सतीश पाटणकर
कोकणात मोठ्या प्रमाणावर पडिक क्षेत्र असून येथील भात शेती निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असते. शासनाने शेतीची नवी पॉलिसी बनवून अननसासारख्या शेतीला अनुदानाचे बळ दिले तर, कोरोनाच्या काळात बेकार होऊन गावी परतलेल्या तरुणांच्या हाताला नवा रोजगार मिळू शकतो. गार्डन अननस ही अननसाची एक प्रजाती असून याची लागवड इंग्लंडमधील हेलीगनच्या लॉस्ट गार्डनमध्ये केली जाते. एका अहवालानुसार लॉस्ट गार्डनमधील अननस जगातील सर्वात महाग आहेत.हे अननस ग्रीनहाऊसमध्ये घेतले जाते. या एका अननसाची किंमत 1600 डॉलर्स (सुमारे 1.14 लाख रुपये) आहे. अशाप्रकारे नवीन संकल्पनेतून एक नवी अर्थक्रांती कोकणात उभी राहू शकते.
कोकणात नैसर्गिक आपत्तीत सातत्याने होणाऱ्या भातशेतीच्या नुकसानामुळे येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.आता सिंधुदुर्गात पर्यायी शेती व्यवस्था उभी राहत आहे. दोडामार्गमध्ये तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याशेजारी आता अननसाची शेती बहरत असून कोणत्याही नैसर्गिक संकटात या शेतीला धोका नसल्याचा दावा येथील शेतकरी करतात. दोडामार्गमधील २५० एकर क्षेत्रावर अननस पिकवले जाते.
कोकणात अननस लागवडीला पोषक वातावरण आहे. कोकणातील पारंपरिक पिके म्हणजे आंबा आणि भात. परंतु ही पिके आता बेभरवशाची बनली आहेत. या पिकांपासून मिळणारे उत्पन्न अत्यल्प असून खर्च जास्त आहे. कोकणातील लाल माती, उष्ण-दमट हवामान आणि तीन ते साडेतीन हजार मि.मी. होणारा पाऊस हे मूलभूत घटक अननसाच्या शेतीस उपयुक्त असल्याचे अभ्यासानंतर सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रात पश्चिम समुद्र किनारपट्टीलगतचा भाग व सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अननसाची नगदी पीक म्हणून अननसाच्या शेतीस फार मोठा वाव, आहे. अननसाच्या पिकावर पावसाचा कोणताही परिणाम होत नाही, गुरांचा त्रास नाही व तिन्हीही हवामानात हे पीक उत्तमरीतीने तयार होते.
कोकणातील शेतकऱ्यांनी जमीन व माती विकू नये, यासाठी अननस लागवड हा उत्तम पर्याय आहे. उसाच्या शेतीसारखी अननस शेती आहे. पहिल्या वर्षी रोपे लावायची आणि सलग तीन वर्षे उत्पन्न घ्यायचे. येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे २५ एकर क्षेत्रात अननस लागवड केली तर यासाठी साफसफाई करण्यासाठी ४ लाख ८० हजार रुपये, पाईपलाईन स्प्रिंकलर्स २ लाख ५० हजार रुपये खर्च येतो. अननस रोपे १२ ट्रक लागतात. यासाठी ३ लाख १२ हजार आणि अननस लागवड करण्यासाठी सहा महिन्यांत मजुरीसाठी रुपये ४ लाख ५० हजार रुपये, वीज कनेक्शन आणि ट्रान्सपोर्ट करण्यासाठी पाच लाख रुपये खर्च येतो. तसेच, कुंपण व्यवस्थेसाठी दोन लाख असे मिळून सहा महिन्यांत २० ते २५ लाखांच्या आसपास खर्च येतो. तर, पीक मिळेपर्यंत आणखी पाच ते सहा लाख खर्च अपेक्षित असतो. यामध्ये औषधे व खतासाठी वार्षिक ७ ते ८ लाखांचा खर्च यामध्ये सामाविष्ट आहे. पहिल्या वर्षी एकच फळ प्रति रोप काढले जाते. दुसऱ्या वर्षी दोन फळे व तिसऱ्या वर्षी दोन फळे अशी एकूण तीन वर्षात प्रति रोप सरासरी १० अननस फळे काढली जातात.
गोवा, बेळगाव, मुंबई व बंगळुरू आदी शहरात औषधी म्हणून याचा वापर होतो. त्यामुळे मागणीनुसार अननस जागेवरच विक्री करून मार्केटिंग करता येते. सरासरी एक अननस दीड ते दोन किलो वजनाचे असते. बाजारात त्याला ५० रुपये भाव मिळतो. हंगामानुसार हे दर कमी अधिक होऊ शकतात. २५ एकर क्षेत्राचा विचार केला तर सरासरी बाजारभावानुसार प्रति अननस ५० रुपये प्रमाणे १० लाख अननसांचे पाच कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. यामध्ये मार्केटिंग ट्रान्सपोर्ट तसेच पॅकिंग व वितरण व्यवस्थासाठी २० ते २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
दोडामार्ग मधील शेतकरी स्वप्नील मोहन बोन्द्रे सांगतात, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पडिक क्षेत्र आहे. अननस पिकाला शासनाने अनुदान दिले तर, या भागात ही शेती मोठ्या प्रमाणावर होईल. विशेष म्हणजे, कोणतीही आपत्ती आली तरी या पिकाला कोणतीच भीती नाही. त्यामुळे नुकसानीचा काही प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले. शाईन जॉर्ज हे केरळमधील शेतकरी असून दोडामार्गामध्ये त्यांनी लीजवर जमीन घेऊन अननस शेती केली आहे. भारतीय सैन्यदलातून निवृत्त असलेले शाईन जॉर्ज सांगतात केरळमध्ये अननस शेतीवर पूरक उद्योग उभे राहिले आहेत. अननसाच्या पातीपासून त्या ठिकाणी बॅगही बनवतात. महाराष्ट्रात केवळ ज्यूस काढला जातो. शासनाने पूरक उद्योगांना प्रोत्साहन दिले पाहिजे. असे झाले तर, अननस शेती आणि यावर आधारित उद्योगांना बळ मिळू शकेल.
दरम्यान, कोकणात मोठ्या प्रमाणावर पडिक क्षेत्र असून येथील भात शेती निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असते. शासनाने शेतीची नवी पॉलिसी बनवून अननसासारख्या शेतीला अनुदानाचे बळ दिले तर, कोरोनाच्या काळात बेकार होऊन गावी परतलेल्या तरुणांच्या हाताला नवा रोजगार मिळू शकतो. त्यातून एक नवी अर्थक्रांती कोकणात उभी राहू शकते. (लेखक मुख्यमंत्रांचे माजी माहिती अधिकारीआहेत )
—————————————————————————————————-