सतीश पाटणकर
वेंगुर्लेपासून १७ कि.मी. अंतरावर निसर्गरम्य शिरोडा हे गाव आहे. हिरव्यागर्द वनश्रीने नटलेले, माड-पोफळीच्या बागांनी बहरलेले, सुंदर समुद्रकिनारा लाभलेले अत्यंत विनोभनीय गाव! शिरोड्यापासून गोवा अवघ्या ७ कि.मी. अंतरावर आहे. शिरोड्याला लांबच लांब पसरलेली पांढर्या शुभ्र वाळूची सुंदर, रम्य चौपाटी लाभलेली आहे. या चौपाटीलगतच असलेले भल्यामोठ्या सुरुच्या वृक्षांचे बन हे तर शिरोड्याचे एक खास वैभव आणि आगळे वैशिष्टयही आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यापासून शिरोडा, वेळागर समुद्र किनाऱ्याला देशी- बिदेशी पर्यटकांनी पसंती दिलेली आहे.
साहित्यातील ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार मिळविलेले प्रतिभावंत साहित्यिक वि.स. तथा भाऊसाहेब खांडेकर ह्यांची ही प्रेरणाभूमी आणि कर्मभूमीही! भाऊसाहेब खांडेकरांनी येथील ट्युटोरिअल हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली आणि प्रारंभीच्या उत्तमोत्तम कादंबर्याचे लेखनही. असे वि. स. खांडेकर ज्या टेकडीवर बसून लिखाण करायचे ती “भिके डोंगरी” टेकडी येथेच आहे. हे शिरोडा सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, ऐतिहासिक परंपरा व पार्श्वभूमी लाभलेले गाव आहे. साहित्यिक कै. वि. स. खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यांनी शिरोडय़ात ज्ञानदान करताना साहित्य निर्माण केले. त्यांच्या शिरोडय़ातील वास्तव्याचे एक स्मारक विद्यालयात उभारण्यात आले. हे स्मारक सर्वासाठी खुलेही झाले. या ठिकाणी साहित्यिक नक्कीच भेट देतील.
भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात शिरोडा गावचे महत्त्वही फार आहे. १९३० साली शिरोडा येथे झालेल्या ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहामुळे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात शिरोडा गावाचे नाव अग्रक्रमाने नमूद झालेले आहे. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात मिठाच्या सत्याग्रहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सिंधुदुर्गात शिरोडा येथेदेखील मिठाचा सत्याग्रह झाला. ब्रिटिशांविरोधात महात्मा गांधीजींनी अनेक चळवळी निर्माण केल्या . त्यात मिठाचा सत्याग्रहदेखील महत्त्वाचा होता.
शिरोडा येथे झालेल्या मिठाच्या सत्याग्रहाच्या ठिकाणी ‘नाही चिरा.. नाही पणती’ अशीच अवस्था बनली आहे. शिरोडय़ात मिठाचा सत्याग्रह झाला. १९३० मध्ये महात्मा गांधीजीच्या आदेशानुसार भारतभर मिठाचा सत्याग्रह झाला. या मिठाच्या सत्याग्रहाचे एक आंदोलन शिरोडा येथे घडले. शिरोडय़ातील मंदिरात एकत्र जमून नंतर मिठाचा सत्याग्रह मिठागरे आहेत तेथे करण्यात आला. आजही वटवृक्षाचे झाड त्याची आठवण देत आहे. या वडाच्या झाडाकडे लक्ष दिल्यावर मिठाच्या सत्याग्रहाची आठवण होते.
पंचतारांकित ताज हॉटेलमध्ये जाण्याची उत्सुकता अनेकांना असते. देशातील विविध भागात असलेला ‘ताज हॉटेल्स ग्रुप’ आता अधिकृतपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आला आहे. राज्य सरकारसोबत या संदर्भात सामंजस्य करार झाला. “ताज हॉटेल्स ग्रुप आता अधिकृतपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आला आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सिंधुदुर्ग जिल्हा गेल्या दोन दशकांपासून या क्षणाची वाट पाहत होता.“तीन वर्षांच्या कालावधीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेळागर-शिरोडा येथे ताज हॉटेल सुरु होणार आहे.
ग्रामदैवता श्री माऊली देवी
सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यात असलेल्या शिरोडा गावाची ग्रामदैवता श्री माऊली देवी. शिरोडा गावातील जुनी जाणकार मंडळी तिथली ग्रामदेवता असलेल्या श्री माऊली देवीबद्दल अशी आख्यायिका सांगतात की, एका परदेशी व्यापाराचं मालवाहू गलबत शिरोडा समुद्रकिना-यापासून काही अंतरावर वादळात सापडलं होतं. त्या गलबतात एक मूर्ती होती. त्या व्यापा-यानं मूर्तीसमोर बसून प्रार्थना केली.. ‘वादळ शांत होऊन माझ्यावरील संकट टळलं, तर त्या गावात पोहचल्यावर तुझ्या मूर्तीची मूळ मानक-यांच्या हातून प्रतिष्ठापना करेन’ आणि काय आश्चर्य.. वादळ शांत झालं. तो व्यापारी त्या समुद्रकिनारी सुखरूप पोहोचला. व्यापा-याने त्वरीत शिरोडा गावच्या प्रमुख मानक-यांशी संपर्क साधला. व्यापारी आपल्या सहका-यासह देवालयाच्या परिसरात आले आणि गावातल्या प्रमुख मानक-यांच्या हातून श्री देवी माऊलीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली. ही प्रतिष्ठापना शिवकालात केली गेली. त्या दिवसापासून श्री माऊली देवीच्या भक्तीचा नंदादीप श्रद्धापूर्वक अखंड तेवत आहे.
श्री माऊली देवीच्या मंदिरात वर्षभर भजनाचा कार्यक्रम होतो. हे या देवस्थानाचं एक खास वैशिष्टय़ आहे. एकही दिवस न चुकता भजन केलं जाणारं, हे सिंधुदुर्गातील असं एकमेव देवस्थान आहे. श्रीदेवी माऊलीचं मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या डाव्या बाजूस श्री देव पुरमाराचं देवस्थान आहे. श्री माऊली देवीच्या जत्रोत्सवाच्या दुस-या दिवशी या देवाचा वार्षिक जत्रोत्सव असतो. उजव्या बाजूस श्री देव घाडवसाचं मंदिर आहे. समोर श्री देव जागनाथाचे मंदिर आहे. श्री देव पुरमाराच्या मागे श्री देव निरंकाराची घुमटी आहे. माऊली मंदिराच्या समोरील बाजूस उजवीकडे दीपस्तंभ आहे. तर डाव्या बाजूस सभागृह व भक्तनिवास आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षापासून या देवीच्या जत्रोत्सवाच्या दिवशी येणा-या भाविकांना रात्री महाप्रसाद देण्यात येतो. दिवसेंदिवस या देवीचं महात्म्य दूरवर पसरत असून भक्तगणांचा ओघही वाढत आहे. दरवर्षी साजरा होणारा या देवीचा जत्रोत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात, उत्साहात साजरा होतो. देवीच्या दर्शनासाठी व ओटी भरण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची रीघ लागलेली असते.