श्री. ब्रम्हदेव मंदिर – कोर्ले – देवगड.

Spread the love
कोर्ले नावाप्रमाणेच निसर्गातून जणू सुरेख कोरुन काढलेले देवगड तालुक्यातील एक सुंदर खेडेगांव. उत्तरेला सिंधुदुर्ग जिल्ह्याची वळणदार सीमारेषा रेखणारी सुखसरिता – विजयदुर्गची खाडी, हिरवेगार शेततळे आणि दक्षिण पूर्वेला विविध वनश्रीने नटलेला डोंगररांगा यातल्याच एका डोंगराच्या कुशीत, गावापासून अडीच ते तीन किलो मीटर अंतरावर स्वयंभू श्री. ब्रम्हदेव विराजमान झाला आहे. मात्र येथे देवाची घडीव मूर्ती नसून एका वक्राकार जांभ्या कातळाच्या उंचवट्याला स्वयंभू ईश्वर स्वरुप मानले जाते. पुराणोक्त श्री. ब्रम्हदेव चतुर्वेदरुप चतुरानन म्हणचेच चार मुखांचा. म्हणून हे देऊळ पूर्वापार बिनभिंतीने म्हणजे चारी दिशांनी मोकळे आहे. 
      
          श्री. ब्रन्हदेव टेकडीच्या पायथ्याशी बारमाही पाण्याचा अंतस्त्रोत – झरा असून तीन सुबक बांधीव तळ्यांतून ते निर्मळ जळ सतत ओसंडून वाहत असते. देवस्थानची पूजा – अर्चा, महाप्रसाद यांसाठी या ‘ तीन तळी ‘ मधील पाणी वापरले जाते. या पाण्याची चव अवीट आहे. इथून देवळाकडे चढून जाण्यासाठी पाय-या पाय-यांची चिरेबंदी घाटी आहे. पायथ्याशी केवड्याचे बन, सभोवतालच्या देवराईतली सुरंगी, हेळे, वड आदी वृक्षराजी, विविध झाडी झुडपे, नानाविध पक्ष्यांचे कूंजन, वानरादी वनचरांचा मुक्त वावर यांमुळे देवळाचा परिसर मंगल व उदात्त वाटतो. 
श्री. ब्रम्हदेव मंदिर – कोर्ले – देवगड.
 
     
कोकणातील प्रत्येक महत्त्वाच्या देवस्थानामागे असते, तशी एक दंतकथा – लोककथा कोर्लेच्या श्री ब्रम्हदेवाशी निगडीत आहे. मंदिराच्या गाभा-यात इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीचे चित्र असलेले १८६२ सालचे तांब्याचे नाणे मिळाले यावरुनच हे मंदिर पुरातन असल्याचे स्पष्ट होते. देशात ब्रम्हदेवाची दोन देवळे असून यातील एक देऊळ देवगड तालुक्यातील कोर्ले येथे आहे. या मंदिराची जिर्णोद्धाराचे काम सुरू पुर्ण झाले आहे.
       
        देवगड तालुक्यातील कोर्ले येथे ब्रम्हदेवाचे अतिशय जागृत देवस्थान आहे. या मंदिराजवळ असलेला पाण्याचा झरा सतत वाहत असतो. पर्यटनाच्या दृष्टीने हे मंदिर बांधले जात आहे. मंदिराची पूजा – अर्चा, रुद्रानुष्ठानादी नित्यकर्मे व देखभाल सुविहीतपणे केली जाते. श्रावण महिन्यात तर रुद्रघोषाने इथला अणुरेणु निनादून जातो.
 
       
Translate »
error: Content is protected !!