bhogawe-beach-sindhudurg

शाश्वत पर्यटन हाच पर्याय

Spread the love

सतीश पाटणकर

निसर्गाच्या सहवासात आनंदाचे क्षण घालविण्याची आणि नवनवीन कला, संस्कृतीविषयी जाणून घेण्याची माणसाची मुलभूत प्रवृत्ती पर्यटनाचा मूळ आधार आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला तेवढेच महत्व आहे. आज वेगवान दळणवळणाच्या साधनाने जग जवळ आले असताना देशाबरोबरच बाहेरचे जग जाणून घेण्याच्या माणसाच्या ओढीने हे क्षेत्र सातत्याने विस्तारते आहे.कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाची भूमिका महत्वाची आहे.
पर्यटन हा जगातील रसायने आणि इंधनानंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा व्यवसाय आहे. जगभरातील अनेक नागरिकांसाठी उत्कर्षाचे साधन आणि जीवनाची आशा म्हणून या क्षेत्राचे मोठे योगदान आहे. पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांवर अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. वाहतूक, हॉटेल्स, मनोरंजन आदी व्यवसायही पर्यटनाशी जोडले गेले आहेत.पर्यटन व्यवसायामुळे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरण विषयक विकास होण्याबरोबरच पर्यटनस्थळ परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनमानातही बदल घडून येतो. पर्यटकाला आवश्यक असणारी निवास, भोजन, वाहतूक, माहिती, मनोरंजन आदी व्यवस्थेसोबतच त्या भागातील उत्पादनांदेखील मागणी निर्माण होते. सांस्कृतिक आदानप्रदानाच्या माध्यमातून नागरिकांना एकमेकाशी जोडण्याचे कामदेखील पर्यटनाच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे पर्यटन विकासात नागरिकांचा जेवढा सहभाग वाढेल, तेवढेच त्या भागातील अर्थकारणालादेखील गती मिळते.
पर्यटनाबाबत विकासाच्या कल्पना मांडतांना त्या भागातील खास खाद्यसंस्कृती, पारंपरिक कला, साहित्य, लोकजीवन, निसर्ग याचा फारसा विचार केला जात नाही. पर्यटकांसाठी चांगल्या सुविधांएवढेच त्यांना नव्या जगाचे दर्शन होणे आणि रोजच्या जीवनापेक्षा नवा अनुभव मिळणे महत्वाचे असते. पाश्चात्य राष्ट्रांनी आपल्या परंपरेच्या खुणा याचसाठी खासकरून जपल्या आहेत आणि त्याचेच मार्केटींग उत्तमरित्या केले जाते.
नाशिक जिल्ह्याचा विचार करता पावसाळी पर्यटन असो अथवा सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन, नाशिकला पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. कृषि पर्यटनाबाबतही जिल्ह्यात खूप मोठी संधी आहे. राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेमार्ग आणि मुंबईशी असलेली समिपता लक्षात घेता नाशिकला पर्यटन विकासाच्या अमर्याद संधी आहेत. या संधीचा उपयोग करून घेत जिल्ह्याच्या विकासालाही गती मिळू शकते.
जागतिक पर्यटन संघटनेचे महासचिव तालेब रिफाई यांचा पर्यटकांना सुंदर संदेश आहे ‘निसर्ग, संस्कृती आणि यजमान यांचा सन्मान करा, तुम्ही अधिक चांगल्या विश्वाचे दूत बनू शकता’. ही भावना पर्यटकांपुरती मर्यादीत न राहता पर्यटनस्थळ परिसरातील नागरिकांनीदेखील स्वागत, सन्मान आणि सुविधा या तीन बाबी लक्षात घेतल्यास पर्यटनाच्या माध्यमातून अपेक्षित विकास शक्य आहे.

वास्तविक, शाश्वत पर्यटन हा खूप व्यापक विषय आहे. आता प्रवासाचंच बघा. आत्ताच्या काळात आपण मुळात पर्यटन करतो, तेव्हा कोणत्या ना कोणत्या वाहनाचा वापर करतो; त्यामुळे प्रदूषण होतंच. त्यातही आपल्याला हवं तिथं आणि हवं त्या वेळी फिरता यायला हवं म्हणून सार्वजनिक वाहनांऐवजी भाड्याच्या का होईना, पण खासगी गाड्या घेऊन पर्यटनाला जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हा एक मुद्दा लक्षात घेतला, तर संपूर्णतः शाश्वत पर्यटन कधीच शक्य नाही, निदान अपारंपरिक ऊर्जेवरची वाहनं सर्रास वापरात येईपर्यंत तरी शक्य नाही, हे नक्की; पण मग आपल्या हातात काय आहे, ते आता पाहू या.

फक्त कोकणच नव्हे, तर कोणत्याही ठिकाणी पर्यटनाला गेलं, तर धिंगाणा घालण्याची आणि बेजबाबदारपणे कचरा करण्याची प्रवृत्ती अलीकडे खूपच वाढीला लागली आहे. त्याची उदाहरणं वेळोवेळी दिसतात. रस्त्याच्या किंवा रेल्वेमार्गाच्या शेजारी असलेला प्लास्टिकचा कचरा ही तर अगदीच ‘नॉर्मल’ गोष्ट म्हणावी, असा कचरा गड-किल्ल्यांपासून सागरतळापर्यंत आणि नदीकिनाऱ्यापासून बागांपर्यंतच्या सर्व प्रकारच्या पर्यटनस्थळी किंवा त्याच्या आजूबाजूला सहज दृष्टीला सापडतो. रस्त्याच्या बाजूला असलेल्या आडोशाला किंवा जवळच्या जंगलात, घाटात दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळणं, ही तर आता नित्याचीच बाब होऊन बसली आहे. अलीकडेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमध्ये काही तरुण मच्छिमारांनी स्वतःच पुढाकार घेऊन सागरतळाशी असलेला कचरा साफ करायची मोहीम हाती घेतली होती. त्यात त्यांना कित्येक किलो कचरा सापडला. मच्छिमारांच्या तुटलेल्या जाळ्या त्यात होत्याच; पण प्लास्टिक कचरा आणि दारूच्या बाटल्या अशा कचऱ्याचं प्रमाणही खूप मोठं होतं. त्यामुळे प्रवाळांच्या दुर्मीळ जाती, वेगवेगळ्या प्रकारचे मासे यांचं प्रमाण कमी झाल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं आहे.
वेळोवेळी वेगवेगळ्या संस्थांमार्फत गड-किल्ले आणि अन्य ठिकाणी राबवल्या जाणाऱ्या स्वच्छता मोहिमांतही भरपूर कचरा गोळा होत असल्याचं दृश्य दिसतं. या मोहिमा तरुणाई स्वतःहून पुढाकार घेऊन राबवते, ही चांगलीच गोष्ट; पण अशा मोहिमा राबवून कचरा साफ करावा लागतो आणि या मोहिमा पुन्हा-पुन्हा राबवाव्या लागतात, ही नक्कीच दुर्दैवी गोष्ट आहे. 
यावर कितीही जनजागृती केली, तरी प्रत्येक जण स्वतःपासून बदलाची सुरुवात करील, तेव्हाच काही तरी फरक दिसेल… आणि हे बदल अगदी सोपे आणि सहज करता येतील, असे आहेत. आपल्यापैकी प्रत्येक जण कुठे ना कुठे तरी प्रवास करतो, पर्यटन करतो, फिरायला जातो. या वेळी प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, कचरा इकडे-तिकडे टाकून न देण्याचं जरी प्रत्येकानं ठरवलं ना, तरी परिस्थितीत नक्की खूप फरक पडेल. समजा, अगदी कुठे कचरापेटी नाही सापडली, तर हा कचरा काही काळ स्वतःच्या बॅगेत सांभळणंही काही अवघड नाही.
शाश्वत पर्यटनाचाच एक वेगळा भाग म्हणजे स्थानिक संस्कृती, कला, खाद्यसंस्कृती यांच्या जपणुकीला हातभार लावणं. म्हणजे तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी पर्यटनाला गेलात, तर तिथं जाऊनही कुठलं तरी बाटलीबंद शीतपेय पिण्यापेक्षा स्थानिक उत्पादकांनी तयार केलेलं फळांचं सरबत प्यायलात, तर त्यांना चार पैसे मिळतील आणि त्या फळांची शेती टिकून राहील. एखाद्या छोट्या शहरात जाऊनही तुम्ही भूक भागवण्यासाठी प्रख्यात मल्टिनॅशनल कंपनीचा पिझ्झा, नाही तर बर्गरचं सेंटर शोधलंत, तर तुमच्या पर्यटनाचा स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांच्या उत्पादकांना काय हो फायदा? हीच गोष्ट बहुतांश पर्यटकांनी केली, तर आणखी काही वर्षांनी तो उत्पादक, ते पदार्थ, ती संस्कृती या गोष्टी हळूहळू मागे पडत जातील. थोडक्यात, पर्यटकांनी एखाद्या ठिकाणी पर्यटनाला गेल्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत राहिली, तर त्या ठिकाणचं पर्यटन शाश्वत राहणार ना!
पर्यटनाच्या ठिकाणी स्थानिक कलांचे काही कार्यक्रम होत असतील, स्थानिक वैशिष्ट्यांची काही प्रदर्शनं असतील, तर पर्यटकांनी त्यांना आवर्जून भेट द्यायला हवी. तसंच तिथल्या वारसा वस्तू, वारसा वास्तू, नैसर्गिक साधनसंपत्ती यांचं नकळतही नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. या सगळ्यातूनच शाश्वत पर्यटन घडू शकतं. पण या किंवा कोकण रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या अन्य कोणत्याही रेल्वेगाडीतून जाताना निसर्गदृश्यं पाहून झाल्यावर नजर थोडी खाली वळली, तर काय दिसेल? प्लास्टिकच्या बाटल्या, खाऊचे रिकामे पुडे, ‘यूज अँड थ्रो’ अशी ‘सोय’ असलेली ग्लासेस, कप, प्लास्टिकची ताटं, इत्यादी इत्यादी…अर्थात कोकण रेल्वेच नव्हे, तर देशातल्या सर्वच रेल्वेमार्गांवर ही परिस्थिती आपल्याला सहज दिसून येईल.
कोकण रेल्वेची सेवा सुरू होऊन अलीकडेच २५ वर्षं होऊन गेली. या २५ वर्षांत कोकण रेल्वेमुळे कोकणाचा बराच कायापालट झाला, विकास झाला आणि ते खरंच आहे; पण अशा प्रकारे काया पालटताना ती वाईट प्रकारेही पालटू लागली.. आणि त्याचा मुख्य दृश्य पुरावा म्हणजे रेल्वेमार्गाच्या दुतर्फा असलेला कचरा. कोकण रेल्वेची सेवा रत्नागिरीतून पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत सुरू झाली, त्या पहिल्या गाडीतून प्रवास करताना आजूबाजूच्या प्रदेशात जी निर्मळता, प्रसन्नता दिसत होती, तिची रया आता जाऊ लागली आहे,
जगात असलेले सर्व प्राणी, पक्षी, वनस्पती आणि सर्व प्रकारचे सजीव म्हणजे जैवविविधता. अर्थातच ही जैवविविधता टिकवणं ही सृष्टीचं आणि पर्यायानं मानवाचं अस्तित्व टिकवण्यासाठीची मूलभूत बाब आहे; याबद्दलची माहिती आता सर्वांनाच आहे किंवा होऊ लागली आहे; मात्र ते माहिती आहे, म्हणून स्वतःच्या वागणुकीत चांगले बदल करणाऱ्यांची संख्या मात्र अगदीच नगण्य आहे. शाश्वत पर्यटन म्हणजे काय, तर कोणत्याही ठिकाणी पर्यटनाला गेल्यानंतर आपल्या पर्यटनाचा तिथल्या पर्यावरणावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, तिथलं पर्यावरण शाश्वत राहील, याची काळजी घेणं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!