सतीश य. पाटणकर
सावंतवाडी संस्थान ३६५ खेडेगावांचा मालक व रक्षणकर्ता म्हणून श्री देव उपरलकर देवस्थानची ओळख आहे. सावंतवाडी संस्थानच्या साडेतीनशे वर्षांच्या कालखंडात व देवस्थानच्या महाराजांचे श्रद्धास्थान होते. त्यानंतरही आजतागायत या स्वयंभू देवस्थानची ओळख भक्तगणात नवसाला पावणारा किंवा रक्षण करणारा देव म्हणूनचा आहे.
त्यांच्यात शिवशंकराचा अंश असल्याची कथाही सांगितली जाते आणि त्यावर लोकांचा विश्वास आहे.या देवस्थानच्या श्रद्धेमुळे अनेक भाविकांचे रक्षण झाल्याच्या कथा आहेत. मोती तलावाकाठी राजधानी बसविण्याच्या वेळी चार सीमारक्षकांची नेमणूक राजघराण्याने केली. उपरलकर, माठेवाडयातील दिंडीकर, सालईवाड्यातील काजरेकर आणि गरडीतील हेळेकर हे चार सीमारक्षक उपरलकर शंकराच्या आद्यदेवतांचा अंश मानले जातात.श्री देव उपरलकर देवाकडे ३६५ खेड्यातील चाळे सुपूर्द आहेत. ३६५ खेड्यातून त्यावेळचे दांडेकर व प्रमुख गावकरी मंडळी बकरा अगर कोंबड्यांचा सांगड, एक नारळ व पानाचा विडा घेऊन वाजतगाजत येत. त्यावेळच्या राजांच्या हस्ते या देवकार्याचा सोहळा होत असे. प्राणीबळी देण्याची ही पद्धत बापूसाहेब महाराजांनी बंद केली,अशी एक माहिती दिली जाते. संस्थानांवर गनिमांचा हल्ला झाला. संस्थानची त्यांना प्रतिरोध करण्याची तयारी नव्हती. त्यावेळी तत्कालीन राजे आबासाहेब देवपूजेसाठी श्री देव पाटेकरांकडे बसले होते. सेनापती दळवी यांनी गनिमांच्या चढाईची हकीकत त्यांच्या कानी घातली.
राजेसाहेबांनी दळवींच्या हातात नारळ दिला व उपरलकराकडे गाऱ्हाणे घालून नारळ फोडण्यास सांगितला. सेनापतींनी तसे करताच गांधीलमाशांचे मोहोळच्या मोहोळ उठून त्यांनी शत्रूशी दाणादाण उडवून दिली.
श्री देव उपरलकर देवाच्या कृपेने त्याकाळी सैन्य पळविण्यात खेमसावंत यशस्वी झाले. त्यावेळी ओटवणे येथे कौलप्रसाद घेतला. त्यावेळी श्री देव उपरलकर यांनी मी या संस्थानातून जाणार नाही असे सांगितले. तेव्हा संस्थानच्या ३६५ खेड्यांचा मालक म्हणून जबाबदारी उपरलकर देवाने घेतली, अशी आख्यायिका आहे.सावंतवाडी संस्थानाच्या स्थापनेनंतरच्या २५ वर्षांच्या काळातील हे उपरलकर देवस्थान आहे. ३६५ खेडेगावांचे रक्षण करणाऱ्या शंकराचा शिवगण म्हणून मानल्या जाणाऱ्या उपरलकरास कोंबे देण्याची प्रथा आहे. या देवस्थानशेजारी एक तळी आहे म्हणजेच विहीर आहे. या देवस्थानच्या जवळ उपरलकर स्मशानभूमी आहे. तेथे मृत व्यक्तीस अग्नी दिल्यानंतर क्रियाकर्म या तळीजवळ केले जायचे. त्या काळात पाणी पिणे अवघड होते. म्हणून वनखात्यात नोकरीला असणारा आप्पा भेंडे यांनी ही तळी बांधली. त्याच शेजारी पत्नी काशीबाई स्मरणार्थ दिवाकर रामचंद्र भेंडे कट्टा पेंडूर शके १८१४ मध्ये तळी बांधल्याचा एका खांबावर उल्लेख आहे. सन १९९२ मध्ये प्रभाकर मसुरकर यांनी तळीचे दुरुस्तीचे काम केले.
श्री देव उपरलकर मूर्ती प्रभाकर मसुरकर यांच्या खर्चाने दादा चव्हाण यांनी बांधली. या देवस्थानात दर रविवारी व बुधवारी सावंतवाडी शहरासह आजूबाजूच्या गावातील भक्तगण, त्यात महिला, पुरुष, मुलेही येतात. आज उपरलकराची श्रद्धा मोठी आहे, श्री देव उपरलकर देवस्थानाची आख्यायिका जेवढी मोठी आहे त्यापेक्षाही हाकेला किंवा नवसाला पावणारा देव किंवा प्रसंगाला अदृश्य स्थितीत सहकार्य करणारा देव म्हणून ओळख आहे.
सावंतवाडी – आंबोली मार्गावर शहराच्या पाच मिनिटांच्या अंतरावर हे देवस्थान वसले असून सावंतवाडीवासियांची या देवस्थानाविषयी अपार श्रद्धा आहे. तसेच या उपरलकर देवस्थानाकडे बुधवारी व रविवारी नवस बोलले जातात. शहरातून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे देवस्थान खरोखरच निसर्गमय ठिकाणी वसले आहे. या उत्सवदिनी शहर व शहरालगतच्या गावातील भाविक मोठ्या संख्येने येतात व श्री देव उपरलकर देवस्थानाचा प्रसाद स्वीकारतात. श्री देव उपरलकर देवस्थानची ओळख सर्वदूर असल्याने या मार्गाने जाणारे वाहनचालक वाहन थांबवून नतमस्तक होऊनच पुढे जातात. दर रविवार व बुधवारी याठिकाणी शहरातील लोक या देवस्थानाकडे आवर्जून उपस्थित राहतात. त्याशिवाय येथे सदैव वर्दळ असते.
————————————————————————————–