Spread the love

श्री यक्षिणी देवी,माणगाव

 रमणीय सृष्टिसौंदर्य हे कोकणाचं वैशिष्ट्य. त्यात सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे या सौंदर्याची परिसीमाच. म्हणूनच त्याला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा देण्यात आलाय. अशा या रमणीय जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्‍यात माणगाव नावाचं एक सुंदर गाव वसलेलं आहे. कोकणातील काष्ठशिल्पांपैकी वैशिष्ट्यपूर्ण आणि उल्लेखनीय शिल्पे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील यक्षिणी मंदिरात आहेत. माणगाव कुडाळपासून २० किलोमीटरवर, तर सावंतवाडीपासून १५ किलोमीटरवर आहे. 

यक्षिणी देवीच्या मंदिराचे गर्भगृह चौरसाकार व मंडप आयताकार विधानाचा आहे. मंदिराच्या गर्भगृहाची द्वारशाखा कर्नाटकातील होयसळ पद्धतीच्या मध्ययुगीन मंदिराच्या द्वारशाखेशी साधर्म्य दाखवणारी आहे. मंडपामध्ये काष्ठशिल्पांची रेलचेल आहे. स्तंभ, हस्त, तुळया व त्यावरील लाकडी वितान हे सारेच कोकणातील वास्तुशिल्पांची वैशिष्ट्ये दर्शवणारे आहे.या मंदिराची अधिष्ठात्री देवता श्री यक्षिणी असून, स्थानिक लोक तिचा उल्लेख जखुबाई असाही करतात. दैनिक उपासनेचा भाग म्हणून होणाऱ्या यक्षिणीच्या आरतीमध्ये कवी दिवाकर यांनीदेखील या देवतेचा उल्लेख जखुबाई असा केला आहे. यक्षिणीची मूर्ती पाषाणाची असून, साधारणतः चार फूट उंचीची आहे. ही देवी द्विभुजा असून, हातात खड्ग आहे. यक्षिणीच्या मुख्य मूर्तीच्या उजव्या बाजूला साधारणतः चार फूट उंचीचे एक पाषाणशिल्प दिसून येते. ही पद्मासनात बसलेली ध्यानस्थ मूर्ती आहे. ही यक्षमूर्ती आहे, जीनमूर्ती आहे की आणखी कोणाची मूर्ती आहे, याबाबत काही स्पष्ट गृहीत धरणे अवघड आहे.

 

yakshini

श्री यक्षिणी देवी,माणगाव

श्री देवी यक्षिणी माणगाव

       या लेखापूर्वी प्र. के. घाणेकर आणि मोरेश्वर कुंटे यांनी या मंदिराची व शिल्पांची नोंद घेतली असली, तरी त्यामधील चौसष्ठ योगिनींची काष्ठशिल्पे पूर्णतः दुर्लक्षित किंवा अप्रकाशित राहिलेली आहेत. छताच्या खाली उभ्या येणाऱ्या लाकडी वितानावर साधारणतः दहा इंच इतक्या लहान आकाराच्या या चौसष्ठ योगिनींच्या प्रतिमा आहेत. या लहान असल्याने पूर्णतः दुर्लक्षित राहिल्याचे आढळते. या मंदिरामध्ये असलेल्या वैचित्र्यपूर्ण अशा संकरित प्रतिमांचा इथे मागोवा घेणे उचित ठरते.

   मंडपाच्या छताला तुळयांच्या उभ्या-आडव्या रचनेमुळे चौकट निर्माण होते. या चौकटींच्या मध्ये छताचा भाग म्हणून मोठाली काष्ठशिल्पे उत्थित उठावात कोरलेली आहेत. या भागाला स्थानिक ‘सुतारपाट’ असे संबोधतात. या शिल्पांमध्ये बहुपाद, बहुहस्त आणि बहुमुखी देवतांच्या प्रतिमा आढळतात. त्याचे पुढीलप्रमाणे प्रकार आढळतात.

 चार पाय, आठ हात व चार शीर्षे असलेली प्रतिमा

नऊ पाय, छत्तीस हात आणि अठरा डोकी असलेली प्रतिमा

सात पाय, चौदा हात आणि सात शीर्षे असलेली प्रतिमा

      अशा प्रकारच्या एकूण सोळा प्रतिमा छताला आहेत. या शिल्पांतील आकृतींना अतिमानवी म्हणता येईल किंवा यक्ष प्रतिमा म्हणता येईल. या अतिमानवी पुरुष शिल्पांमध्ये द्विमुख बकऱ्याचे शिल्प आढळते. ते अग्निदेवतेचे अंकन असावे. याशिवाय वायू, निऋती अशी काष्ठशिल्पे या शिल्पसमूहामध्ये आहेत. ही शिल्पे आपण देवीच्या मूर्तीसमोर उभे राहिल्यानंतर बरोबर आपल्या डोक्यावर, छताच्या आतील बाजूने कोरलेली आहेत.

         मंदिराच्या मंडपातील वितानावर योगिनींच्या प्रतिमा आढळून आल्या आहेत. त्या पूर्णपणे दुर्लक्षित असून या प्रतिमांची कोणतीही स्वतंत्र पूजा-अर्चा होताना आढळत नाही. काष्ठशिल्प सजावट इतकेच त्यांचे उपयोजन असले, तरी मूर्तिशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टीने या प्रतिमा महत्त्वाच्या ठरतात. या वैचित्र्यपूर्ण स्त्री-प्रतिमा फक्त दहा इंच उंचीच्या आहेत. त्याची संख्या चौसष्ठ आहे. देवतेचे वाहन आणि मिश्रप्रतिमेतील चेहरा म्हणजेच मुखभेद या आधाराने त्या समूहातील काही देवता ओळखता येतात. त्या चौसष्ठ प्रतिमांपैकी काही उदाहरणे येथे पाहू या.

 गर्दभमुखी स्त्री प्रतिमा – गाढवाचे शीर्ष असलेली व पक्ष्यावर आरूढ झालेली ही स्त्री प्रतिमा असून, या शिल्पामध्ये देवतेच्या हातात पाश व बीजपूरक आहे. छत्र व चामर घेतलेले दोन सेवकही या शिल्पात आहेत. कोंबडीवर आरूढ झालेली ही गर्दभमुखी देवता कामाक्षी म्हणून ओळखण्यास वाव आहे.

मंडूकमुखी स्त्री प्रतिमा – बेडकाचे शीर्ष व मासा वाहन असलेली ही मिश्र प्रतिमा हातात दंड व अक्षमाला, डहाळी आणि बीजपूरक धरलेली चतुर्भुज स्वरूपाची आहे.

अश्वमुखी स्त्री प्रतिमा – मंचकावर स्थानापन्न झालेली अश्वमुखी स्त्री प्रतिमा, हातात गदा व मासा धारण केलेली अशी आहे. या देवतेला ज्वालामुखी म्हणून ओळखता येते.

 मूषकमुखी स्त्री प्रतिमा-ही उंदराच्या चेहऱ्याची चतुर्भुज प्रतिमा आहे. तिच्या हातात पाश आहे. एकुण रूपारून तिला वैनायकी म्हणता येऊ शकते. कारण वैनायकीचे वाहन उंदीर आहे.

मेंढीमुखी स्त्री प्रतिमा- मेंढीचे मुख व स्त्री देहधारी द्विभुज प्रतिमा आपण अग्निहोत्री म्हणून ओळखू शकतो. या देवतेने एका हातात कमलकळी व एका हातात पाश धरलेला आहे.

     मुखभेदावर आधारित ओळखता येतील अशा योगिनी प्रतिमांप्रमाणेच कूर्मावर बसलेली यमुना, मत्स्यवाहना वेताळी, मंचकावर बसलेली चंद्रकांती, आदी यक्षिणी मंदिराच्या वितानाच्या बारा इंच उंच पट्टीवर आढळून येतात.गर्दभावर आरूढ झालेली गांधारी योगिनी, शेषशायी म्हणावी अशी शेषावर पहुडलेली, सर्पवाहन असलेली पद्मावती योगिनी येथे शिल्पबद्ध केलेल्या आहेत. या समूहात अघोरा देवताही आहे. अघोरा देवतेचे वाहन बकरी असते. बदकावर आरूढ झालेली देवताही ह्या छतपट्टीवरील काष्ठशिल्पात दिसते. तिला आपणास धूमावती म्हणून संबोधता येईल. साधारणतः धूमावती देवतेच्या हातामध्ये सूप असते, ते मात्र येथे दिसत नाही.या एकूण चौसष्ठ प्रतिमा असलेला मंडप आयताकार आहे. आयताच्या रुंदीच्या बाजूला समोरासमोर प्रत्येकी अकरा देवता व लांबीच्या बाजूला छतपट्टीवर समोरासमोर प्रत्येकी एकवीस देवता आढळून येतात. अशा या एकूण चौसष्ठ प्रतिमा आहेत. संख्या व मूर्तिशास्त्रीय वैशिष्ट्ये लक्षात घेतली, की या चौसष्ठ योगिनींच्या प्रतिमा आहेत यात काही शंका राहत नाही.

          चौसष्ठ योगिनींची भारतातील प्रसिद्ध मंदिरे ओडिशा राज्यातील हिरापूर आणि राणीपूर येथे आहेत. तसेच मध्य प्रदेशातील भेडाघाट येथील मंदिर प्रसिद्ध आहे. या तिन्ही मंदिरांचे विधान (प्लॅन) वर्तुळाकार आहे व मंदिरांना छत नाही. हिरापूर व माणगावच्या मंदिरांमधील योगिनी मूर्तींच्या वाहनांमध्ये साम्य आढळते आहे. ओडिशा येथील योगिनींच्या शिल्पांखाली त्या त्या देवतेचे नाव कोरले आहे व आसनावर वाहन किंवा चिन्ह शिल्पांकित केलेले आहे. त्यावरून देवतेचे नाव समजण्यास मदत होते. या आधारे माणगावच्या काष्ठशिल्प समूहातील योगिनींची नामनिश्चिती करण्यात येत आहे. योगिनी पंथ हा सर्वसाधारणपणे सहाव्या-सातव्या शतकात उदयास आला. बाराव्या शतकापर्यंत पूर्णपणे विकसित झाला, असे गॅडोन यांचे मत आहे. माणगावच्या शिल्पसमूहाचा काळ शैलीच्या आधारे आजपासून दोन-अडीचशे वर्षे मागे नेता येऊ शकतो, असा अंदाज आहे. योगिनींची उत्पत्ती लहानशा ग्रामीण अथवा आदिम जमाती राहत असलेल्या वसतिस्थानात झाली, असे विद्या देहेजिया मानतात. या देवता गावाचे मंगल, रक्षण करणाऱ्या ठरल्या आणि प्रसिद्धीस आल्या. या प्रदीर्घ प्रवासात त्यांना अनेक रूपे व नावे प्राप्त झाली. या देवतांना चैतन्यमयी देवतासमूहाचे महत्त्व प्राप्त झाले.

महाराष्ट्रात जखिण, जाखीण या देवीला भितीदायक अथवा भूत देवता मानलं जातं आणि या जखिणी बाबत अनेक गैरसमज समाजा मधे आहेत. उदा. जखिण म्हणजे एक स्त्री भूत असून ते माणसाच्या मागे लागतं इ. अशा अनेक दंतकथा जखिणी बाबत वेगवेगळ्या भागात अढळतात. हे सगळे गैरसमज कसे चूकीचे आहेत आणि जखिण उर्फ यक्षिणी ही देवी कशी सुफलतेची एक सुंदर देवी आहे ते आज आपण पाहणार आहोत.

जखिणी हा यक्षिणी शब्दाचा आपभ्रंष असून ही यक्षिणी म्हणजेच यक्ष स्त्री. अाता यक्ष म्हणजे काय तर यक्ष ही वेद, उनिषद, महाभारत यात वर्णन केलेली अतीमानव योनी आहे. म्हणजे यक्ष ही कोणतीही भुताटकी नसून ते मनुष्यच होते. मेघदूत हे कालिदासाचं काव्य तर शापित यक्षावरच आधारीत आहे. यक्ष संस्कृती भारततात वेदपूर्व काळा पासून पसरलेली असून कुबेर, ब्रह्मदेव हे सुध्दा यक्षच आहेत. यक्ष पूजा ही वैदिक संस्कृती पेक्षा ही जूनी आहे. पुढे यक्षांना शूद्र रुप देण्यात आले. यक्षांची निर्मिती कश्यप व विश्वा यांच्या पासून झाली असे मानन्यात येते.

         यक्षां बद्दल समाजात अनेक प्रवाह अाढळतात. काही पुराण कथांनुसार यक्ष हे मनुष्यभक्षक आहेत. ते पाण्याचे स्त्रोत, वनस्पती, जंगले यांचे रक्षक असून ते तलाव, उद्याने, जंगले यांमधे निवास करतात. महाराष्ट्रात हरिती देवीची पूजा करण्याची पध्दत आहे. हरित देवी ही बालरक्षक असून लहान बाळांना वाचवते आणि दिर्घाआयुष्य देते असे म्हटले जाते. ही हरीती देवी सुध्दा यक्षिणीच आहे. कामसुत्रात वर्णन केल्या प्रमाणे दिवाळी सारखा सण सुध्दा यक्ष संस्कृतीचीच देण आहे.

         यक्षिणींचा विचार करता पुराण कथांमधे ६४ यक्षिणींचे वर्णन आले असून त्यातील एका यक्षिणीचे कोकणात कुडाळ तालुक्यात माणगाव येथे मंदिर आहे. यक्षिणीच्या मूर्ती मंदिरे, लेण्या, स्तूप यांवर कोरलेल्या अाढळतात. यक्षिणींच्या मूर्ती या सौंदर्य व कामुकता दर्शवणार्या असतात. या मूर्ती विशेषतः फळे लगडलेल्या झाडांना, वेलींना टेकून असलेल्या यक्षिणींच्या स्वरुपात अढळतात. भारहूत आणि मथुरेत अशा चांगल्या अवस्थेतील मोठ्या मूर्ती आहेत.

       माणगावच्या यक्षिणी मंदिरातील योगिनींचे स्थान भारतातील इतर मंदिरांपेक्षा वेगळे आहे. ही यक्षिणी कोल्हापूरजवळच्या औरवाड येथून माणगावला आली, अशी एक लोककथा आहे. वैशिष्ट्य म्हणजे औरवाड येथील योगिनीशिल्पात चौसष्ठ योगिनींपैकी एका योगिनीची जागा रिकामी आहे. ती योगिनी माणगावला आली आहे, असे बोलले जाते. मुले जगावीत म्हणून पिठोरी अमावास्येला महाराष्ट्रात काही कुटुंबांमध्ये योगिनीपूजा केली जाते. चौसष्ठ योगिनींचा पट लावून हा पूजाविधी पार पडतो. या पटाप्रमाणे उत्त्थित शिल्पसमूह औरवाड येथे आढळून आला आहे आणि त्यातील एका योगिनीची जागा रिकामी आहे. म्हणजेच औरवाडच्या मंदिरात त्रेसष्ठ योगिनी आहेत.

     माणगावच्या मंदिराचे पुजारीपण कोनकर घराण्याकडे आहे. नवरात्रीचा उत्सव तेथे उत्साहाने साजरा होतो. कोकणी काष्ठशिल्पांमधील आणि योगिनी देवतासमूहाच्या परिवर्तनाच्या प्रक्रियेचे व विस्ताराचे उदाहरण म्हणून माणगावच्या यक्षिणी मंदिरातील काष्ठशिल्प समूहाकडे पाहता येते. या देवीचं भव्य मंदिर म्हणजे गावानं किमान सातशे वर्षं जपलेला वारसा आहे.

            भव्य आणि ऐसपैस मंदिर, मोठी दालने, हातात न मावणारे मोठाले लाकडी खांब, खाबांवरील सुंदर नक्षीकाम, छतावर आतल्या बाजूने लाकडात कोरलेल्या मूर्ती, गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर असलेले लाकडी द्वारपाळ जय-विजय, मंदिराबाहेर असलेली दीपमाळ, तुळशी वृंदावन ही यक्षिणी देवीच्या मंदिराची काही वैशिष्ट्यं सांगता येतील. शिवाय मंदिराच्या समोर पिंपळाचा भव्य पार, मोठी चौकोनी विहीर या गोष्टीही निश्‍चितच पाहण्यासारख्या आहेत. आपल्या भारतात यक्षिणी देवीची मंदिरं हाताच्या बोटावर मोजण्याइतकी दुर्मिळ आहेत. हे त्यातलंच एक मंदिर आहे. दत्तावतारी परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांचे जन्मस्थान देवीच्या देवळाशेजारीच आहे. हे स्वामीही यक्षिणी देवीचे उपासक होते. भारतात यक्षिणी देवीची मंदिरं हाताच्या बोटावर मोजण्याइतकी दुर्मिळ आहेत. हे त्यातलंच एक मंदिर आहे.       
        साक्षात श्री प. प. नृसिंह सरस्वतींच्या सेवेत असणा-या योगिनींपैकी यक्षिणी देवी एक प्रमुख देवता होती. श्री. प. प. नृसिंह सरस्वतींनी सांगितल्याप्रमाणे पुढील अवतारापूर्वी “ तू आधी माणगांवी जाऊन तेथे गांव वसव कारण माझा पुढील अवतार माणगांवी होणार आहे ”. त्यांच्या ईच्छेने माणगांवची ग्रामदेवता श्री देवी यक्षिणी झाली. श्री. प. प. टेंब्ये स्वामी व श्री. प. पू. ब्र. सीताराम महाराज यांचे जन्मस्थान व ग्रामदेवता श्री यक्षिणी मंदिर हे जवळच आहे.

भक्ताभिष्ट फलप्रदां त्रिनयनां जांबुनदांभ प्रभाम ।  
पाणिभ्यां दधतिमसिंच जलजं दुर्धर्ष दैत्यापहाम ।।

मुक्तारत्नसुवर्ण भूषणधरां दिव्यांबरीं सुंदरीम ।     
माणग्राम महेश्र्वरीं भगवतीं श्री यक्षिणीं मंगलम् ।।

       श्री. प. प. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज श्री क्षेत्र नृसिंहवाडीस असतांना मध्यान्ह समयी भीक्षेसाठी अमरापूरला जायचे. तेथे ६४ योगिनी त्यांचे स्वागत, पूजन करत. भिक्षा वाढत असत. या सगळ्या योगिनींनी अमरापूर सोडून न जाण्यासंदर्भात विनंती केली. तेव्हा महाराज म्हणाले मी या औदंबरातच सूक्ष्म चैतन्यरुपाने वास करुन भक्तांच्या कामना पूर्ण करीन. ते श्री देवी यक्षिणीला म्हणाले,

नाम आहे कोकण, सुंदर वाटिका जाण
त्यांत आहे माणग्राम, वास तेथे करावा
तयेग्रामी टेंब्ये वंश, माझा भक्त गणेश
त्याचे पोटी ईश्वरी अंश, तोचि योगीराज जाणावा
ग्राम आहे ओस, तेथे करावा तू वास
साह्य व्हावे भक्तांस, तपस्वी असती जे कोणी
ब्रह्मराक्षस वेताळ, पिशाच्च गणांचा मेळ
राहे तेथे सर्व काळ, मनुष्यमात्रा हिंसती

     माझा पुढचा अवतार माणगांवी होणार आहे. तेथे मनुष्यवस्ती नाही. तेथे ब्रह्मराक्षस, वेताळ, भूत, प्रेत, पिशाच्चांचा संचार आहे. त्यामुळे तेथे तू जाऊन भूत पिशाच्चांचा प्रबंध कर. मनुष्यवस्ती निर्माण कर. महाराजांच्या या आदेशानुसार श्री यक्षिणी माता श्री देव शंकरासोबत माणगांवी आली.त्यावेळी माणगांव मध्ये एक कुंभार परमेश्वराचे चिंतन करत एकटाच राहत असे. दुसरा कोणी मनुष्य एक रात्रसुध्दा राहायला तयार नसे. श्री देवी यक्षिणी मातेने शंकराला गाव पाहण्यासाठी पाठविले. त्यावेळी शंकर एका वाण्याच्या रुपात कुंभाराला भेटले. सर्व सीमांची पाहणी केली.

मध्यग्रामी वैश्यनाथ, अपुले नामी लिंग स्थापित । 
म्हणे कार्य झाले आता येथ, जाऊ सत्वर गृहाशी ।।

माणगावातील मध्यवर्ती जागेची पाहणी करुन स्वतः शंकरानी शिवलिंगाची स्थापना केली. महादेव मंदिरासमोरच श्री देवी यक्षिणीचे मंदिर आहे. संपूर्ण भारतात यक्षिणीचे एकच मंदिर आहे. शंकरानी आपल्या गणाला पाठवून वेताळाला बोलाविले. ते वेताळाला म्हणाले, श्री देवी यक्षिणी येथे राहणार आहे. त्यामुळे या गावात मनुष्यवस्ती होणे आवश्यक आहे. तू भूत पिशाश्र्चांचा बंदोबस्त कर. मनुष्यमात्राला यांचा त्रास होता कामा नये.

         हळूहळू मनुष्यवस्ती वाढत गेली. ग्रामदेवता यक्षिणी मातेचे गावात आगमन झाले. श्रावण वद्य पंचमी शके १७७६ ( दि. १३ ऑगस्ट १८५४ ) रोजी महाराजांचा जन्म झाला आणि माणगांव त्यांच्या जन्माने पुनित झाले.  माणगांव गावातील मूळ भूमिका श्री देवी सातेरी असून तिचे स्वतंत्र मंदिर जवळच आहे. तसेच वेतोबाचे ( वेताळ ) मंदिर देखील एक कि. मी. अंतरावरच आहे.

श्री .प.प. वासुदेवानंद सरस्वती कृत  यक्षिणीची आरती


ओवाळू यक्षिणी तुज विमले । विज्ञान दे मज पहिले ।।धृ०।।
कार्तिक मासी वैशाख मासी । होती उत्सव भले ।।ओ०१।।
शरदि वसंती नवरात्र होती । उत्सव तुझे चांगले ।।ओ०२।।
आश्विन दसरा होता वाटे दुसरा । आला नाक तेथे वत्सले ।।ओ०३।।
फाल्गुनि शिमगा हो कां दाविरंगा । तुझे गांवी शिवमहिले ।।ओ०४।।
वळखुनि भावा तुवा वासुदेवा । भवा हरूनि तारिले ।।ओ०५।।

कै. श्री दिवाकर शास्त्री साधले यांनी केलेली श्री देवी यक्षिणीची आरती   

   
महिषाख्या सुरमर्दिनी दाक्षायणि माये। माणग्रामस्थ जनोध्दारिणी हर जाये।
भक्तानुग्रह कारिणी सर्वामरपुज्ये। सकलारिष्टे निरसुनि पालय मा सदये।
जय देवी जय देवी श्री यक्षिणी अंबे। आरती ओवाळु तुज हत दैत्य कदंबे।।धृ।।
दुर्गे दृष्कृत नाशिनीं दुर्गासुर हरणे । दुष्ट निबर्हिणी दुस्तर भवनिधी जलतरणे।
दु ख दवाग्नि प्रशमनि दुर्ज्ञेया चरणे । दुर्लभ दर प्रदायिनी वंदे तव चरणे।
जय देवी जय देवी श्री यक्षिणी अंबे। आरती ओवाळु तुज हत दैत्य कदंबे।।1।।
त्रिजगज्जनि भवानि देवी जखुबाई । ग्रामस्वामिनी भगवती आमुची तु आई।
तुजवाचुनि मज रक्षक कोण जगी नाही। म्हणुनि दिवाकर विनवि वंदुनि तव पायी।
जय देवी जय देवी श्री यक्षिणी अंबे । आरती ओवाळु तुज हत दैत्य कदंबे।।2।।

श्री देवी यक्षिणी मंगलाष्टके


उद्यत्पूर्ण सुधांशु कोटि धवलां, विद्युल्लसव्दाससाम्।सौवर्णाभरणां प्रसन्न वदनामुत्तुंग वृक्षोरुहाम्।।
पीनश्रोणि तट प्रवेक रशनां शक्तिं परां शांभवीम्। शस्त्रीपात्रकरां स्वभक्तवरदां नित्य भजे यक्षिणीम्।।१।।
भ्राजत्कर्ण विभूषणच्छविलसग्दंडांच शस्त्रींतथाs मंत्रं संदधतीं द्विबाहु मनिशं शुभ्रांशु कोटि प्रभाम्।।
बिभ्राडंबर धारिणी प्रविकसद्वत्क्रांबुजां मंडिताम्। सेवेहं शिवशक्तिमीष्ट वरदां श्री यक्षिणी मंगलम्।।२।।
या विद्येत्यभिधीयतेश्रुतिपथे शक्तिः सदाद्यापरां। सर्वज्ञा भवबंध छित्तिनुपुणा सर्वाशये संस्थिता।
दुर्ज्ञेया सुदुरात्मभिश्च मुनिभिः ध्यानास्पदं प्रापिता। प्रत्यक्षा भवतीह सा भगवती श्री यक्षिणीं मंगलम्।।३।।
अद्यांह तव पाद पंकज परो गोदान गर्वेण वै। धन्योsस्मिति यथार्थ वाद निपुणो जातः प्रसादाच्चते।।
याचेत्वां भवभीतिनाशचतुरां मुक्ति प्रदांचेश्वरीम्। हित्वामोहकृतं महार्ति निगडं श्री यक्षिणीं मंगलम्।।४।।
या वाचस्पतिना सुरेंद्र पुरतो नाके सदास्तूयते।।
भू लोके ऋषयः शुभं सुचरितं यस्याश्चिरं पठ्यते। सा देवी प्रकारोतु नो नवरतं श्री यक्षिणीं मंगलम्।।५।।

Translate »
error: Content is protected !!