अजिंक्य, अभेद्य पारगड

Spread the love

सतीश पाटणकर

      सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मुख्य रांगेमध्ये हा किल्ला वसला आहे. या रांगेत सर्वांत दक्षिणेकडील किल्ला म्हणजे पारगड किल्ला. किल्ले पारगड महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवरील कोल्हापूर जिल्ह्य़ाचा दक्षिण टोकावरील चंदगड तालुक्याच्या सरहद्दीवर असलेला एक नितांतसुंदर किल्ला. हिरव्यागार वनराईच्या कवेत, विविधतेने नटलेल्या घनदाट जंगलाच्या सान्निध्यात विसावलेला किल्ले पारगड इतिहासाचा साक्ष देत आजही दिमाखात उभा आहे.

        तानाजी मालुसरे यांनी सिहंगड किल्ला माघ वद्य नवमी इ. स. १६७१ मध्ये जिंकला. यावेळी झालेल्या युद्धात तानाजींना मृत्यु पत्करावा लागला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी पारगड किल्ला बांधला व त्याची जबाबदारी किल्लेदार म्हणून तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांच्याकडे सोपवली. त्यावेळेस काही काळ महाराजांनी या गडावर मुक्काम केला होता. महाराजांनी किल्लेदार आणि तेथील मावळ्यांना आज्ञा केली की, ‘जोपर्यंत आकाशात चंद्र, सूर्य आहेत तोपर्यंत हा गड जागता ठेवा.’ ही आज्ञा राजाज्ञा होती.

      समुद्रसपाटीपासून ७३८ मीटर उंचीवर वसलेल्या पारगडास भेट देण्यासाठी कोल्हापूरहून चंदगड गाठावे लागते. चंदगड ते पारगड हे अंतर ३० किलोमीटर. चंदगडहून पारगडजवळच्या इसापूर गावासाठी दुपारी १२ वाजता बस सुटते. ही चुकल्यास मात्र संध्याकाळपर्यंत बस नाही. इसापूर गावातून पारगड साधारण पाऊण तासाच्या चालीवर. पण आजूबाजूच्या निसर्गरम्य वातावरणामुळे मन प्रसन्न होत असते. जवळ येताच हिरव्यागार दरीतून उठावलेला पारगडाचा डोंगर दिसू लागतो आणि आपल्या पावलांस आपोआपच गती येते.
गडावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग केला आहे. या वाटेवरच जुन्या दरवाजांचे अवशेष दिसतात. पुढे शिवकालीन जांभ्या दगडात बांधलेल्या २०० पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढून गडावर प्रवेश करताच समोर त्या तोफा आणि डौलाने फडकणारा भगवा ध्वज आपले स्वागत करतो.
      तब्बल ४८ एकर क्षेत्रफळाच्या दक्षिणेवर पसरलेलय़ा पारगडाच्या पूर्व-पश्चिम आणि उत्तरेला नैसर्गिक अशी ताशीव कडय़ाची तटबंदी असून, दक्षिणेला थोडय़ा उतारानंतर पुढे प्रचंड खोल दरी आहे. या भक्कम नैसर्गिक संरक्षण रचनेमुळे व गडावरील इमानी मावळय़ांमुळे याच्या निर्मितीपासून पुढे तब्बल १८१ वर्षे पारगड अजिंक्य राहिला. शिवरायांनी हा किल्ला बांधून याची वास्तुशांती केली व गृहप्रवेश केला आणि इथल्या मावळय़ांना राजांनी आज्ञा दिली. ‘चंद्र, सूर्य गगनी तळपताहेत तोवर गड जागता ठेवा!’ आणि शिवरायांच्या माघारी त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे ३४० वर्षे हा गड त्या शूर मावळ्यांच्या वारसांनी आजही जागता ठेवलाय.   

     गडावरच्या मावळ्यांनी आणि किल्लेदारांनी आजतागायत पारगड जागता ठेवला आहे. तानाजी मालुसरे यांचे अकरावे वंशज बाळकृष्ण मालुसरे तसेच शेलारमामांचे वंशज कोंडीबा शेलार आणि त्या काळातील मावळ्यांचे वंशज आजही अनंत अडचणींना तोंड देत गडावर वास्तव्य करून आहेत. इ.स. १६८९ मध्ये औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम याने पारगड जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्याला या मावळ्यांनी दाद लागू दिली नाही.

      डाव्या हातासच मारुतीचे मंदिर आहे. या मंदिरासमोरच एक समाधी आहे. ही कुणाची याची मात्र इतिहासात नोंद नाही. येथून थोडय़ा अंतरावरच पारगडावरील लोकवस्ती सुरू होते. मळलेल्या पायवाटेने पुढे गेल्यावर आपण पारगडाच्या मध्यवस्तीत असलेल्या शाळेसमोर येऊन पोहोचतो. शिवछत्रपतींचा पुतळा इथे आपले स्वागत करतो. थोडय़ा अंतरावरच भवानी मातेचे जीर्णोद्धारित मंदिर आहे. भवानी मातेची काळय़ा पाषाणातील मूर्ती देखणी, शस्त्रसज्ज, तेज:पुंज अशी आहे. तिला पाहताच प्रतापगडावरील भवानीदेवीची आठवण होते. या मंदिराच्या मंडपात शिवकालातील प्रसंग दाखविणारी चित्रे, तसेच मावळ्यांचे, संतांचे पुतळे आहेत. या सर्वामुळे या मंदिरास एका छोटय़ा संग्रहालयाचे स्वरूप आले आहे. 
        पारगडास फेरफटका मारू लागलो, की गुणजल, महादेव, फाटक, गणेश असे चार तलाव दिसतात. या बरोबरच गडावर शिवकालीन अशा १८ विहिरीही आहेत. पण त्यापैकी बऱ्याच बुजलेल्या आहेत. मालेकर, फडणीस, महादेव, माळवे, भांडे, झेंडे नावाचे बुरुज भेटू लागतात. गडाच्या उत्तरेकडील बाजूस महादेव मंदिर आहे. या मंदिराजवळून खालच्या दरीतले घनदाट जंगल पाहणाऱ्या खिळवून ठेवते.गड फिरण्यास दोन-एक तास पुरेसे होतात. गडावर मुक्कामासाठी शाळा किंवा भवानी मंदिराशेजारील खोली उपयोगाची आहे. आगाऊ कल्पना दिल्यास गावातील दुकानात चहा- फराळाची सोय होऊ शकते. पारगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांचे अकरावे वंशज मालुसरे, शेलार मामांचे वंशज शेलार, गडावर झेंडा लावण्याचे काम असणारे झेंडे शिवकालातले तोफखान्याचे प्रमुख विठोजी मावळय़ांचे वंशज माळवे, घोडदळाच्या पथक प्रमुखाचे वंशज नांगरे व गडक ऱ्यांचे वंशज शिंदे अजूनही राहतात. पण गडावर उत्पन्नाचे कोणतेच साधन नसल्यामुळे गडावरील बरेच लोक सैन्यभरती, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने परगावी गेलेले आहेत.

            दरवर्षी माघ महिन्यात देवीचा उत्सव असतो. तेव्हा ७ दिवस गडावर नाटक, गोंधळ असे वेगवेगळे कार्यक्रम असतात. त्या वेळी मात्र वर उल्लेख केलेल्या सर्व घराण्यातील लोक आपणास गडावर भेटतात. सध्या तानाजीचे वंशज मालुसरे बेळगावला राहतात. त्यांच्याकडे तानाजी मालुसरे यांची तलवार, सिंहगडावर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यावर शिवरायांनी आपल्या गळ्यातील समुद्र कवडय़ाची माळ, तानाजींच्या देहावर ठेवली होती ती कवडय़ाची माळ व मालुसरे घराण्याचा मूळ पुरुष रायबाजी बिन तानाजी मालुसरे यांची अस्सल वंशावळ अशा इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या वस्तू त्यांनी आपल्या प्राणापलीकडे जपून ठेवल्या आहेत. पारगडाच्या इतिहासावर नजर टाकल्यास गोव्याच्या पोर्तुगीजांवर वचक ठेवण्यासाठी शिवरायांनी इसवीसन १६७६ साली या गडाची निर्मिती केली असे आढळते. पारगडचा पहिला किल्लेदार म्हणून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायाजी मालुसरे यांची शिवरायांनी नेमणूक केली. काही दिवस स्वत: महाराज या गडावर मुक्कामास होते,. पुढे इसवी सन १६८९ मध्ये शहजादा मुअज्जम व खवासखान याने पारगड घेण्यासाठी गडाशेजारच्या रामघाटात तळ ठोकला. पण गडावरील केवळ पाचशे सैनिकांनी मुघल सैन्यावर छुपे हल्ले करून त्यांना पुरते हैराण केले. शेवटी खवासखानने सावंतवाडीच्या खेमसावंताना कुमक घेऊन येण्यास सांगितले. पण गडावरील सैन्याने त्यांनाही दाद दिली नाही. अखेर कंटाळून खवासखान रामघाट मार्गे कोकणात उतरला आणि मोघलांनी पारगडासमोर सपशेल हार पत्करली. याच लढाईत गडावरील तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे धारातीर्थी पडले. त्यांची समाधी आजही गडावर आहे.

        पुढे पारगड करवीरकर छत्रपतींच्या ताब्यात गेला. नंतर मराठा राज्य संपून इंग्रज अंमल गडावर चालू राहिला, तरीही गडावरील लोक गडावरच राहिले. इंग्रजांनी त्यांना मासिक तनखेवजा पगार सुरू केला. हा पगार बेळगाव मामलेदार कचेरीतून १९५४ पर्यंत त्यांना मिळत असे.       असा हा इतिहाससंपन्न किल्ले पारगड जुन्या अवशेषांनी व अजूनही नांदत्या गडक ऱ्यांच्या घरांनी जागता असून, निसर्गानेही संपन्न आहे. पारगडाभोवतीचे जंगल नानाविध वृक्षराजींनी बहरलेले असून, आजही त्यात जंगली जनावरे आहेत. या हिरवाईमुळे आपण कोणत्याही ऋतूत गडास भेट देऊ शकतो.

—————————————————————————————