Spread the love

पेंडूर : शोध प्राचिनत्वाचा आणि मौखिक परंपरांचा !

विनायक परब

vinayakparab@gmail.com

Twitter – @vinayakparab

             “शोधायचे नेमके काय हे माणसाला एकदा कळावे लागते. ते कळले की, मग सारे सापडत जाते!’’ प्रा. डॉ. कुरुष दलाल पुरातत्त्वविज्ञानाच्या वर्गात सांगत होते. त्यांच्या या विधानातूनच पुढे कोणत्या दिशेने जायचे आहे, त्याची विचारनिश्चिती झाली. त्या क्षणापर्यंत आपण कशाचा शोध घेतो आहोत, आपल्याला त्यातून काय अपेक्षित आहे, याचे पडलेले कोडेही सुटले!

           पेंडूर… सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील हे माझं गाव. हे गाव गेली अनेक शतकं पुरातत्वीय संदर्भ घेऊन जगतंय, असे विचार गेली कित्येक वर्षे मनात होते. खरे तर या शोधाचे बीजारोपण माझ्या बालपणीच झाले होते,  आजी रुक्मिणी आणि आजोबा विठ्ठल भिवा परब यांनी सांगितलेल्या गावच्या संदर्भांमधून आणि गोष्टींतून. तेव्हा तर हेही कळत नव्हते की, आपल्याला ज्याचे आकर्षण आहे त्या बाबींना पुरातत्वीय म्हणतात. आजोबा- आजी नेहमीच पांडव गावात येऊन गेल्याच्या कथा सांगायचे.   त्यातील माझ्यासाठीचा महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे लहानपणी आजी- आजोबा दगडी खेळण्यांनी खेळायचे त्याचा. गावात असलेल्या आबदारनाथच्या टेकडीवर ही दगडी खेळणी होती, असा तो संदर्भ आजोबांकडून पुन्हा पुन्हा खातरजमा करून घेतला होता. त्यावेळेस त्यांनी सांगितले होते की, “फक्त मीच नव्हे तर गावातील सर्व मुले त्या दगडी खेळण्यांनी खेळायची.  देवाची खेळणी असल्याने कुणी ती घरी न्यायची नाहीत, असा दंडक होता. त्यामुळे मुले ती खेळणी तिथेच ठेवून संध्याकाळी घरी परतायची.’’ मला तेव्हाही वाटायचे की, ती खेळणी आजही असणार… फार तर मातीखाली दबलेल्या अवस्थेत असतील. म्हणून बारावीच्या सुट्टीत तिथे जाऊन शोध घ्यायचा प्रयत्नही केला.  त्याच वेळेस म्हणजे १९८७  साली आजी- आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींचे संदर्भ घेऊन आणि  गावातील अनेकांशी बोलून पुरातत्वीय बाबींची एक यादीही तयार केली होती. त्यावेळेस प्रथम लक्षात आले होते की,  

आपल्या गावी जैन शिल्पकृतीही आहेत. जैन देवळाचे काही अवशेष असून त्याला स्थानिक गावकरी `संतीण ढंकीण’ म्हणतात. तिथेच एक `चाळा’ आहे असेही कळले होते. पण त्याचा थांग काही फारसा लागला नव्हता. त्या जैन मंदिराच्या उंचवट्याच्या परिसरात काही पुरातत्त्वीय बाबी नक्कीच हाताला लागतील, असे अनेकदा वाटायचे.  अर्थात केवळ खूप आतून वाटायचे हे वगळता त्याला कोणत्याही तर्काचा आधार त्यावेळेस नव्हता. आजोबांनी त्यांच्याच हयातीत आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या मंडळींना त्या संदर्भातील संशोधनासाठी एकदा गावी आणले होते. मात्र त्यावेळेस त्या मूर्ती गावातून नेण्याचा प्रयत्न एएसआयने केल्याने त्याला विरोध झाला, असे खुद्द आजोबांकडूनच ऐकले होते.

या सर्व पार्श्वभूमीवर मी मुंबई विद्यापीठातील बहिःशाल शिक्षण विभागाच्या संचालक मुग्धा कर्णिक यांच्या प्रोत्साहनाने पुरातत्त्वविद्या या विषयाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.  डॉ. कुरुष दलाल यांच्या पहिल्या व्याख्यानाच्या वेळेसच आपण योग्य मार्गावर असल्याची खात्री पटली होती.

 गावातील प्रत्यक्ष जमिनीवर सापडणाऱ्या गोष्टींच्या नोंदी आणि मौखिक परंपरेचाही पूर्ण शोध घेण्याचा निर्णय मी घेतला. ही कल्पना इन्स्टूसेन ट्रस्ट (इंडिया स्टडी सेंटर) कडे मांडली आणि त्यानंतर इन्स्टुसेन, पुण्यातील डेक्कन कॉलेज, विद्यापीठाचा बहिःशाल शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पेंडूरमध्ये संतीण ढंकिण या जैन मूर्तींच्या परिसरात एक्स्प्लोरेशन करण्याचा निर्णय घेतला. भारतीय पुरातत्त्व खात्याची (एएसआयची) परवानगीही मिळाली आणि २०११ च्या मार्च महिन्यात होळीच्या दिवसापासून या एक्स्प्लोरेशनला सुरुवात झाली. याच परिसरामध्ये काही खापरेही सापडली, पॉटरीमधील तज्ज्ञ डॉ. अभिजित दांडेकर यांनी १० व्या शतकातील ती खापरे असल्याचा अंदाज व्यक्त केला. त्याने हुरूप अधिक वाढला.

डेक्कन कॉलेजमधील संशोधकांची ही टीम परतल्यानंतर मी संपूर्ण गावात फिरून मौखिक परंपरांविषयीची सर्व माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्या भांडारातून बरेच काही हाती लागले. ते सारे या शोधप्रबंधाद्वारे मांडत आहे. प्रसंगी हे सारे तुरळक विखुरलेलेही वाटू शकते. पण हे सारे पेंडूर नावाच्याच एका मोठ्या शोध प्रकल्पाचा एक भाग आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे त्याचा परस्पर घनिष्ट संबंधही आहे.

विषयाला थेट हात घालण्यापूर्वी पेंडूरविषयीची काही महत्त्वपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया.

दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्याच्या नकाशात बरोबर मध्यवर्ती 18.96º अक्षांश आणि 72.82º  रेखांशावर हे गाव वसलेले आहे. प्रस्तुत ग्रामपंचायत खरारे-पेंडूर ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते.  यामध्ये पेंडूर, सोनारवाडी, खरारे, मोगरणे व पराड या पाच महत्त्वाच्या गावांचा समावेश होतो. गावाची लोकसंख्या  3543 असून त्यात महार, नवबौद्ध, चर्मकार, धनगर, भंडारी, वैश्यवाणी, गाभित, ब्राह्मण, मुस्लिम, मराठा या जातींचा समावेश होतो.

गावातील महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये वेताळ मंदिर (काळ्या पाषाणातील वेताळाची मूर्ती पंचक्रोशीचा कुलदेव  म्हणून प्रसिद्ध आहे) वेताळ मंदिरापासूनच काही अंतरावर सातेरी मंदिर असून पंचक्रोशीतील गावांमध्ये ती कुलदेवता मानली जाते. महत्त्वाचे म्हणजे कोकणात अनेक ठिकाणी सातेरीची मूर्ती नसते तर मोठ्या वारुळाचीच पूजा सातेरी म्हणून केली जाते. सृजनात्मक मातृदेवतेचे हे प्रतिकात्मक पूजन मानले जाते. यातील वेताळ मंदिराचा जीर्णोद्धार अलीकडेच काही वर्षांपूर्वी करण्यात आला आहे. ग्रामदेवतेचे हे मंदिर पूर्वाभिमुख आहे.  गावातील सर्व परंपरा आणि बैठका याच वेताळ मंदिरात होतात. इथूनच सर्व सणवारांची सुरुवातही होते.

याशिवाय महत्त्वाच्या असलेल्या मंदिरांमध्ये महापुरुष मंदिर (परबवाडा), डोंगरावरच्या मारुतीचे मंदिर, म्हाळसा मंदिर,  रवळनाथ मंदिर आणि संतीण ढंकीण (जैन मूर्ती- मंदिर) यांचा समावेश होतो.     

वेताळ गड 

             याशिवाय महत्त्वाचे म्हणजे गावात एक किल्लाही असून त्याचे नाव वेताळगड आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 75 मीटर्स उंचावर असलेल्या या किल्ल्याचे आकारमान सुमारे 22 एकर आहे. किल्ल्याच्या उत्तरेला पेंडूर तलाव, दक्षिणेकडे धामपूर तलाव,           पश्चिमेला मोगरणे, तर पूर्वेला पेंडूर परबवाडा असा त्याचा विस्तार आहे. किल्ल्यावर प्रचंड मोठा सडा आहे. अनेक किल्ल्यांवर असा मोठा सडा अभावाने आढळतो. या सड्यावर पावसाळी शेतीही केली जाते.

                    ऐतिहासिक संदर्भ

1862 रोजी इंग्रजांनी या किल्ल्याची केलेली नोंद आढळते. सावंतवाडी संस्थानच्या कागदपत्रांमध्येही किल्ल्याचा उल्लेख सापडतो. एकेकाळी कुडाळचा किल्ला आणि वेताळगड यांच्यावर गवताची गंजी पेटवून परस्परांना संकेत दिले जात होते,  त्याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आहे. हे कागदपत्र सध्या सावंतवाडी संस्थानाच्या ताब्यात आहेत.  सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशीला देवी शिवराजे सावंत भोसले यांनी अतिशय आनंदाने मदत केली आणि कागदपत्रे मला स्वतः दाखवली.  हा किल्ला त्यांच्याच महसुली ताब्यात होता. सध्या मात्र हा किल्ला पेंडूर ग्रामस्थांच्याही विस्मृतीत गेला आहे, असे अनेकांशी बोलल्यानंतर लक्षात आले. गावातील अनेकांना तो केवळ डोंगरच वाटतो. किल्ल्याचे बुरुज ढासळलेल्या अवस्थेत असून फक्त काही ठिकाणी त्याचे अवशेष आढळतात.

काही वर्षांपूर्वी डेक्कन कॉलेजचे प्रा. सचिन जोशी वेताळगडावर येऊन गेले होते. त्यांनी केलेल्या नोंदींमध्ये येथील कृत्रिम तळींचा उल्लेख आहे. तरीही आणखी काही हाती लागण्याची शक्यता लक्षात घेऊन चहूबाजूंनी मी वेताळगड पिंजून काढला त्यावेळेस लागलेला महत्वाचा शोध म्हणजे

           वेताळगडावरील वेताळाचे कातळशिल्प.  याची नोंद यापूर्वी कोणीही केलेली नाही. गावकऱ्यांनाही त्याची कल्पना नव्हती असे नंतर अनेकांशी चर्चा करताना लक्षात आले. मात्र आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीत वेताळाच्या कातळशिल्पाचा उल्लेख होता. म्हणूनच जिकिरीने त्याचा शोध घेतला… हे लंबकर्ण असलेल्या वेताळाच्या चेहऱ्याचे कातळशिल्प आढळले. या कातळशिल्पाच्या बाजूसच जांभ्यामध्ये वेताळाच्या पाऊलखुणाही कोरलेल्या आहेत. वेताळ हा गावाचे रक्षण करणारा क्षेत्रपाल असल्याचे पेंडूरचे गावकरीही मानतात. तो दरदिवशी रात्री त्याची क्षेत्रपालाची काठी आपटत गावाचे रक्षण करण्यासाठी फेरफटका मारतो, अशी गावकऱ्यांची धारणा आहे.

           याशिवाय धामापूरच्या बाजूस गडावर एक समाधीही सापडली. शिवलिंग आणि नंदी असे त्याचे स्वरूप आहे तर तिच्या समोरच्या बाजूस जांभ्यामध्ये मारुतीचे शिल्प आहे. मात्र ही कुणाची समाधी आहे, याचा शोध घेऊनही फारशी माहिती हाती लागली नाही.

`संतीण ढंकीण’

         गावातील दुसरे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे संतीण ढंकीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जैन मूर्ती. डेक्कन कॉलेज, इन्स्टूसेन आणि विद्यापीठाने केलेल्या एक्स्प्लोरेशनमध्ये लक्षात आले की, इथे सभामंडपाचे जोते, तळखडे, गाभाऱ्यात तीन मूर्ती, पद्मासनातील भगवान महावीर, दोन्ही बाजूला चवरीधर, बाहेर अंबिका, जांभाल व आणखी एक महावीर मूर्ती , शिवाय एक महिषासूर मर्दिनी मूर्ती,  गजलक्ष्मी मूर्ती आणि वाघचाळा मूर्ती इथे आहेत. जुन्या जैन मंदिराचे उलथलेले खांबही भग्नावस्थेत पाहायला मिळतात. ते सापडतात त्याची ठिकाणे, पायऱ्यांचे अवशेष यावरून हे मोठ्या आकारातील मंदिर असावे, याची खात्री पटते. संपूर्ण कोकणात एवढे मोठे जैन मंदिराचे अवशेष इतरत्र कुठेही सापडलेले नाहीत. हे मंदिर 10- 11 व्या शतकातील असावे, असे या शोधमोहिमेत (एक्स्प्लोरेशन) लक्षात आले.

वाघचाळा

       

                याच संतीण ढंकिणीच्या परिसरामध्ये वाघ किंवा सिंहावर बसलेली एक व्यक्ती जिने दागिने परिधान केले आहेत, अशी एक शिल्पकृती आहे. गावकरी या शिल्पकृतीला वाघचाळा म्हणतात. त्या संदर्भात माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस असे लक्षात आले की, वर्षातून एकदा वाघचाळ्याची विशिष्ट पूजा केली जाते. गावातील एका ज्येष्ठ आजोबांशी बोलताना त्या मागची कथाही कळली. पेंडूर गावात एकदा एक गाभित आला होता. तो गाणगापूरहून त्याच्या मुलांसह इथे आला होता. रात्रीच्या वेळेस आपली कला सादर करण्याची विनंती त्याने गावकऱ्यांना केली. त्यावर गावकरी म्हणाले की, आम्ही तुला त्याच्या मोबदल्यात काहीच देऊ शकत नाही. कारण सध्या गावाच्या मागे एक पीडा लागली आहे. संध्याकाळच्या वेळेस पक्ष्यांचे थवे येऊन धान्य खाऊन जातात. आम्हालाच काही राहात नाही, तुला काय देणार. त्यावर तो गाभित म्हणाला की, मला एक विद्या येते त्याबळावर मी पक्ष्यांना पळवून लावू शकतो. गावकऱ्यांनी होकार दिल्यावर तिथलीच माती उचलून त्याने मंत्राचा हुंकार भरला आणि त्यानंतर त्या दिवशी पक्षी आले नाहीत. मग रात्री त्याला सादरीकरण करण्याची परवानगी मिळाली. मध्यरात्रीच्या वेळेस मध्यंतर झाले तेव्हा गावातील एका टोळक्याने विचार केला की, हा उद्या गावात राहणार, गावातली मंडळी सकाळी शेतावर जाणार तेव्हा याने चोरी केली आणि पळून गेला तर. त्यामुळे पहाटेच्या वेळेस त्याला मारायचे. या टोळक्याने पहाटे त्याचे सादरीकरण संपत आलेले असतानाच त्याच्यावर हल्ला केला तेव्हा तो वाघाच्या रूपात होता. हा हल्ला झाला त्यावेळेस सादरीकरण पेंडूरच्या एका टोकाला म्हणजेच सरंबळच्या बाजूस सुरू होते. हल्ला झाल्याचे लक्षात येताच तो मुलांसह तिथून धावत निघाला आणि पळत पळत वेतोबाच्या देवळात आला. त्याच्या पायावर त्याने मुलांना ठेवले आणि त्यांचे रक्षण करण्याची विनंती केली. वेतोबाने मुलांचे रक्षण करण्याचे वचन दिले आणि मग त्या गुराभीने तिथेच प्राण सोडले. त्या पापाचे परिमार्जन करण्यासाठी वाघचाळ्याची प्रथा पाळली जाते वर्षातून एकदा. या प्रथेमध्ये अंगारन्हाण केले जाते. म्हणजे पेटते निखारे अंगावर घेऊन स्नान करणे. अलीकडे त्याऐवजी पेटत्या निखाऱ्यावरून चालणे अशी ही प्रथा झाली आहे.

हे सारे ऐकल्यानंतर पहिला प्रश्न पडला, तो म्हणजे वेताबाने अभयवचन दिलेली ती मुले पेंडूरमध्येच आहेत की, अन्य कुठे ?  त्यानुसार, त्यांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, तो सारा व्यर्थ गेला. मग गावात गाभित नाहीत पण गुराभी आहेत, असे कळले. मग त्यांचे घर गाठले तेव्हा कळले की, ते त्याच गुराभीचे वंशज आहेत. पण गुराभी नव्हे तर भोरपी आहेत. त्यावर शिक्कामोर्तबही मजेशीर पद्धतीने झाले. मी कथा सांगितल्यावर भोरपी आजोबा म्हणाले “ते आम्हीच’’ मी त्यांना विचारले की, कथेमध्ये गाणगापूरहून आल्याचा आणि त्यावेळेस त्यांच्याकडील झोळीत काही वस्तू होत्या, असा उल्लेख आहे. ते सारे नंतर गेले कुठे. त्यावर भोरीप आजोबा म्हणाले, ते आम्ही आमच्या घरामागील मंदिरात ठेवले आहे. हे मंदिर आमच्या पूर्वजांच्या वस्तूंचे जतन करण्यासाठी बांधले असून ते खासगी मंदिर आहे. ते मला त्या मंदिरात घेऊन गेले. तिथे असलेल्या वस्तूंमध्ये शंख, गाणगापूरचे टांक यांचा समावेश होता. त्यातील काही गोष्टींची रूपनिश्चिती (आयडेंटिफिकेशन) होणे बाकी आहे. एका धाग्यापर्यंत पोहोचण्यात महत्त्वाचे यश आल्याने दुसऱ्या दिवशी उत्साह दुणावलेला होता. या भोरीपांसंदर्भात मुंबईत परतल्यानंतर अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस अनेक नवीन गोष्टी लक्षात आल्या. प्रमाण मराठी भाषेतील बहुरूपी या शब्दाचा मालवणीतील अपभ्रंश बहुरूपी > बोरपी > भोरपी असा झाला आहे. मालवणी भाषा ज्या पद्धतीने चालते त्यात हा अपभ्रंश नेमका बसतो. कोकणातील दशावताराची भोरीप ही प्राथमिक अवस्था आहे, असे लोकपरंपरा चळवळीतील संशोधक मानतात.

हेच भोरीप नंतर पेंडूरच्याच परबांसोबत प्रवास करत त्यांच्याबरोबर थेट कराचीपर्यंत जाऊन आले. माझे आजोबा, आजी, काका, आई आणि वडील या साऱ्यांचा जन्म कराचीचाच आहे. आमच्या कुटुंबासोबतच हे भोरीप कराचीला बराच काळ वास्तव्यास होते. तिथे असलेल्या शिवाजी चौकात मोठा परबवाडा होता. आणि तिथेच गावातील अनेक जण वास्तव्यास होते. तेव्हा कराची- मालवण अशी थेट आणि व्हाया मुंबई अशी दुसरी बोटसेवाही होती. एवढी कोकणी माणसे तेव्हा कराचीत वास्तव्यास होती. याचे संदर्भ आजोबा- आजींच्या बोलण्यात अनेकदा आले होते. शिवाय आजीला तर कराची- मालवण बोट प्रवासातील पारंपरिक गीतेही येत होती…

आपधारणा टेकडी

भोरिपांनंतर मोहरा वळला तो आबदारनाथ टेकडीकडे. टेकडीच्या नावावरून सकृतदर्शनी याचा संबंध नाथसंप्रदायाशी असावा असा समज झाला. त्यामुळे आबदारनाथ कोण याचा शोध घेण्याचा त्या अंगाने प्रयत्न केला, तो फोल ठरला. मात्र या सर्व शोधप्रवासात या टेकडीचा वेगळाच इतिहास सामोरा आला. तो अधिक रोचक होता. टेकडीच्या सर्व बाजूंनी निरिक्षणासाठी मारलेल्या फेऱ्यामध्ये असे लक्षात आले की, तिच्या भोवताली पाण्याचे नैसर्गिक साठे आहेत. मग शब्दाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला त्याचवेळेस पुन्हा एक आजोबा मदतीला आले आणि त्याचा उलगडा झाला. आबदारनाथ नव्हे तर आपधारणा टेकडी असे तिचे नाव आहे. आप म्हणजे पाणी धारणा म्हणजे पकडून ठेवणे… पाणी पकडून ठेवणारी टेकडी म्हणून आपधारणा.

साहजिकच पुढचा प्रश्न होता पाणी पकडून ठेवण्याचा हा गुणधर्म आला कुठून. पुन्हा एकदा आमच्या बहिःशाल शिक्षण विभागातील भूगर्भशास्त्रातील तज्ज्ञ प्रा. डॉ. विळदकर आणि डॉ. आवासिया यांची मोलाची मदत झाली. त्यांनी सांगितले की, भूभ्रंश रेखा पेंडूरवरून जाते. या भूभ्रंश रेखेमध्ये पाणी पकडून ठेवण्याची क्षमता अनेकदा असते. एक कोडे सुटले…

 खरे तर आपधारणा टेकडीवर जाण्याचा संबंध आला होता तो पेंडूरचा अश्मयुगाशी असलेला संबंध शोधण्यासाठी. आजी- आजोबा ज्या दगडी खेळण्यांनी खेळले ती कदाचित अश्मयुगातील असावीत, असा संशय पुरातत्त्वविज्ञानाचा अभ्यासक्रम करत असताना आला होता. म्हणून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस खेळणी काही हाती लागली नाहीत पण अश्मयुगातील एक महत्त्वाची बाब मात्र निश्चितच हाती लागली ते होते अश्मयुगातील स्मारक अर्थात मेगालिथिक डोल्मन. अशा प्रकारची अश्मस्मारके अनेकदा चित्रांत- छायाचित्रांत पाहिली होती. महाराष्ट्रात अशी स्मारके केवळ विदर्भात असल्याचे ज्ञात होते. पण आता मला कोकणात असे अश्मस्मारक सापडले होते. हे महापाषाण युगातील स्मारक आहे.  महाराष्ट्रामध्ये इसवीसन पूर्व १००० या कालखंडात ही अश्मस्मारके अस्तित्त्वात आली, असे संशोधक मानतात. अश्मस्मारकांच्य संदर्भात संशोधकांचा ठोकताला असे सांगतो की, अनेकदा ती पाण्याच्या मोठ्या साठ्याजवळ असलेल्या टेकडीवर वसलेली असतात. पेंडूरमधील हे सुमारे तीन हजार वर्षे प्राचीन असलेले अश्मस्मारक आपधारणा टेकडीवर असून त्याच्या बरोबर समोरच्या बाजूस पेंडूर तलाव आहे. .. म्हणजेच अश्मस्मारकासाठीची नेमकी ऐतिहासिक आदर्श स्थितीच जणू.  पुन्हा एकदा शब्द आठवले… “शोधायचे नेमके काय हे माणसाला एकदा कळावे लागते. ते कळले की, मग सारे नेमके सापडत जाते!’’ या सापडलेल्या पुराश्मस्मारकावर अधिक संशोधन होणे अतिशय गरजेचे आहे. कदाचित त्यामुळे पुराश्मेतिहासावर नवा प्रकाश पडेल, अशी शक्यता वाटते.

मध्ययुगीन पेंडूर

              महापाषाण युगातील पेंडूरच्या अस्तित्वानंतरचा महत्त्वाचा दुवा सापडतो तो थेट मध्ययुगातील. मध्ययुगातील अनेक गोष्टी गावात आजही विखुरलेल्या अवस्थेत सापडतात. शेतामध्ये काम सुरू असताना अनेक ठिकाणी आजही चेहऱ्याचा भाग उभा काप दिलेल्या अवस्थेतील अनेक शिल्पकृती सापडतात. त्यांचे कोडे अद्याप उलगडलेले नाही.

पेंडूरच्या राजाचा विरगळ

             मध्ययुगीन सर्वात महत्त्वाच्या पुराव्यामध्ये पेंडूरमधील राजाचा विरगळ हा सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे. सुमारे पाच फूट उंचीचा हा वीरगळ राजाचाच असल्याचे त्याचे परीक्षण केल्यानंतर लक्षात येते.  त्याच्या रचनेवरूनच यावर शिक्कामोर्तब होते. शिवाय त्याच्या शेजारी असलेले उर्वरित दोन वीरगळ हेही त्या राजाच्या सेवेत असलेल्या मोठ्या सेवाधिकाऱयांचे म्हणजेच सेनापती आदी तत्सम यांचे असावेत, असे निरीक्षणांती समजते.

  पेंडूरचा मध्ययुग ते 21 वे शतक हा प्रवास गावऱ्हाटीच्या मार्गाने जातो. गावऱ्हाटी ही मध्ययुगीन परंपरा असावी, असा समाजशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. गावाचे पारंपरिक काम आजही गावऱ्हाटीनुसारच चालते.

या ऱ्हाटीला पाच-बाराची ऱ्हाटी किंवा संप्रदाय म्हटले जाते. यात गावाचे पाच मानकरी आणि 12 इर्तिक गावाचे काम करणारे यांचा समावेश होतो. हे सारे जण एकत्र येऊन गावगाडा हाकतात. म्हणजेच गावातील परंपरांचे वहन करतात.

पेंडूर गावऱ्हाटीतील मानकऱ्यांमध्ये म्हस्णे परब, रायकर परब (गावकर) यांचा प्रमुख मानकऱ्यांमध्ये समावेश आहे. याशिवाय खराऱ्याचे सावंत, पटेल आणि ब्राह्मण यांचा समावेश होतो.

गावऱ्हाटीत 12 चाकर किंवा इर्तिक असून त्यात राऊळ, घाडी, सुतार, वारिक, देवळी वरचा, खालचा देवळी, मोरजकर, टेमकर, महार खरारे, महार चरिकार, पाटेकर देवळी, कुंभार यांचा समावेश होतो.

गावऱ्हाटीचा शोध घेतला असता असे लक्षात आले की, परब हे पेंडूरच्या गावऱ्हाटीचे सत्ताशासक आहेत. गावऱ्हाटीची तीन प्रमुख कामे ज्याला महागण म्हणतात, ती जंगम, राऊळ आणि परब यांच्यामध्ये विभागली गेली,  असे मौखिक परंपरा सांगते. यातील लिंगदेवाची व्यवस्था जंगम,  सातेरीची राऊळ तर सत्ताशासक म्हणून समाजावर अंकुश ठेवण्याचे काम परबांकडे आले.

      आजवरच्या संशोधनामध्ये वारंवार लक्षात असे आले आहे की, गावाच्या सत्ताशासकाचे अस्तित्व हे गावाच्या मुख्य देवळाच्या परिसरात असते. या गावाचे मुख्य देऊळ वेतोबाचे किंवा वेताळाचे असून त्याच्या समोरच्या बाजूस दोन समाधी आहेत. त्यातील एक म्हस्णे वंशाच्या परबांच्या मूळ पुरुषाची आहे.

 म्हस्णे परबांचा जन्म स्मशानातून…

परबांच्या एका पूर्वजांचा मृत्यू लग्नाच्या वेळेसच झाला. त्यानंतर स्मशानात नेले असता अग्नी देण्यापूर्वीच तो रचलेल्या चितेवरून उठून उभा राहिला. म्हणून त्याच्या वंशजांना म्हस्णे परब म्हणतात. मसण म्हणजे स्मशान. मालवणीत त्याला म्हसण म्हणतात. म्हणून म्हस्णे परब. याच म्हस्णे परबांच्या पूर्वजांची समाधी वेताळ मंदिरासमोर आहे. म्हस्णे परबांच्या घरातील लग्नाच्या वेळेस या समाधीच्या ठिकाणाहून मुदत घेऊन माती नेण्याची परंपरा आजही आहे.

             म्हस्णे परबांचा अधिकार देवमान्य

थेट वेताळानेच म्हस्णे परबांना गावप्रमुख म्हणून मान दिल्याची एक दंतकथा परिसरात प्रचलित आहे. इतर चार मानकऱ्यांनी म्हस्णे परबांना वेगळे काढले तेव्हा देव वेताळाने त्यांच्या स्वप्नात जाऊन आपल्या जन्मालाही म्हस्णे परब कारणीभूत असल्याची कथा सांगितली… म्हस्णे परब हे आपले पिता आहेत, असे वेताळ या दंतकथेत सांगतो. म्हस्णे परबांचा अधिकार प्रस्थापित करण्यासाठी ही कथा आली असावी.

            म्हस्णे परब – गावकर संबंध

गावच्या दोन प्रमुख मानकऱ्यांमध्ये सौहार्दाचे संबंध राहावेत,  यासाठी अनेक गावांमध्ये त्यांच्या सौहार्दाच्या दंतकथा ऐकायला मिळतात. अनेकदा त्या लग्नसंबंधांतून निर्माण झालेल्या नातेसंबंधांच्या कथा असतात, असे आजवरच्या लोकपरंपरेच्या संशोधनामध्ये समाजशास्त्रज्ञांना लक्षात आले आहे. त्याचाच एक प्रत्यय आपल्याला पेंडूरमध्येही घेता येतो. इथे पुनाशी मातेची कथा प्रचलित आहे. त्याचप्रमाणे रायकर परब (गावकर) यांच्या दत्तकविधानाची कथा अशाच प्रकारे आली असावी, असे म्हणण्यास वाव आहे. 

              निष्कर्ष

पेंडूरमध्ये गेली पाच वर्षे केलेल्या संशोधनानंतर असे लक्षात आले की, इथे केवळ मौखिक परंपरांसोबतच पुरातत्त्वीय बाबींचाही खजिना दडलेला आहे. त्यावर मोठ्या प्रमाणावर सर्व अंगांनी संशोधन होणे गरजेचे आहे. उर्वरित महाराष्ट्रापेक्षा अधिक काही आदीम स्वरूपाच्या प्रथा परंपरा आजही कोकणात नांदताना दिसतात. गावऱ्हाठी हा त्यातीलच एक महत्त्वाचा प्रकार आहे. कोकणाचे वर्तन त्यातही खास करून दक्षिण कोकणाचे वर्तन हे काहीसे आदीम परंपरेशी नाते सांगणारे अद्याप का आहे, हे संशोधकांना पडलेले कोडे उकलायचे असेल तर या पुरातत्त्वीय बाबींबरोबरच इथल्या मौखिक परंपरा समजून घेणेही खूप महत्त्वाचे आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना कोकणात घातले जाणारे गाऱ्हाणेही आपल्याला म्हणूनच खूप काही सांगून जाते. त्यात जैन देवाचाही उल्लेख येतो. इथे सारे काही एकमेकांत सामावलेले (एसिमिलेशन) दिसते.

 मालवणपासून खालती कारवारपर्यंतच्या पट्ट्याला अब्राह्मणांची किंवा पातित्यग्रामभूमी म्हटले जाते. तसा उल्लेख सह्याद्रीखंडामध्ये येतो. परशूरामभूमीचा उल्लेख रत्नागिरीपर्यंत येतो. मात्र सह्याद्रीखंडासारख्या ब्राह्मण परंपरेच्या ग्रंथामध्ये रत्नागिरी ते मालवण या भूमीचा कोणताही उल्लेख सापडत नाही. मात्र या परिसरामध्ये पुरातत्वीय बाबीही सापडतात आणि वेगळी मौखिक परंपराही काही शतके कायम आहे. याचाच वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला तर असे लक्षात येते की, पेंडूर परिसरातील मोठे जैन देवालय तेथील जैनांचे अस्तित्व सिद्ध करते. या परिसरामध्ये त्या काळी जैनांचेच अधिक प्राबल्य असावे आणि म्हणून ब्राह्मण परंपरा असलेल्या ग्रंथांमध्ये या भूमीचा उल्लेख टाळला जातो. ही माहिती आणि परंपरेतील खाचाखोचा जुळणाऱ्या आहेत. यावरही संशोधन होणे गरजेचे आहे, असे माझ्या अभ्यासादरम्यान लक्षात आले.

या संपूर्ण शोधयात्रेनंतर एक प्रश्न सातत्याने छळत होता तो म्हणजे राजाचा वीरगळ, मोठे जैन देवालय आदी सारे; महाराष्ट्राच्या नकाशावर कोणतेही महत्त्वाचे ठिकाण नसलेल्या पेंडूरलाच का सापडावे. पुरातत्त्वीय बाबींचे निकष लावायचे तर असा अर्थ निघू शकतो की,  महापाषाणयुगापासून वेळोवेळी पेंडूर हे महत्त्वाच्या घडामोडींचे ठिकाण राहिले असावे. विद्यमान नकाशांचा आधार घेता असे लक्षात आले की, सध्या महत्त्वाचे असलेले मालवण बंदर एका बाजूला आहे. आणि दुसरीकडे कणकवली- कुडाळवरून जाणारा गोवा महामार्ग आहे. पेंडूर या दोन्हींच्या मध्यावर आहे. पुरातत्त्वीय संशोधनांचा आधार घेता असे लक्षात येते की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोष्टी सापडत असतील तर हे ठिकाण पूर्वीच्या काळी अतिमहत्त्वाचे ठिकाण असणार आणि कालौघात त्याचे महत्त्व कमी होत गेले. याचाच निष्कर्ष पूर्वी पेंडूरवरून जाणारा महत्त्वाचा मार्ग आता अस्तंगत झाला असावा.

पुरात्त्वीय बाबींच्या आजवरच्या अभ्यासात असे लक्षात आले आहे की, तत्कालीन अर्थशास्त्राने आणि व्यापारी मार्गांनी पुरातन शहरांच्या वसण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे.  महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी बाब अशी की,  पेंडूरच्या एका बाजूने कर्ली खाडी वाहते. अरबी समुद्रात देवबागपासून सुरू होणारी ही खाडी आतमध्ये पेंडूरपर्यंत येते. इथपर्यंतचा मार्ग आजही व्यवस्थित वापरला जाऊ शकतो असा जलमार्ग आहे. अगदी २० वर्षांपूर्वीपर्यंत येथील नेरूरपारपर्यंत व्यापारी मालाची ने- आण होत असे. हे लक्षात आल्यानंतर अस्तंगत व्यापारी मार्गाचेही कोडे सुटले. देवबागला समुद्र आतमध्ये येतो तिथे नैसर्गिकरित्या ब्रेकवॉटरसारखी रचना तयार झाली आहे. चांगल्या बंदरांमध्ये मोठी व्यापारी जहाजे उभी करण्यासाठी ब्रेकवॉटर गरजेचे असते. कारण ते लाटा अडवून जहाजे स्थिर ठेवण्याचे काम करते. असे ब्रेकवॉटर नैसर्गिकरित्या देवबागला अस्तित्वात होते. पूर्वी इथेच या ब्रेकवॉटरचा आधार घेऊन माल उतरवला जात होता आणि मग तो लहान बोटींच्या माध्यमातून पेंडूरच्या एका टोकाला असलेल्या खरारे पर्यंत आणला जात असे..  खरारेहून निघणारा एक मार्ग आजही पेंडूरला जैन मंदिराच्या अलीकडे मुख्य मार्गाला येऊन मिळतो. व्यापार करणारे अनेक जण त्या काळीही जैनच होते. म्हणून देशभरात अनेक ठिकाणी व्यापारी मार्गांवर जशी जैन मंदिरे पाहायला मिळतात, तसेच मोठे जैन मंदिर पेंडूरमध्ये त्या काळी (११ वे शतक) उभे राहिले, असे म्हणण्यास पुरेसा वाव व पुरावाही आहे. आता या अस्तंगत मार्गावरील व्यापारी आणि समाजाच्या एकसंधतेच्या उर्वरित पाऊलखुणांचा शोधही तेवढ्याच झपाट्याने घेण्याचा विचार आहे. काही शतकांपूर्वी कर्ली खाडीने तिचा प्रवाह पेंडूर आधी बदलल्याचे भूशास्त्रीय पुरावेही आता हाती आले आहेत. एकूणच त्यामुळे आता पेंडूरच्या या प्रगत संशोधनाला अधिक वेग येईल, अशी चिन्हे आहेत. पेंडूरचे कोडे सुटले तर दक्षिण कोकणच्या इतिहासाला एक वेगळी कलाटणी मिळणे अपेक्षित आहे.   

              (प्रस्तुत लेखक गेली ३५ वर्षे पत्रकार म्हणून कार्यरत असून सध्या लोकसत्ता डॉटकॉमचे कार्यकारी संपादक म्हणून काम पाहतात. लेखक भूशास्त्र अभ्यासक आणि पुरातत्वतज्ज्ञही आहेत. पेंडूरविषयीचे प्रस्तूत संशोधन या पूर्वी मुंबई विद्यापीठाने २०१३ साली प्रकाशित केले असून या नंतर पेंडूर संशोधन प्रकल्प-२  आणि पेंडूर संशोधन प्रकल्प- ३ ही पूर्ण झाला असून सध्या पेंडूर संशोधन प्रकल्प- ४ चे काम सुरू आहे. पेंडूरचा शोधनिबंध म्यानमार मध्ये पार पडलेल्या आग्नेय आशिया आंतरराष्ट्रीय परिषदेमध्येही २०१५ तर श्रीलंकेमध्ये २०१७ साली पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये वाचण्यात आला आहे.   )

—————————————

श्रेयनामावली

आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (एएसआय)

इंडिया स्टडी सेंटर (इन्स्टुसेन ट्रस्ट), मुंबई

बहिःशाल शिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ

डेक्कन कॉलेज, पुणे

विठ्ठल भिवा परब (आजोबा) व रुक्मिणी विठ्ठल परब (आजी)

मुग्धा कर्णिक व धनंजय कर्णिक

डॉ. कुरुष दलाल, डॉ.सूरज पंडित, डॉ. अभिजित दांडेकर

श्याम धुरी

सत्यवान विठ्ठल परब

जी. टी. परब

परब मास्तर

पेंडूर ग्रामपंचायत

आणि मदत करणारे सर्व पेंडूर ग्रामस्थ