Sindhudurg
+91-9404 357199
info@sindhudurg-paryatan.com

मनोहर-मनसंतोष गड

Scuba Dive, Snorkeling, Water Sports, Beach and Many More....

ऐन घाटमाथ्यावर, आंबोली घाटाच्या पायथ्याशी असलेली ही जोडगोळी. अवघड वाट, दळणवळणाच्या गैरसोयी यामुळे भटक्यांची पावले फारशी इकडे वळत नाहीत. ‘मनोहर-मनसंतोष’चे हे अनगड रूप आणि त्याची ऐन घाटमाथ्यावर, आंबोली घाटाच्या पायथ्याशी असलेली ही जोडगोळी. अवघड वाट, दळणवळणाच्या गैरसोयी यामुळे भटक्यांची पावले फारशी इकडे वळत नाहीत. ‘मनोहर-मनसंतोष’चे हे अनगड रूप आणि त्याची वाट..

कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरून कोकणात उतरण्यासाठी चार घाट आहेत. पहिला अंबा, दुसरा बावडा, तिसरा दाजीपूर जंगलातून खाली उतरणारा फोंडा आणि सर्वात शेवटचा आंबोली. या चारही घाटांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्या माथ्यावर किल्ले आहेत. यातील बहुसंख्य हे शिवपूर्वकाळात बांधलेले आहेत. या सर्वामधील आंबोली घाट तर चक्क महादेवगड फोडूनच बनविलेला आहे. याच्या घाटमाथ्यावर नारायणगडासारखा तर पायथ्याशी मनोहर-मनसंतोष गडांसारखे बलदंड किल्ले आहेत. यापैकी नारायणगड हा मुख्य सह्य़धारेपासून थोडा सुटावलेला आहे. सद्यस्थितीला त्यावर एक-दोन चौथऱ्यांशिवाय फारसे काही नाही. एके काळच्या प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी संस्थानाच्या पूर्व हद्दीवरील हे सारे किल्ले. पण फारच कमी डोंगरभटक्यांचे पाय इकडे वळतात. यातीलच ‘मनोहर-मनसंतोष’ जोडीच्या भटकंतीला आज निघुयात. मनोहर-मनसंतोष गडावर जाण्यासाठी पेठशिवापूर आणि शिरसिंगेजवळच्या गोठवेवाडीतून रस्ता आहे. यातील पेठशिवापुरास जाण्यासाठी सावंतवाडीहून एस.टी.ची सोय आहे. पण या एस.टी.च्या वेळा दुर्गभटक्यांच्या उपयोगाच्या नाहीत. तरीही त्यातल्या त्यात सावंतवाडीहून पेठशिवापुरास मुक्कामाची एक एस.टी. जाते. या गाडीने रात्रीच गावात दाखल होत सकाळी गड जवळ करता येतो. दुसरा मार्ग गोठवेवाडीतून जातो. या गोठवेवाडीसाठी सावंतवाडी-आंबोली रस्त्यावरील शिरसिंगे गावातून वाट जाते. शिरसिंगे ते गोठवेवाडी ही वाट चांगली वळणावळणाची आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तर इथला निसर्ग एखाद्या अवखळ मुलाप्रमाणे उधाणलेला असतो. आजूबाजूच्या डोंगरदऱ्यांमधून पडणाऱ्या जलधारांचे प्रपात सतत कानावर पडत असतात. वाडीत पोहोचताच मनोहर आणि मनसंतोष गडाचे मोहक दर्शन घडते. ज्याचा पसारा मोठा तो मनोहरगड तर ज्याचा कमी तो मनसंतोषगड! या गोठवेवाडीतूनच एक पायवाट या दोन्ही गडांच्या दिशेने झेपावते. वाट खडय़ा चढणीची असल्यामुळे छातीचा ऊर फाटतो की काय असे वाटते. जसे आपण उंची गाठू लागतो, तसे आंबोली खोऱ्यांमधील गावांचे विहंगम दृश्य दिसायला लागते. साधारण दीड तासाच्या चढाईनंतर आपण एका जंगलाच्या पट्टय़ामध्ये शिरतो. मध्येच पेठशिवापुराहून येणारी वाट येऊन मिळते. अध्र्या तासाच्या चढाई नंतर आपण किल्ल्याच्या तटबंदीपाशी पोहोचतो. इथून डावीकडे जाणारी वाट मनोहरगडास वेढा मारून मनसंतोषकडे तर उजवीकडची मनोहरगडाकडे जाते. आधी आपले लक्ष मनोहरगड असल्यामुळे आपण उजवीकडची कोरीव पायऱ्यांची वाट पकडायची. साधारण पन्नास पायऱ्या चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या पूर्वाभिमुख उद्ध्वस्त दरवाज्यापाशी पोहोचतो. आत शिरल्यावर आपण एका भक्कम बुरुजावर पोहोचतो. इथून डावी, उजवीकडे दोन वाटा वळतात. यातील उजव्या वाटेने तटावरून चालत गेल्यावर आपण उत्तर टोकापाशी पोहोचतो. इथे तटामध्ये एक गुप्त दरवाजा आहे. या दरवाजापर्यंत उतरण्याची वाट मात्र मोडकळीस आलेली आहे. त्यामुळे दरवाजा दूरवरूनच बघायचा आणि माघारी मूळ जागी यायचे. इथून आता डावीकडची वाट धरायची. या उद्ध्वस्त दरवाजापासून तटबंदीची रांग थेट दक्षिण टोकापर्यंत धावत गेलेली आहे. या तटाचे वैशिष्टय़ म्हणजे यात जागोजागी शौचकूप बांधलेले आहेत. समोरील उंचवटय़ावर एक भक्कम चिरेबंदी दगडांची वास्तू आपले लक्ष वेधून घेते. खाली भला मोठा चौथरा आणि त्यावर बांधलेली ही इमारत दोन खोल्यांमध्ये विभागलेली आहे. या इमारतीच्या जवळच औदुंबराचे झाड आहे. या झाडाच्या सावलीत भैरोबांच्या दोन मूर्ती आहेत. याला स्थानिक लोक ‘गडाचा चाळा’ असे म्हणतात. या औदुंबराच्या झाडापासून आपण पश्चिमेकडची वाट धरायची. या पश्चिम टोकावरून मनसंतोषगडाचा संपूर्ण नजारा दिसतो. हे पाहून आपण पुन्हा औदुंबराच्या झाडापाशी पोहोचायचे आणि उत्तर टोकाकडच्या तटाकडे वळायचे. वाटेत एक विहीर लागते. या विहिरीमधील पाणी पिण्यायोग्य असल्याने इथे थोडा विसावा मिळू शकतो. ही विश्रांती घेत गड उतरायला लागायचे. पायऱ्या उतरल्यावर आपण थोडय़ावेळेपूर्वीच्या मनसंतोषगडाकडे जाण्यास सोडलेल्या वाटेला येऊन मिळतो. या वाटेने थोडे चालू लागलो की, काही अंतरावर एक भली मोठी गुहा दिसते. या गुहेच्या वर मधमाशांची पोळी असल्याने थोडी सावधानता बाळगावी. थोडय़ाच वेळात आपण मनोहर आणि मनसंतोषमधील खिंडीपाशी पोहोचतो. इथून मनसंतोषगडाचा सुळका अंगावर आल्यासारखा भासतो. मनसंतोषगडाला उजव्या हातास ठेवून एक पायवाट पुढे जाते. या वाटेने थोडे अंतर चालल्यावर आपण किल्ल्यावर जाणाऱ्या उद्ध्वस्त पायऱ्यांपाशी पोहोचतो. या पुढचा टप्पा थोडासा अवघड आहे. यासाठी जवळ एखादा सुरक्षारक्षक दोर असणे आवश्यक आहे. हा टप्पा पार केल्यावर आपण थेट गडाच्या माथ्यावर जाऊन पोहोचतो. मनसंतोषगडाचा गडमाथा निमुळता असून, तो पूर्व-पश्चिम पसरलेला आहे. सध्या या माथ्यावर एक-दोन वाडय़ांची जोती दिसतात आणि दोन पाण्याची टाकी आहेत. याशिवाय वर फारसे अवशेष नाहीत. मात्र गडावरून आंबोली घाटाच्या खोऱ्यातील परिसराचे नयनरम्य दृश्य दिसते. हे दृश्य पाहतच मनोहर-मनसंतोषगडाचा निरोप घ्यायचा आणि उतरू लागायचे. अनगड वाटेवरचे हे दोन गड पाहताना पावले थकलेली असतात पण मन समाधानाने भरून पावलेले असते.

shares