सतीश पाटणकर
दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर असलेल्या सोनुर्ली देवी माउली मंदिर सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावही आपले वेगळेपण जपणारा. लोटांगणाच्या जत्रेसाठी हा गाव प्रसिद्ध! हजारो भक्तगणांची लोटांगणे जत्रोत्सवात पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. कोकणची दक्षिण काशी म्हणूनही सोनुर्ली माउली देवस्थान प्रसिद्ध आहे.
पर्यटन विकासाच्या माध्यमातून मंदिराच्या सभोवतालचा परिसर, भक्तनिवास व मुख्य रस्त्याचे काम होऊ घातले आहे. मंदिराच्या गाभा-यात शिरताच जागृत देवस्थान असलेल्या व नवसाला पावणा-या श्री देवीचे मनमोहक रूप पाहताच मन प्रसन्न होते. दूरवरून आलेला भाविक माऊलीच्या दर्शनाने कृतार्थ होतो. श्री देवी माऊली मंदिराच्या बाजूला श्री रवळनाथ, श्री लिंगायत, श्री पावणा देवी यांचीही मंदिरे आहेत. सोनुर्ली आणि मळगाव या दोन गावांचे आद्यदैवत म्हणून श्री देवी माऊलीला मानले जाते. या देवीला ‘महिषासुरमर्दिनी’ असेही संबोधले जाते.
माउलीच्या दरबारात भरणारी तुला प्रसिद्ध आहे. कोकण म्हटले की, कौलारू घरे, मातीच्या भिंती हे चित्र सहज डोळ्यांसमोर तरळते. पण आज सर्वत्र बिल्डरांचे प्रस्थ वाढले असल्याने स्लॅबच्या घरांचे जाळे पसरत चालले आहे. सोनुर्ली गाव मात्र त्याला अपवाद आहे. येथे स्लॅबचे घर नावाला सापडणार नाही. येथे मातीच्या भिंतींचा हळूहळू कायापालट होऊ लागला असला तरी या गावात भिंतीसाठी चिर्याचे दगड वापरले जात नाहीत. घरांच्या छप्परावर नळेच असावेत असा गाववासियांचा आजही आग्रह असतो. या परंपरेची जपणूक गाववासीय मोठ्या श्रद्धेने करतात. विटांची घरे येथे पाहावयास मिळतात. ‘खेड्यामधले घर कौलारू’ कसे असावे ते पाहावे तर इथेच! सुंदर सुंदर पहुडलेली घरे डोंगरमाथ्यावरून पाहताना तर चित्त हरपते. येथे स्लॅबची घरे बांधण्यास देवीचा कौल लागत नाही. काळेत्री दगड घराच्या पायासाठी वापरला जात नाही. तसे करण्यास देवीची परवानगी मिळत नाही. देवीच्या मंदिराचे बांधकाम काळेत्री दगड वापरून करण्यात आले आहे. त्यामुळे काळेत्री दगड घरासाठी वापरू नयेत असा दंडक आहे.