Spread the love
सावंतवाडी राजवाडा

सावंतवाडी राजवाडा सिंधुदुर्गातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ

          सावंतवाडी राजवाडा सिंधुदुर्गातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ ओळखले जाते. राजवाड्याची बांधणी खेम सावंत भोसले संस्थानांनी १७५५-१८०३ या काळात केली.

 

सावंतवाडी शहरातील हे सुंदर पर्यटन स्थळ असून मुंबई,पुणे, तसेच कोल्हापूर येथून महामार्गाने येथे पोहोचता येते .

     सावंतवाडी च्या लाकडी खेळण्यांप्रमाणेच सावंतवाडीचा राजवाडा हि तितकाच प्रसिद्ध आहे.  सावंतवाडी हि स्वातंत्र्यपूर्व काळातील सावंतवाडी संस्थानाची राजधानी. येथे भोंसले घराण्याची सत्ता होती. ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पश्चिम महाराष्ट्रातील (कोकण) एक संस्थान. उत्तरेस गडनदी, पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, पूर्वेस सह्याद्री पर्वतरांगा व त्यापलीकडे कोल्हापूर जिल्हा व बेळगाव जिल्हा आणि दक्षिणेस तेरेखोलची खाडी व गोवा यांनी ते सीमित झाले होते. त्याचे क्षेत्रफळ २,३९८ चौ. किमी. असून लोकसंख्या २,५२,१७० (१९४१) होती आणि उत्पन्न अंदाजे सु. दहा लाख होते. सावंतवाडी व शेजारील प्रदेश यांत सापडलेले शिलालेख व ताम्रपट यांवरून संस्थानी प्रदेशाचा प्राचीन इतिहास ज्ञात होतो. इ. स. सहाव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत हा प्रदेश चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार वगैरे वंशांच्या आधिपत्याखाली होता. नंतर विजयानगर व विजापूर येथील राजांच्या अंमलाखाली तो गेला.

उदयपूरच्या (उदेपूर) सिसोदिया भोसले घराण्यातील मांग सावंत हा विजापूरच्या आदिलशाहीत सेवक होता. त्याने आदिलशाहीविरुद्घ बंड करून त्यांच्या सैन्याचा पराभव केला आणि कुडाळ परगण्यात होडावडे या गावी स्वतंत्र गादी स्थापन केली (१५५४).पुढे त्याचे वारस भाम सावंत पुन्हा आदिलशहाकडे गेले. आदिलशहा व पोर्तुगीज यांतील लढायांत मांग सावंताच्या वंशजांनी आदिलशहास मदत केली. म्हणून त्यास आदिलशहाने ‘सावंत बहादर’ असा किताब दिला. या सुमारास हा प्रदेश कुडाळकर देसाईंच्या आधिपत्याखाली होता. त्यावेळी मांग सावंताचा नातू खेम सावंत यांनी आदिलशाहीकडून देशमुखी मिळविली (१६२७). तेच सावंतवाडी संस्थानचे राज्यसंस्थापक होते. त्यांना सोम,फोंड व लखम असे तीन मुलगे होते. खेम सावंत यांनी १६४० पर्यंत देशमुखी उपभोगली. त्यानंतर सोम व फोंड यांनी देशमुखी उपभोगली (१६४१–५१).पुढे त्यांचा धाकटा भाऊ लखम सावंत (कार. १६५१–७५) गादीवर आला. त्याने आणि त्याचा पुतण्या दुसरा खेम सावंत यांनी कुडाळ देशस्थ प्रभूंचे वर्चस्व झुगारून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याजवळ १२,००० फौज होती. त्यांनी आदिलशहाची मर्जी मिळविण्यासाठी विजापूरचा सरदार खवासखान याच्या मदतीने छ. शिवाजी महाराजांवर चढाई केली, तेव्हा महाराजांनी दोघांचा दारुण पराभव केला. लखम व दुसरा खेम सावंत यांनी तेव्हा पोर्तुगीजांचा आश्रय घेतला.

       महाराजांनी पोर्तुगीजांचा फोंडा किल्ला घेतला. तेव्हा पोर्तुगीजांनी तह केला व लखम सावंताने महाराजांबरोबर पाच कलमांचा तह करून मराठी राज्याची सेवा फौजेनिशी करण्याचे मान्य केले आणि देशमुखीच्या उत्पन्नापैकी सहा हजार होन दरसाल छ. शिवाजींना देण्याचे ठरले (१६५९); परंतु लखम सावंत पुन्हा विजापूरकडे गेला (१६६४). त्याने महाराजांची सर्व ठाणी उठवून तेथे आदिलशाही सत्ता स्थापिली. तेव्हा आदिलशहाने मालवण गाव सर्व हक्कांसह त्यास इनाम करून दिला. शिवाय परगण्याची नाडगौडी व मसुरे, पेंडूर, घावनळे, मुळगाव, होडावडे, रेडी, आरवली, मठ वगैरे गावे दिली (१६६४).लखम सावंतानंतर (१६७५) त्याचा पुतण्या दुसरा खेम सावंतच्या वेळी आदिलशाही मोगलांनी जिंकून घेतली (१६८७). तेव्हा दुसऱ्या खेम सावंताने मोगलांकडून कुडाळ परगण्याची देशमुखी आपल्याकडे राहण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले (१६८९) आणि कुडाळ देशस्थ प्रभूंच्या सत्तेचा शेवट केला (१६९७) व आपल्यास ‘सरदेसाई परगणे कुडाळ व महालानिहाय’ असे म्हणवू लागले. तेथून भोसले घराण्याची स्वतंत्र कारकीर्द सुरू झाली.

संस्थानाच्या अखत्यारीत कुडाळ परगणा व बांदे, मणेरी, पेडणे, डिचोली व साखळी हे पाच महाल होते. त्यामुळे तत्कालीन पत्रव्यवहारात सावंत-भोसले यांस ‘सरदेसाई परगणे कुडाळ व महालानिहाय’ असे उल्लेखिले आहे. त्यानंतर सावंतवाडीच्या गादीवर दुसरे खेम सावंत (कार. १६७५–१७०९) आले. त्यांनी चराठे हे राजधानीचे ठिकाण करून त्यास सुंदरवाडी हे नाव दिले व राजवाडा बांधला.दुसऱ्या खेम सावंतानी कोल्हापूरचे छत्रपती दुसरे शिवाजी (कार.१७०७–१४) यांजकडून कुडाळ परगणा व पाच महाल मोकासा यांचे हक्क प्राप्त करून घेतले (१७०८); मात्र त्यानंतर त्यांनी पुढे छ. शाहूंस एकनिष्ठा दाखवून कुडाळ परगणा व पाच महाल इनाम करून घेतले. यावेळी त्यांना साळशी महालाचा अर्धा वसूल इनाम मिळाला. त्यास तीन कन्या असून पुत्रसंतान नव्हते. त्यामुळे त्यांच्या बंधूंचे चिरंजीव गादीवर आले, ते तेव्हा सहा वर्षांचे होते. म्हणून राज्यकारभार मातुश्री जानकीबाई व मुख्य प्रधान जिवाजी सबनीस पाहात असत.

       दुसरे फोंड सावंत (कार.१७०९–३८) गादीवर आले. त्यानंतर त्यांचा नातू रामचंद्र व जयराम सावंत (कार. १७३८–५५), तिसरे खेम सावंत (कार. १७५५–१८०३) वगैरे राजे आले. खेम सावंतांना पुत्रसंतान नव्हते, म्हणून त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी दत्तक घेऊन राज्यकारभार केला. दत्तकाचा खून झाला व लक्ष्मीबाई निवर्तल्या (१८०८). तेव्हा दुसऱ्या पत्नी दुर्गाबाईंनी हाच प्रयोग केला. तोही दत्तक निवर्तला (१८१०) आणि चौथा खेम सावंत वारसदार ठरला. त्याच्या कारकीर्दीत संस्थानात अनागोंदी होऊन बंडाळ्या माजल्या. तेव्हा ब्रिटिशांनी संस्थान ताब्यात घेऊन तेथे पोलिटिकल सुपरिटेंडेंटची नियुक्ती केली (१८३८). त्यावेळेपासून सावंतवाडी संस्थान मांडलिक बनले.

Savantwadi Rajwada

     खेम सावंतांनंतर (१८६७) फोंड सावंत, रघुनाथ वगैरेंनी राज्य केले. रघुनाथानंतर (१८९९) काही काळ त्याच्या चुलतभावाने गादी सांभाळली; कारण रघुनाथाचा मुलगा पंचम खेम राज सावंत (१८९७–१९३७) अल्पवयीन होता. ते बापूसाहेब महाराज या नावाने ख्यातनाम असून प्रजाहितदक्ष, न्यायी व धर्मपरायण राजा म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी देवदासी प्रतिबंधक कायदा (१९३५), धार्मिक कृत्यासाठीची पशुहत्या बंदी इ. महत्त्वाचे कायदे केले.

तसेच संस्थानातील मुली व अस्पृश्यांना मोफत शिक्षणाची सोय केली. त्यांनी इंग्लंडमध्ये लष्करी तसेच मानव्यविद्यांचे शिक्षण घेतले होते. पहिल्या महायुद्घाच्या वेळी मेसोपोटेमियात त्यांनी मर्दुमकी गाजविली (१९१४–१७). त्यांच्यानंतर शिवरामराजे (कार. १९३७–४८) हे अल्पवयात गादीवर आले. त्यांच्यावेळी संस्थान मुंबई इलाख्यात विलीन झाले (१९४८). स्वातंत्र्योत्तरकाळात त्यांनी सक्रिय राजकारणात भाग घेऊन आमदारकी मिळविली.

Savantwadi Rajwada

          ब्रिटिशांच्या काळात संस्थानात आरोग्य, शिक्षण, वाहतूक, पाणीपुरवठा अशा काही सुधारणा झाल्या. विसाव्या शतकापूर्वीच मूळ संस्थानाच्या भूप्रदेशाचा संकोच झाला होता. सावंतवाडी मूळ मुलखातील कुडाळ परगण्यातील तीन तर्फा, एक बंदर व दोन तर्फांपैकी काही गावे इंग्रजांनी घेतली होती. एक कर्यात कोल्हापूर संस्थानाकडे गेली व भीमगड परगण्यापैकी तीन महाल पोर्तुगीजांनी बळकावले होते. त्यामुळे सामीलीकरणाच्या वेळी नऊ तर्फा, एक कर्यात व दोन महाल सावंत-भोसले यांच्या सत्तेखाली होते आणि हनुमंतगड (फुकेरी), महादेवगड (आंबोली), नारायणगड (गेळे), नरसिंहगड किंवा सोनगड (सोनवडे) व मनोहरगड हे किल्ले ताब्यात होते.

    हा राजवाडा १७५५ ते १८०३ या काळात बांधण्यात आला. हा राजवाडा सध्या तीन भागात विभागला गेलेला आहे. सध्याच्या राजघराण्यातील लोकांचे राहण्याचे ठिकाण, राज दरबार आणि म्युसिअम.          राजवाडा बघण्यासाठी २० रुपये तिकीट आहे. सोबत एक गाईड तुम्हाला राजवाडा दाखवतो.

error: Content is protected !!