सतीश पाटणकर
कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर उभा असलेला हा रांगडा रांगणागड आपल्या स्वराज्याचा अनेक महत्वाच्या क्षणांचा साक्षीदार आहे. सह्याद्रीच्या धारेवर मुख्य घाटावरील डोंगर रांगेपासून अलग झालेला हा गड घाट व कोंकण यांच्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी मोक्याच्या जागी आजही खडा आहे. कोल्हापूर छत्रपतींच्या आवडत्या किल्ल्यांमध्ये याचा समावेश होतो. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास ”येक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल” इतके महत्त्व या रांगण्यास आहे.
सहयाद्रीतील प्रत्येक गडात प्रवेश करण्यासाठी डोंगरावर चढाई करावे लागते. परंतु रांगण्यात प्रवेश करण्यासाठी चक्क उतार उतरुन गडात प्रवेश करावा लागतो.
गडाच्या पश्चिम दरवाज्यावरून कोकणातील निसर्ग संपन्न नारूर गाव ते मनोहर मनसंतोष गडपर्यंतचा आल्हाददायक परिसर दृष्टीक्षेपात येतो तर उत्तरेकडून घाट माथ्यावरील प्रदेशाचे दर्शन होते.गडावरील रांगणाई देवीचे मंदिर, गडाचे प्रवेशद्वार, गोमुखी बांधणीचा दुसरा दरवाजा, कोकण दरवाजा, सोंडे बुरुज, चिलखती बुरुज यासारख्या अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत.