नाही. कारण येथे गंगा स्वत:हून प्रकट झाली आहे. हजारो वर्षापासून येथे स्थिरावलेल्या गंगेच्या सान्निध्यातून गोठण नदीचा उगम तर होतोच, पण सोबत नापणेच्या डोहात बारमाही धबधबा खळाळताना दिसतो.उमाळे जिथे प्रकटले आहेत, त्याच परिसरात महादेवाचे मंदिर आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. मंदिरात पोहोचायचं झाल्यास गोठण नदी पार करावी लागते. अलीकडे पावसाळा सोडून उरलेल्या हंगामामध्ये भक्तांना मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साकव (लाकडं रचून बांधलेला कच्चा पूल) बांधला जातो.

       महादेवाच्या माळावरून गोठणमधून बागडत जाणारा हा उमाळा पुढे नाधवडेच्या हद्दीपर्यंत सुसाट वेगानं धावत हद्दीवरून उडी मारतो. तो जेथे उडी मारतो, ते स्थळ नापणेचा धबधबा म्हणून सर्वाना परिचित आहे. या धबधब्याचा वरचा भाग म्हणजे नाधवडे आणि जिथे पाण्याचा झोत पोहोचतो, तेथून नापणेची हद्द सुरू होते. सहयाद्रीच्या द-याखो-यात पावसाळ्यात हजारो धबधबे दिसतात. पावसाळा संपला की, धबधबेही निरोप घेतात. पण नापणेच्या धबधब्यावरचं पाणी मात्र बारमाही असतं. नापणेचा धबधब्याचा प्रवाह अंगावर झेलणं, हे सोपं नाही. त्याचं दर्शन घेता येत मात्र सगळ्यांनाच तो अंगावर झेलता येणं सोपं नाही. एका गावाचं पाणी दुस-या गावाच्या हद्दीत उभं राहून अंगावर घ्यायचं, तितकं सोपं नाही, हे इथे आल्यानंतरच प्रत्यक्ष अनुभवता येतं.

     नाधवडे गावात एकूण १२ मंदिरं आहेत. ब्राह्मणदेव, नागेश्वर, धावगीर, महादेव, विठ्ठल-रखुमाई, चव्हाटी, सिंहासन, गांगोदेव, स्थानेश्वर, आदिनाथ, हिरवाई या सर्वच देवतांकडे वर्षाचे बारा महिने काहीना काही उत्सव सुरू असतो.

नाधवडे गावात असलेल्या विठ्ठल मंदिरात विठ्ठल-रखुमाईच्या चरणावरच गंगा प्रकट झाली आहे. विठ्ठल-रखुमाईच्या पाषाणी मूर्तीदरम्यान अंतर आहे आणि या दोन्ही अंतरावरून दोन झरे वाहतात. जवळसपास ५०-६० वर्षापूर्वी मंदिराच्या जीर्णोद्धारावेळी विठ्ठल-रखुमाईचे चरणस्पर्श करून येणा-या गंगेच्या प्रवाहाला तळीत (बांधलेल्या हौदात) उतरविण्यासाठी गावच्या जहागीरदारांनी प्रयत्न केले. कोल्हापूर संस्थानचे बावडेकर येथील जहागीरदार. नाधवडेतील हिरवाईमध्ये अनेक शतकापासून असलेली त्यांची बाग आजही पाहायला मिळते.

     या धबधब्याचा उगम नाधवडे या गावी झाला आहे. तळेरेपासून १६ कि.मी. वर काहीसा आडबाजूला हा धबधबा आहे.  हा धबधबा बारमाही कोसळत असतो. पाण्यामध्ये गंधकाचा अंश असल्याने येथील पाण्याने स्नान केल्यास त्वचाविकार बरे होतात असे आरोग्यतज्ञांचे मत आहे. त्यामुळे पर्यटकांसोबत त्वचा विकाराने ग्रासलेले लोक येथे भेट देत असतात.

—————————————————————————————

 फोटो : श्री नरेंद्र सावंत, वैभववाडी

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *