Spread the love
श्री रामेश्वर मंदिर, कांदळगाव

ऐतिहासिक कांदळगावच्या रामेश्वराची माहिती पर्यटकांसमोर येण्याची गरज

kandalgav-Rameshwar

             मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील रामेश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे अतूट असे ऐतिहासिक नाते आहे. जगप्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्याची उभारणी करतांनाशिवाजी महाराजानी रामेश्वराला साकडे घातले व त्या शिवपिंडीवर घुमटी उभारली. मंदिराच्या समोरच वटवृक्षाचे रोपटे लावले. आजही या गोष्टी त्या ठिकाणी पहावयास मिळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन पर्यटकांसमोर सादर करताना या घटना अधोरेखित घेण्याची गरज आहे.

सतीशपाटणकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कांदळगाव हे एक ऐतिहासिक गाव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी मालवण शहरापासून अवघ्या ७ ते ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या या कांदळगावाला ऐतिहासिक असे महत्व आहे.

छत्रपती शिवाजी महाराजानी मालवणच्या कुरटे बेटावर सिंधुदुर्ग किल्ला बांधावयास घेतला त्यावेळी समुद्रातील मातीच्या पाण्याने तटबंदीचे दगड ढासळत होते. किल्ला आकार घेत असताना लावलेले दगड कोसळत होते. बांधकामात सतत व्यत्यय येत होता. त्यायवेळी महाराजांनादृष्टांत झाला . मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर त्यांच्या स्वप्नात आले . ” मालवणच्या उत्तरेकडे माझी पिंडी आहे . ती उघड्यावर असून तिच्यावर छत्र उभेकर आणि नंतर किल्ल्याचे बांधकाम सुरु कर “, रामेश्वराच्या दिलेल्या दृष्टांतानुसार छत्रपती शिवाजी महाराजांची स्वारी उत्तरेकडे शिवपिंडी शोधावयास निघाली . जंगलमय , सखल भाग , कांदळवन , पाणी व चिखलाची दलदल असा परिसर असलेल्या राईसमध्ये महाराजांना पिंडी आढळून आली . 

Rameshwar

यानंतर छत्रपती शिवरायांनी श्री देव रामेश्वराच्या सांगण्यानुसारशिवपिंडीवर एका रात्रीत घुमटी बांधली . स्वयंभू पाषाणाला पुराचे पाणी लागू नये यासाठी घुमटीच्या चारही बाजूस कठडा उभा केला . त्या घुमटीसमोर आठवण म्हणून वटवृक्षाचे रोपटे लावले . ते वडाचे झाड सध्या ” शिवाजीचा वड ” म्हणून ओळखले जाते . घुमटी बांधून झाल्यावर किल्ल्याच्या बांधकामात कोणतेही विघ्न आलेले नाही आणि सिंधुदुर्ग किल्ला बांधून पूर्ण झाला . छत्रपती शिवाजी महाराज आणि कांदळगावचे असे ऐतिहासिक नाते  आहे .

कांदळगावचा रामेश्वर राणेकुटुंबाचे ग्रामदैवत आहे.महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक, पारंपरिक त्रैवार्षिक भेट सोहळा साजरा केला जातो. यासाठी कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू देव रामेश्वर आपले वारेसुत्र, तरंग व रयतेसह किल्ले सिंधुदुर्ग येथे रवाना होताना या ऐतिहासिक देदीप्यमान भेट सोहळय़ात हजारो भाविक सहभागी होतात. 

  दर तीन वर्षांनी देव रामेश्वर सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी येत असतात.

      ढोलताशांच्या गजरात रामेश्वराची पालखी भेट सोहळय़ासाठी आपल्या वारेसूत्र, तरंग व रयतेसह बाहेर पडते किल्ल्यावर निघालेली ही स्वारी मार्गातील कामरादेवी, सीमा म्हारतळ, मारुती घाटी यांना सांगणे करून पुढच्या प्रवासाला निघते.. वाटेत ओझर, कोळंब, धुरीवाडा येथे ग्रामस्थ मोठय़ा उत्साहात रामेश्वराचे स्वागत करतात. मालवणच्या हद्दीवरून म्हणजे मालवण-कोळंब या पुलावरून स्वागताने रामेश्वराला जोशी परिवार रितीरिवाजाप्रमाणे जोशीवाडा महापुरुष येथे घेऊन येतात. त्यानंतर मेढा जोशी महापुरुष मांडावर देव स्थिर होतात. या मांडावर इतर वारीसुत्रे विसर्जित होतात. मात्र रामेश्‍वराचा अवसर विसर्जित होत नाही.  रामेश्वराची, सोबत असणाऱया इतर देवतांची वारेसूत्र, तरंग व रयतेसह सर्वांना गूळ पाणी देऊन सेवाचाकरी करतात. त्यानंतर जोशी परिवाराकडून रामेश्वराला सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत सुखरुप पोहोचविले जाते. सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक भेटीनंतर देव रामेश्वराला त्याच होडीने दांडी येथे सुखरुप पोहोचविण्यात येते, किल्ल्यात प्रवेश करताना २१ नारळ फोडले जातात. हा सोहळाच अपूर्व असा असतो. अशी प्रथा आहे.

     देव रामेश्वर सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेल्यानंतर किल्ल्यावरील प्रमुख मानकरी सकपाळ कुटुंबिय स्वागत करतात. त्यानंतर छत्रपतींकडून शेले-पागोटे देऊन देव रामेश्वराला नजराणा दिला जातो. सर्व वारेसुत्रांचाही सन्मान करण्यात येतो.. रामेश्वराकडून छत्रपतींना जिरे टोप व वस्त्रालंकार देऊन सन्मानित करण्यात येते. ( लेखक  मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Translate »
error: Content is protected !!