मुंबई-गोवा महामार्गावर सावंतवाडीपासून सहा कि.मी. अंतरावर आकेरी हे निसर्गरम्य गाव असून या गावातून माणगाव शिवापूरकडे जाणारा रस्ता जातो. या रस्त्याला लागून आकेरी बाजारापासून एक कि. मी. अंतरावर पूर्वीच्या आकेरी हुमरस या एकसंध गावाच्या मध्यभागी ‘श्री देव रामेश्वर पंचायतन’ वसलेले आहे. सावंतवाडीच्या भोसले घराण्याची नितांत श्रद्धा असलेले हे रामेश्वर मंदिर शिल्पकलेचा एक अप्रतिम नमुनाच आहे. या देवस्थानची स्वत:च्या मालकीची सुमारे शे-सव्वाशे एकर जमीन शेती व इमारती लाकडाने भरलेली असून प्रेक्षणीय आहे.