श्री गणपती मंदिर – कोरेमान वाडा

Spread the love
श्री गणपती मंदिर - कोरेमान वाडा
श्री. गणपती मंदिर –  कोरेमान वाडा – देवगड.
 
          देवगड तालुक्यातील जामसंडे – विजयदुर्गला जाताना वाडातर पुलापासून अवघ्या १ कि. मी. अंतरावर असलेले कोरेमान वाडा मध्ये जाताना रस्त्याला लागूनच श्री. गणपती मंदिर आहे. 
      
           हे श्री. गणेश मंदिर जागृत देवस्थान म्हणून भाविकांमध्ये ओळखले जाते. या देवस्थानाचे पावित्र्य इतके आहे की येथे येणा-याचे मानसिक आणि शारिरीक सामर्थ्य वाढते.
 
          असे भाविक मानतात. वाडातर पुलापासून १ कि. मी. अंतरावर उजव्या बाजूला भल्या मोठ्या सातवनात वृक्षाच्या खाली एक छोटा गोड पाण्याचा तलाव आहे. तेथे दगड काम करणारे कामगार पाणी पिण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी येत असे. त्यांनीच आपल्या कला – कौशल्यातून एका भरीव दगडापासून श्री. गणेशाची मूर्ती निर्माण केली. व तळ्याकाठी तिची प्रतिष्ठापना केली. 
    काही दिवसांनी तळ्याकाठची ही श्री. गणेशाची मूर्ती एका ब्राम्हणाच्या दृष्टीस पडली. पुढे त्याने या श्री. गणेश मूर्तीची नित्यनेमाने पूजा सुरू केली. व या ब्राम्हणाला मूल – बाळ नव्हते. भक्तीचे फळ म्हणून श्री. गणेशाच्या कृपेने त्याला पुत्ररत्नाचा लाभ झाला. तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. नंतर त्याचे भक्ति – प्रेम वाढत गेले. व ती बातमी संपूर्ण गावामध्ये पसरत गेली. त्या क्षणापासून या ठिकाणी नवसाला पावणारा गणपती म्हणून या कोरेमान वाडा मधील श्री. गणेश मूर्ती भाविकांमध्ये प्रसिद्ध झाली. 
 
           पुढे या मूर्तीसाठी मंदिर बांधण्यात यावे असा निर्णय गावातील गावक-यांनी घेऊन तेथे मंदिराची उभारणी करण्यात आली. या मंदिराचे बांधकाम सन २१ जाने २००७ रोजी पूर्ण झाले. हे मंदिरगोलाकार असून दक्षिण भारतात अशा त-हेची मंदिरे आहेत. मंदिराच्या सभोवती अष्टविनायकांच्या मूर्ती आहेत. मंदिरामध्ये येणा-या – जाणा-या वाहन चालक त्याठिकाणी श्री. गणेशाचे आशिर्वाद घेतल्याशिवाय पुढच्या मार्गाला जात नाही.
माघी गणेश जयंतीला भाविकांची येथे दर्शनासाठी गर्दी होते. या दिवशी मंदिरात भजन, सत्यनारायणाची पूजा आदी कार्यक्रम पार पडतात. याशिवाय मंदिपाच्या वतीने अनेक प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
Translate »
error: Content is protected !!