कुणकेरी हुडोत्सव व भावई देवस्थान

Spread the love


सतीश पाटणकर

दक्षिण कोकणातील प्रसिद्ध देवस्थान असलेले सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथील नवसाला पावणारी भावई देवस्थान होय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या कुणकेरीच्या हुडा उत्सवाने गावाचा नावलौकिक दाहीदिशांना पसरला आहे.

  सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावच्या “हुडोत्सवा‘ने आपल्या वैशिष्ट¬पूर्ण अशा प्रथा परंपरांमुळे वेगळपण जपले आहे. दरवर्षी भाविकांच्या अलोट गर्दीत साजरा होणारा “हुडोत्सव‘ सर्वांसाठी पर्वणीच असते. फाल्गुन पौर्णिमा पौर्णिमेपासून हुडोत्सव सुरु होतो. पुढे सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांसह हा उत्सव भक्तीपूर्ण वातावरणात साजरा केला जातो.  फाल्गुन पौर्णिमेच्या चांदण्या रात्रीत श्रीदेवीच्या उत्सवातील प्रमुख होळी चव्हाटा अर्थात हुड्याजवळ सातेरी मंदिर समोर सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने ढोल-ताशांच्या गजरात घातली जाते.  याच दिवशी गाव मर्यादेचे पाच तथा मानकरी व इरतिकदार यांच्या उपस्थितीत गोसावी घट स्थापना करतात.  मानकऱ्यांच्या मानाप्रमाणे ढोल, ताशे सनईसह चव्हाट्यावर आणले जातात. दुसऱ्या दिवशी सर्व ढोल श्रीदेवी भावईचे घर व गावडे यांचे देवघर येथे आणले जातात.  त्याच दिवशी ढोल वादकांचा मानसन्मान व भोजन प्रसाद दिला जातो.  सायंकाळी सर्व ढोल चव्हाटा येथून सर्व मानकरी आपल्या मानाप्रमाणे आपआपल्या मांडीवर घेऊन जातात.  त्यानंतर प्रत्येक वाडीतील प्रत्येक घराकडे हा ढोल जातो. देवीच्या निशाणाचे प्रत्येक भाविक आदराने मनःपूर्वक आदर सत्कार करतात. हा कार्यक्रम पौर्णिमेच्या चौथ्या दिवसापर्यंत चालत असतो.

    चौथ्या दिवशी संध्याकाळी चव्हाट्यावर हळदीचा कार्यक्रम होतो.  हळदीचे तीर्थ घटाकडे बनवून पंचायतन देवस्थानाला अर्पण केले जाते.  हे तीर्थ श्री देवी भवानी देवीच्या घरी जाऊन अर्पण केले जाते.   तर पाचव्या दिवशी हेच तीर्थ मानाचे डफ आणि खेळे यांना दिले जाते.  त्यानंतर शेंदूर लावून रंगपंचमी सुरू होते.  त्यानंतर मानाप्रमाणे सर्व डफ श्रीदेवी भावईचे घर, गावडे देवघर, परब कुळ, पाळणेकोंड घर व भवानीचे घर गावचावडीकडे जाऊन नारळ ठेवून खेळे सोडले जातात.  मग कूवारीच्या झाडांच्या पायथ्याशी  नारळ अर्पण करून प्रसादाचे वाटप केले जाते. त्याच रात्री श्रीदेवी भावईच्या घराकडे मधली वाडीतील डफ गावकऱ्यांच्या डफाला मिळून मुख्यवाटेकडे डफावर थाप मारली जाते.

    पाचव्या दिवशी मधली वाडीतील  डफ श्रीदेवी भावईच्या डफाकडे येऊन गावकऱ्यांच्या डफाची भेट घेतो. त्यानंतर श्रीदेवी भवानीवाडीच्या  डफाची भेट घेतात. मग हे तीनही  डफ श्री देव निरंकारी देवळासमोर खेडे करतात. खेड्यांचा कार्यक्रम व दांड्याचे रोंबाट वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम मानाप्रमाणे व रितिरिवाजाप्रमाणे साजरा केला जातो. या दिवशी गावातील युवा मंडळी राधाचे सोंग घेऊन शोभेसाठी फिरतात. सर्व गावडे व इतर मंडळी घुमट चव्हाट्यावर एकत्र आणून तेथे फिरवतात. त्याच रात्री चव्हाट्यावर गाव मर्यादेचे पाच व सर्व मानकरी इरतीकदार व ग्रामस्थ चव्हाट्यावर जातात. देव घराकडून गावकरी मंडळी घुमट  घेऊन  होळी  व  हुड्याचे  पूजन केले जाते. त्यानंतर मानाप्रमाणे हुडोत्सव परिसरात शेण्या जाळतात.

सहावा दिवस शिमगोत्सवातील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. ढोल ताशे घेऊन श्रीदेवी भावईच्या घराकडे येतात. चव्हाटा येथे आल्यावर मानाप्रमाणे सर्व ढोल मानकरी आपापल्या मांडावर घेऊन जातात. दुपारी तीनच्या सुमारास श्रीदेवी भावईच्या घराकडून देवाचे रोंबाट सुटण्यापूर्वी बाबुराव सावंत या मानकऱ्यांचा ढोल भावईच्या घराकडे येतो. यावेळी पाळणे कोंडकर सावंत यांचे रोंबाट श्री देवी भावईच्या निवास्थानी येते. तेथे अवसारी तीन देव उभे राहतात. त्यानंतर मानकरी वाघीव रुपी सोंगवाले, घोडेवाले मानाच्या निशानकाठीसह रोंबाट वाजत – गाजत ओरडत सुटते. सुटलेले रोंबाट प्रथम चावडेश्वर देवाकडे जाते.
त्यावेळी भवानीमातेचे मानकरी सावंत यांचे रोंबाट देवीच्या रोंबटाला मिळते रोंबटाच्या मठातील मुक्त निशान पिंपळवाडीतील पिंपळाकडे जाते. तोपर्यंत मुख्य रोंबाट पिंपळाच्या अलीकडे थांबते. यावेळी पलीकडे कशेलकर सावंत पळसाच्या दलातील सावंत, भांडारकर सावंत, चौकेकर कोंडुस्कर, खानोलकर सावंत यांची रोंबाट येऊन थांबलेली असतात. पिंपळकर सावंत हे मुख्य निशाना जवळची पूजा पिंपळाकडे येऊन करतात, गुलाल उधळतात. त्याचवेळी पिंपळाचा अलीकडे असलेल्या अवसार उभे राहिल्यावर देवीच्या भेटीसाठी पलिकडून सर्व मठाकडे धावत जाऊन मुख्य रोंबाटात सामील होऊन गुलाल उधळतात. हे सर्व रोम्बाट एकत्र येऊन आंबेगावच्या श्रीदेवी क्षेत्रपालच्या दर्शन होण्यासाठी धावत जातात.
श्रींचे दर्शन घेतल्यावर पळसदेववाडी मार्गे गावडे देवघर देवघर यांचे दर्शन घेऊन चव्हाटा येथे जातात. चव्हाटा येथे पोचल्यावर पाच मानकरी आधार व ग्रामस्थ नारळाची तोरणे सोडून, येथील जवळच असलेल्या पारंपरिक दगडावर हे नारळ फोडले जातात. त्यावेळी हुड्याकडे येथे नारळ अर्पण करण्यात येतात.
हुडयाजवळ आल्यावर घोडेमोडणी, वाघाची शिकार हा आगळावेगळा कार्यक्रम होतो. श्रींची पालखी हुडयाजवळ ठेऊन देवीचे तिन्ही संचारी अवसार गगनचुंबी १०० फुटी असणा-या हुडयावर चढण्यासाठी सज्ज होतात. गा-हाणे झाल्यावर संचारी अवसार हुडयावर चढतात. हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो भावीक उपस्थित असतात. यावेळी १०० फुटी उंच हुडयावर चढलेल्या संचारी अवसारांवर भाविकांकडून दगड मारण्याचा कार्यक्रम होतो. वर चढलेल्या संचारी अवसारांवर ज्याचा दगड बसेल त्याचे भविष्य उज्ज्वल होते, अशी आख्यायिका आजही रूढ आहे. (लेखक मुख्यमंत्रांचे माजी माहिती अधिकारीआहेत )


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *