निसर्ग संपन्न पालघर पर्यटन

Hotel / Resort / Homestay

An accommodation unit providing at accommodation and may also provide food and beverage facilities and other ancillary services.

History

इंग्रज साम्राज्याशी लढा देण्यासाठी पालघर तालुक्यात १४ ऑगस्ट १९४२ रोजी उठाव झाला होता. या उठावामध्ये पालघर तालुक्यातील पाचजण शहीद झाले

Wildlife

Tungareshwar wildlife sanctuary also known as Tungareshwar National Park is located on a plateau east of Vasai and Virar in Palghar district, north of Mumbai in the Indian state Maharashtra.

अनवट वाटांनी युक्त पालघर जिल्हा

               आजच्या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता सर्वांनाच आवश्यक झाले आहेत. मुक्त आणि शहरी गोंगाटापासून लांब स्वच्छंदपणे दोन दिवस निसर्गाच्या विविध रुपांचा आस्वाद घेत भटकण्याची अनामिक ओढ आणि धकाधकीच्या रोजच्या आयुष्यामधे निवांत वेळ काढुन दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. साधारण दिवाळी संपली की सर्वाना भटकंतीचे वेध लागतात. पर्यटनाच्या दृष्टीने हा ऋतू सर्वोत्तम असतो. गुलाबी थंडी, आल्हाददायक वातावरण, धुक्याची दुलई यामुळे या दिवसांत फिरण्याची मजा काही औरच! उन्हाचा त्रासही जाणवत नाही आणि दमछाकही होत नाही. अशा वेळी जवळच्या पण गर्दी नसलेल्या ठिकाणांचा शोध सुरू असतो. ठिकाणाची निवड अचूक असेल तर भटकंतीचा आनंद द्विगुणित होतो. सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल , किर्र घनदाट जंगल , प्रखर उन्हालाही जंगलात दबकत… दबकत उतरावे लागावे अशी झाडी , घनदाट झाडीमधुन येणारे पक्षी आणि प्राण्यांचे चित्र विचित्र आवाज . मुक्त आणि शहरी गोंगाटापासून लांब स्वच्छंदपणे दोन दिवस निसर्गाच्या विविध रुपांचा आस्वाद घेत भटकण्याची अनामिक ओढ सर्वसामान्य पर्यटकाला शहरापासून बाहेर परंतु शक्यतो जवळ असणार्‍या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी प्रेरित करते. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेकविध आश्चर्यांनी नटलेली अनेक ठिकाणे आपल्याला नेहमीच खुणावत असतात.

 

कोकण : सिंधुदुर्ग,   रत्नागिरी,   रायगड,   पालघर,   ठाणे,   मुंबई,   मुंबई-उपनगर 

Shree Ganesh

Dam

Palghar Dam

Let Our Experience Be Your Guide

               १ ऑगस्ट २०१४ रोजी सागरी-डोंगरी आणि नागरी अंग असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन, एकुण सात जिल्ह्यांचा समावेश असणार्‍या कोकण प्रांतामधिल कोकण सखल प्रदेशाचा उत्तर भाग असणारा वेगळा झालेला पालघर हा महाराष्ट्र राज्यातला ३६वा जिल्हा . आपल्या देशात सुमारे ११२ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला पालघर हा जिल्हा आहे. पालघर जिल्हा ठाणे जिल्हयापासुन 52 कि.मी. आणि मुंबईपासुन 74 कि.मी. अंतरावर आहे. पूर्वेकडे असणार्‍या सहयाद्री पर्वताच्या रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राची किनारपट्टी या दरम्यान हा जिल्हा पसरला आहे. जव्हार, डहाणू, तलासरी, पालघर, मोखाडा, वसई, वाडा, आणि विक्रमगड या तालुक्यांचा समावेश असणार्‍या पालघर जिल्हयाच्या पुर्वेला सहयाद्री पर्वताच्या रांगा आणि पश्चिमेला अथांग असा समुद्र त्याचप्रमाणे जंगल, डोंगर कपारींनी हा जिल्हा समृध्द आहे. जिल्हयातील घोलवड – डहाणु येथील चिक्कु , वसईची केळी आणि फुलांच्या बागा सर्वत्र प्रसिध्द आहेत. धोडिया, कोळी महादेव, दुबळा, कोळी मल्हार, कोकणा, कातकरी आणि वारली समाज या आदिवासी समाजाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असणारा जिल्हा अशी ओळख जिल्ह्याला लाभलेली असून डहाणु हा तालुका वारली आदिवासींच्या तारपा नृत्य आणि त्यांच्या वारली चित्रकलेमुळे जगभर प्रसिध्द आहे. जिल्ह्य़ातील लक्षणीय फलोत्पादन , जिल्ह्याच्या पुर्वेकडे निसर्गसंपत्तीने नटलेल्या सह्याद्रीच्या असणार्‍या डोंगररांगा , शहापूर, वाडा आणि पालघर तालुक्यातून वाहणारी वैतरणा नदी आणि उत्तरेकडील डोंगराळ वैतरणा खोरे , जव्हार पॅलेसच्या शाही आकर्षणापासून ते अर्नाळा किल्ला, वसईचा किल्ला आणि गंभीरगड, तारापूर, कलादुर्ग आणि केळवा यांसारख्या वैचित्र्यपूर्ण किल्ल्यांच्या समूहापर्यंत नैसर्गिक चमत्कारांनी युक्त असणारी जिवदानी -वज्रेश्वरी – गणेशपुरी सारखी धार्मिक ठिकाणे , संस्कृतीचा वारसा जपणारी असंख्य ठिकाणे , जागतिक स्तरावर ठसा उमटवलेली वारली चित्रकला आणि निर्मनुष्य गेटवे तसेच अगदी गुजरात राज्याच्या सिमेला भिडणारा बोर्डी – झाई ते अर्नाळा आणि पुढे कोकण प्रांतातिल इतर जिल्ह्य़ांच्या सीमा लांघुन थेट गोवा राज्याच्या सिमेला भिडणारा मालवण-सिंधुदुर्ग पर्यंत पसरलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा यांचे आकर्षक मिश्रण लाभलेल्या आपल्या या जिल्ह्य़ात पर्यटन विकासाला भरपूर वाव आहे.

Space For You. Call us :  91-9860508308

पालघर जिल्हा

      पालघर हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचे मुख्य शहर आहे. ते ठाणे शहरापासून ५२.३ किमी व महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून ७४ किमी अंतरावर आहे,तसेच मुबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोर शहरापासून २० कि.मी अंतरावर आहे.

          सागरी-डोंगरी आणि नागरी अंग असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन, त्यामधून वेगळा झालेला पालघर हा महाराष्ट्र राज्यातला ३६वा जिल्हा १ आॅगस्ट २०१४ रोजी अस्तित्वात आला..कोकणच्या उत्तर भागास असलेला पालघर जिल्हा पूर्वेकडे असणाऱ्या सहयाद्री पर्वताच्या रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राची किनारपट्टी या दरम्यान पसरला आहे. 

पालघर

Palghar

पेशवे काळामध्ये चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांच्या साम्राज्यास सुरूंग लावत पावणेतीनशे वर्षापूर्वी मराठी झेंडा रोवला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ‘सन १९४२ च्या चले जाओ’ आंदोलनामध्ये पालघर हे महत्त्वाचे केंद्र होते. इंग्रज साम्राज्याशी लढा देण्यासाठी पालघर तालुक्यात १४ ऑगस्ट १९४२ रोजी उठाव झाला होता. या उठावामध्ये पालघर तालुक्यातील पाचजण शहीद झाले. सातपाटीचे काशिनाथ हरी पागधरे, नांदगावचे गोविंद गणेश ठाकूर, पालघरचे रामचंद्र भीमाशंकर तिवारी, मुरबे येथील रामचंद्र महादेव चुरी, सालवडचे सुकुर गोविंद मोरे हे पाचजण स्वातंत्र्यासाठी इंग्रजाशी लढा देताना शहीद झाले. या शहिदांची स्मृती म्हणून पालघर शहरामध्ये हुतात्मा चौक उभारलेला आहे

डहाणू

या गावाला सुंदर व शांत असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. येथून जवळच डहाणूचा किल्ला आहे. डहाणूवरूनच आपण नरपडचा समुद्रकिनारा तसेच येथून २७ कि.मी. अंतरावर असलेल्या उंच डोंगरावरील श्री महालक्ष्मीचे जागृत स्थानही पाहू शकतो. तसेच डहाणू आगर येथील केवडावंतीचे मंदिर व हनुमान मंदिर ही मंदिरे प्रसिद्ध आहेत.

मूळ डहाणू परिसर हा आदिवासी वस्ती असलेला परिसर असल्यामुळे इथल्या परिसरात आदिवासी पारंपरिक सण आणि उत्सव तसेच जग प्रसिद्ध वारली चित्रकला पाहावयास मिळते.

वसई

वसईचा इतिहास प्राचीन पुराणकाळापासून आहे. वसई हे अनेक ग्रीक, अरब, पर्शियन आणि रोमन व्यापारी आणि व्यापाऱ्यांचे व्यापाराचे ठिकाण होते जे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून प्रवेश करतील. ग्रीक व्यापारी Cosma Indicopleustes याने 6व्या शतकात वसईच्या आजूबाजूच्या भागांना भेटी दिल्या आणि नंतर जून किंवा जुलै 640 मध्ये चिनी प्रवासी झुआनझांग याने भेट दिली. इतिहासकार जोसे गेर्सन दा कुन्हा यांच्या मते, या काळात, बस्सीन आणि त्याच्या आसपासच्या भागात कर्नाटकातील चालुक्य राजघराण्याने राज्य केले. 11 व्या शतकापर्यंत, अनेक अरबी भूगोलशास्त्रज्ञांनी वसई जवळील ठाणे आणि सोपारा सारख्या शहरांचा उल्लेख केला होता, परंतु वसईचा कोणताही संदर्भ दिलेला नव्हता. 

तलासरी

WARLI ARTS1280

भौगोलिक क्षेत्रफळ 26711 हेक्टर असणारा तलासरी तालुका हा केंद्र शासीत प्रदेश दादरा नगर हवेली व गुजरात राज्य यांच्या सिमा भागावर वसलेला पालघर जिल्ह्यामधिल एक तालुका असुन बहुतांशी आदिवासी वस्ती असलेल्या ह्या तालुक्यातील वारली आदिवासी संस्कॄती आणि वारली चित्रकलेमुळे प्रसिद्ध आहे. गेरूने सारवलेल्या भिंतींवर तांदळाच्या पांढऱ्या पिठाने साधे व सुबक आकार रंगवण्याची पद्धत हे या चित्रशैलीचे वैशिष्ट्य समजले जाते.वारली समाजातील महिला शेतीचे हंगाम, सण उत्सव अशा प्रसंगी भिंतीवर वारली चित्रे काढतात. त्रिकोण,गोल आणि आयत या भौमितिक आकृृतींचा प्रामुख्याने वापर वारली चित्रकलेत केलेला पहायला मिळतो. तारपा हे पारंपरिक वाद्य वाजविणारा पुरूष मध्यभागी उभा असून त्याच्याभोवती गोलाकार रचनेत नृत्य करणारे स्री पुरूष अशी चित्रे वारली पद्धतीत विशेष करून आढळतात. याखेरीज वारली जनजातीच्या देवदेवता,शेती, घर,धान्याचे कोठार,पशु,पक्षी, विविध कामे करणारे स्री पुरूष,बैलगाडी अशी वारली जीवनाशी संबंधित चित्रे यामधे पहायला मिळतात. वारली जमातीत विवाह प्रसंगी विशेष प्रकारची चित्रे काढण्याची पद्धती रूढ असल्याचे दिसते. विवाह विधीचा महत्त्वाचा भाग म्हणून ही चित्रे शुभ मानली जातात.

 

वाडा

भौगोलिक दृष्टया जंगलव्याप्त खडकाळ व दऱ्याखोऱ्यांचा बराचसा भाग असणारा आणि “सुगंधी बासमती तांदुळ” म्हणून ओळख असलेल्या वाडा कोलम या ” जी आय टॅग मिळालेल्या ” तांदळासाठी जगप्रसिद्ध असणारा वाडा तालूका हा पालघर जिल्हयाच्या पुर्वेस असून पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो . सरासरी 100 ते 125 इंच इतके पर्जन्यमान असणार्‍या वाडा तालुक्यामध्ये तिळसा येथे प्रसिद्ध असलेले पांडवकालीन तिळसेश्वर शिव मंदिर हे शंकराचे मंदिर आहे . जवळच विठठल रखुमाईचे प्रसिद्ध मंदिर आहे. तसेच मंदिरे तसेच कुंडे असणारा तालुक्यातील कोहोज किल्ला प्रसिदध आहे. गालतरे येथे हरे राम हरे कृष्ण अंतर्गत श्री .कृष्ण लीला साकारली गेली आहे तसेच श्री. कृष्णाचे अवतार , मथुरा नगरी , गोवर्धन पर्वत तयार केलेला असुन पर्यटकांची ते पाहण्यासाठी खुप गर्दी असते.
कोहोज किल्ला, तिळसेश्वर मंदीर, परशुराम मंदिर – गुंज, हातोबा देवस्थान यांचा प्रेक्षणीय स्थळांमध्ये उल्लेख करता येतो.

वाडा तालुक्यातील गुंजकाटी या ठिकाणी पांडवकालीन बाल्यावस्थेत असलेली परशुरामाची मूर्ती मंदिर एका मोठ्या पाषाणाने बनविलेले आहे. हे मंदिर गुंज गावच्या एका डोंगरावर दृष्टीत पडते. तसेच याच गावी पांडवकालीन शिल्प, शिवलिंग आणि भागिरथीचे मंदिर भग्नावस्थेत तेथील विस्तीर्ण तलावाच्या काठी पाहावयास मिळते. त्याचप्रमाणे याच गाव परिसरात काटी या गावी निसर्गरम्य वातावरणात वज्रेश्वरी मंदिराचे मूळस्थान म्हणून काटी यागावी त्यांचे मंदिर आहे. पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसई किल्ला सर करण्यासाठी पेशवे चिमाजी आप्पांनी वज्राई देवीला नवस केला होता. किल्ला सर झाला आणि नवस फेडण्यासाठी वज्रेश्वरी तालुका भिवंडी येथे किल्ल्याच्या स्वरूपाचे मंदिर बांधले. मात्र या देवीचे मूळस्थान वाडा तालुक्यातील गुंज-काटी परिसरात आहे. या ठिकाणी कालिका-रेणुका आणि वज्राई देवीच्या तीन मूर्ती एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. या देवींच्या मूर्ती वज्रेश्र्वरी तालुका भिवंडी इथल्या मंदिरातही पाहायला मिळतात.

नाथपंथीय भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून वाडा तालुक्यातील अंबिस्ते नागनाथ देवस्थान वैतरणा नदीच्या कडेला विस्तीर्ण जंगलव्याप्त परिसरात आहे. आजही नागनाथ देवस्थान नाथपंथीय धुनी कायम प्रज्वलित ठेवली जाते.

वाडा तालुका जातो. वाडा तालुका ‘वाडा कोलम’ मुळे जगभर प्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर निसर्गदेखील या भागावर मेहरबान झाला आहे. तालुक्यात अनेक पावसाळी पर्यटनस्थळे आहेत. त्याचबरोबर अनेक धार्मिक पर्यटनस्थळेही आहेत. या पर्यटनस्थळांनी तसेच निसर्ग संपदेने वाड्याच्या सौदर्यांत भर टाकली आहे; मात्र यातील अनेक पर्यटनस्थळे काहींना माहित देखील नाहीत. त्यातील एक अद्भुत आणि रहस्यमय ठिकाण म्हणजे तिळसा होय. तालुक्यातील प्राचीन तिळसेश्वर महादेवाचे मंदिर वाडा गावापासून ८ कि. मी. अंतरावर निसर्ग रम्य अशा ”तिळसा” गावी आहे. तिळसा येथील शिवमंदिर हे पांडवांनी एका रात्रीत बांधले आहे अशी आख्यायिका असुन या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे मंदिर नदीच्या मध्यभागी एका मोठ्या अखंड खडकावर उभारलेले आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे येथील देव मासे होय. या प्रकारचे मासे दुस-या कोणत्याही भागात आढळत नाहीत असेही म्हटले जाते. या देव माशाबद्दल एक लोककथा प्रसिद्ध आहे. वाड्यात लोकांचा पुर्वीपासून मासेमारी हाच मुख्य व्यवसाय होता. एका कोळी जोडप्याने या नदीच्या पात्रातील मासे पकडून घरी नेले. तो मासा कापण्यात आला तेव्हा तो मासा आपोआप परत जोडला जाऊन जिवंत झाला. हा सगळा प्रकार पाहून ते जोडपे चकीत झाले. त्यांनी त्या माशाची पूजा केली व पुन्हा नदीत सोडून दिले.अशी येथील भाविकांची श्रद्धा असल्याने येथे मासे पकडण्यास सक्त मनाई आहे.

 

विक्रमगड

26 जानेवारी 2002 रोजी निर्मिती झालेला आणि बहुतांशी आदिवासी लोकसंख्या असणारा विक्रमगड हा पालघर जिल्ह्याचा मध्यवर्ती तालुका असुन तालुक्याचा बराचशा भाग जंगलव्याप्त डोंगराळ द-या खो-याचा आहे. महालक्ष्मी डोंगराच्या अलिकडे व पूर्व पश्चिम पहुडलेला मातेरा डोंगर दिसतो.या डोंगराच्या सखल भागात देहर्जे खो-यात वसलेले विक्रमगड हे तालुक्याचे ठिकाण आहे. 10 डिसेंबर 1947 रोजी जव्हारचे नरेश यशवंतराव महाराज यांच्या वाढदिवसाचे अवचित साधुन पुर्वीच्या जव्हार संस्थांनातील कारभारामध्ये कुडाण या नावाने ओळख असलेल्या तालुक्याच्या या ठिकाणाचे नामकरण विक्रमगड असे केले गेले . मोठया प्रमाणा मध्ये आदिवासी,कोकणा,कुणबी, वारली,ठाकुर, महादेव कोळी,मल्हार कोळी,ढोरकोळी व कातकरी इत्यादी जाती जमातीचे लोक रहात असलेल्या विक्रमगडमधील आदिवासी तारपानृत्य विशेष प्रसिध्द असुन वारली चित्रकला विशेष लक्षवेधक आहे. विक्रमगडची सांस्कृतिक परंपरा म्हणजे तारपानृत्य व ढोलनाद होय. दसरा या सणाला सर्व आदिवासी आपआपल्या गांवात तारपानृत्य करीत असतात. विविध देवदेवतांचे मुखवटे घालून येथे बोहाडा उत्सव साजरा करण्यात येतो.

नागझरी येथील पांडव कालीन श्री नागेश्वर महादेव मंदीर, पिंजाळ नदीवरील श्री.पंतगेश्वराचे महादेव मंदिर, मालवाडा पिक रोडवर असलेले हातोबा मंदिर, जांभे गांवाजवळ पलुचा धबधबा ही विक्रमगड तालुक्यातील काही प्रसिध्द पर्यटन स्थ्ळे .
‘पक्ष्यांचा किलबिलाट, पाण्याचा खळखळाट असे शांत व निसर्गसौंदर्य लाभलेला विक्रमगडमधील पलूचा धबधबा व बारमाही पाणी असलेला खांडचा बंधारा पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. या भागात पावसाळ्यात मनसोक्त आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते.
विक्रमगड तालुक्यातील वनराईने पर्यटकांना सर्व काही भरभरून दिले आहे. त्‍यामुळे पर्यटकांची पावले या भागात वळत आहेत. विक्रमगड हा हरित पट्टा म्हणून ओळखला जात असला, तरी येथील हिरवाईच्या सौंदर्यात विक्रमगडचा पलूचा धबधबा आणि खांडचा बंधारा अधिक भर टाकत आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणांना भेट दिल्याशिवाय खऱ्या निसर्गाचे दर्शन पूर्णच होत नाही. पावसाळा सुरू झाला, की या नैसर्गिक सौंदर्यात भर घालतात ते येथील पांढरे शुभ्र धबधबे. विक्रमगडपासून डोंगरभागात उंचावर जंगल पसरलेले आहे. हाच जंगलपट्टा निसर्गमित्रांसाठी फार महत्त्‍वाचा आणि उपयुक्त आहे. विविध प्रजातीचे व रंगीबेरंगी पक्षीही येथे पाहावयास मिळत असल्याने पक्षी निरीक्षकही या भागात येत असतात.

विक्रमगडपासून हाकेच्या अंतरावर खांडचा बंधारा आहे. जून ते ऑक्टोबर या काळात येथे पर्यटकांची गर्दी होते. दगड व चिखलवाट तुडवतच येथे जावे लागते. मुंबई परिसर व अन्य ठिकाणांहून पर्यटक येथील निसर्गाचे रूप पाहावयास येतात. पक्ष्यांचा किलबिलाट, पाण्याचा खळखळाट असे निसर्गसंगीत येथे ऐकायला मिळते. विविध प्रकारे कीटक, फुलपाखरू, वनस्पती, वनौषधी येथील महत्त्‍वाचे घटक आहेत. या भागाच्या डोंगरमाथ्यावरून पाहाल तर जिथे तिथे हिरवे साम्राज्य आणि त्यातून डोकावणारे छोटे छोटे धबधबे रोमांचित करतात. त्यामुळे विक्रमगडचा खांडचा बंधारा खास आकर्षण बनतो.

जव्हार

जंगलव्याप्त डोंगराळ द-याखो-यांनी व्याप्त जव्हार तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 85806 हेक्टर असुन सरासरी 2500 ते 3000 मी.मी. इतके पर्जन्यमान असलेल्या तालुक्याचे ठिकाण जव्हार असून ते समुद्र सपाटी पासुन 1600 फुट उंचावर वसलेले आहे. जव्हार तालुक्याच्या पुर्वेस मोखाडा तालुका , पश्चिमेला डहाणु तालुका, दक्षिणेला वाडा तालुका व उत्तरेस तलासरी तालुका व गुजरात राज्याची सीमा आहे. या तालुक्यात उन्हाळा, पावसाळा व हिवाळ हे तिन्हीही ऋतू प्रामुख्याने प्रकर्षाने जाणवतात. या तालुक्याचा बहुतेक भाग डोंगराळ व द-याखो-याचा असल्याने या ठिकाणी भात, नागली, वरई ही प्रमुख पीके असून त्याच बरोबर तुर, उडीद व खुरासणी इत्यादी पिके घेतली जातात. तसेच पुरक शेती म्हणून मोगरा लावगवड, फुलशेती, वांगी, मिरची, टोमेटो, काजू, आंबा व तुती यांची लागवड केली जाते. या तालुक्यातुन मोगरा दररोज मुंबईच्या बाजारपेठेला पुरवठा केला जातो. तालुक्यामध्ये खडखड धरण आहे. जव्हार शहरास एैतिहासिक वारसा लाभलेला असून जय विलास पॅलेस , शिरपामाळ व बोपदगड ही एैतिकासिक स्थळे आहेत. हनुमान पॉईंट-जव्हार, सनसेंट पॉईंट जव्हार, दाभोसा धबधबा, काळमांडवी धबधबा, डोंबझरा ही पर्यटन स्थळे म्हणून ओळखली जातात. तसेच या तालुक्यात खंडोबा यात्रा जव्हार, विजयादशमी उत्सव जव्हार, शिवमंदिर यात्रा बाळकापरा व देवतळी यात्रा जामसर या ठिकाणी भरवली जातात. जव्हार तालुक्यामध्ये खंडेराव मंदिर जव्हार, हनुमान मंदिर जव्हार, राम मंदिर जव्हार, महादेव मंदिर जव्हार, अंबिका माता मंदिर जव्हार, शिवमंदिर बाळकापरा, राम मंदिर कडाचीमेट, विठठल मंदिर जव्हार, स्वामी समर्थ मंदिर जव्हार, शणी मंदिर जव्हार ही देवस्थाने आहेत. तालुक्यामध्ये वारली, कोकणा, कातकरी, ढोरकोळी, क.ठाकुर, महादेव कोळी, मल्हार कोळी हा आदिवासी समाजाची संख्या मोठया प्रमाणवर आहे. जगप्रसिध्द वारली पेटींग व देवदेवतांचे मुखवटे या तालुक्यातील रामखिंड या गावी तयार केले जातात.

मोखाडा

भातशेती हा मुख्य व्यवसाय असणारा मोखाडा हा  पालघर जिल्हयाच्या पुर्वेला वसलेला एक तालुका असुन मुंबई शहर आणि आसपासच्या परिसराला पाणीपुरवठा करणार्‍या प्रमुख धरणांपैकी मध्य वैतरणा धरण , पालघर जिल्ह्यामधील एक प्रमुख हिल स्टेशन अशी ख्याती प्राप्त असणारे ‘सूर्यमाळ’ हे थंड हवेचे ठिकाण याच तालुक्यामध्ये आहे. तालुक्याचा बहुतेक भाग डोंगराळ व द-याखो-यांचा असल्याने या ठिकाणी भात,नागली,वरई ही प्रमुख पिके त्याच बरोबर तुर, उडीद व खुरासणी इत्यादी पिकेही घेतली जातात. पुरक शेती म्हणून मोगरा लागवड,फुलशेती, वांगी,मिरची,टोमॅटो,काजू,आंबा,तुती व अलीकडे स्टॉबेरीची ही लागवड केली जाते. 

मोखाडा या तालुक्याच्या ठिकाणी रंगपंचमीला साजरा केला जाणारा बोहाडा उत्सव तसेच  देवबांध येथील यात्रा विशेष प्रसिद्ध आहे. बोहडा उत्सव रात्रभर साजरा केला जातो. आदिवासी विविध देवदेवतांचे मुखवटे डोक्यावर बांधून व वेष परिधान करून पारंपरिक सांबळ वाद्याच्या तालावर एका विशिष्ट पद्धतीने सोंगे नाचवतात. बोहाडा उत्सावात निसर्गाशी संबंधित गणपती, शारदा, सूर्यदेव, मारुती, सटवाई, एकादशी, चंद्रदेव, खंडेराव, महादेव, विष्णू, पवनदेव, ब्रह्मदेव, अग्निदेव, वाघ आणि रावणाचे मुखवटे घालून तशी वेशभूषा केली जाते. भक्तांच्या हातातील टेंभ्याच्या उजेडात ही सोंगे पहाटेपर्यंत नाचविण्यात येतात . तालुक्यामध्ये देवबांध येथील प्राचीन गणेश मंदिर, मोखाडा हनुमान मंदिर , विठठल मंदिर , साईबाबा मंदिर , जगदंबामाता मंदिर तसेच व प्राचीन शिव मंदिर  आणि ओसरविरा ही देवस्थाने आहेत. मोखाडा तालुक्याला लागुनच त्र्यंबबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यामधिल तीर्थक्षेत्र  तसेच पश्चिमेला जव्हार तालुका, दक्षिणेला वाडा तालुका,व उत्तरेस गुजरात राज्याची सीमा आहे. या तालुक्याचा बहुतेक भाग जंगलव्याप्त डोंगराळ द-याखो-यांचा असुन  तालुक्यामध्ये वारली, कोकणा, कातकरी, ढोरकोळी, क.ठाकुर, म.ठाकुर व महादेव कोळी हया आदिवासी समाजाची संख्या मोठया प्रमाणावर आहे .

सह्याद्रीच्या दक्षिणेकडील पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून १८०० फूट उंचीवर असलेले खोडाळा हे पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातिल एक सुंदर हिल स्टेशन आहे. खोडाळा हे येथील निसर्ग, आदिवासी संस्कृती, हवामान, नैसर्गिक धबधबे, ट्रेकिंग, घनदाट जंगल, पक्षी निरीक्षण अश्या अनेक आकर्षणांनी समृद्ध आहे.  खोडाळ्याच्या आसपास असलेली आदिवासी गावे स्वतःची पारंपारिक मुल्ये, संस्कृती जपून आहेत. येथील गावात विशेष प्रसंगी  रात्रभर आदिवासी नृत्य आणि संगीत साजरे केले जाते हे येथील एक प्रमुख आकर्षण आहे. 

खोडाळ्याजवळ असलेले देवबांध, विहीगाव धबधबा, सुर्यमाळ ह्या प्रसिध्द स्थळांसोबतच खेरवाडी येथे असलेले वाइल्ड कॅम्प येथील ट्रेकिंग, माउंटन बाइकिंग, नाईट सफारी, वॉटरफॉल रॅपलिंग यासारख्या साहसी खेळांसाठी  प्रसिध्द आहे.खोडाळ्यात पक्षी निरीक्षण देखील प्रसिध्द असून सभोवतालच्या घनदाट जंगलात आढळणारे बिबट्या , अस्वल , मुंगुस , घोरपड आणि क्वचित प्रसंगी पट्टेरी वाघ यासारखे जंगली प्राणी तथा स्थलांतरित पक्षी हे वन्यजीव अभ्यासक आणि निसर्ग प्रेमी यांच्यासाठी एक प्रमुख आकर्षण आहे.

 
निसर्ग संपन्न आणि

स्वच्छ सुंदर समुद्र किनारे

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.