आंगणेवाडीची भराडी देवी

Spread the love

आंगणेवाडीची भराडीदेवी

           आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख जाहीर झाली, की महाराष्‍ट्राच्या कानाकोप-यातून नव्हे, तर परराज्यांतूनही हजारो भक्त दोन दिवसांच्या त्‍या यात्रेसाठी सिंधुदुर्गात दाखल होतात. लाखो भक्तांची मांदियाळी फुलून जाते.      कोकणातील प्रत्येक गाव आणि प्रत्येक गावाचे दैवत वैशिष्टपूर्ण आहे. आंगणेवाडी ही मसुरे गावातील वाडी. मालवण तालुक्यातील सर्वांत मोठा गाव म्हणून मसुरेची ओळख आहे. आंगणेवाडीची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. तेथील यात्रा एवढी झपाट्याने सर्वदूर का झाली याचे अनेक कंगोरे आणि उदाहरणे देखील आहेत.

           आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख कुठच्या तिथी अथवा वारानुसार ठरत नाही. यात्रेची तारीख देवीचा कौल घेऊन ठरवली जातेयात्रा दोन दिवस चालते. यात्रेची लगबग देवदिवाळीपासून सुरू होते. देवदिवाळीच्या दुसर्‍या दिवशी डाळप (डाळमांजरी) होते. तिसर्‍या दिवशी प्रमुख आंगणे मानकरी देवळात जमतात. ते मानकरी वंशपरंपरागत असले तरी दरवर्षी चार नवीन मानकरी निवडले जातात. मानकरी तांदूळ लावून देवीला कौल लावतात. ‘‘शिकारेक संपूर्ण गाव जमतोलो, शिकार करुक तू हुकुम दे, शिकार साध्य करून दी…’’ असे गार्‍हाणे घालून कौल लावला जातो. पाषाणास तांदूळ लावून उजवा कौल मिळण्याची वाट बघतात. एकदा कौल मिळाला, की सात ते आठ जणांचा गट करून जंगलात रान उठवले जाते. बहुतांश वेळा डुकराची शिकार केली जाते. ‘पारध’ मिळाले की वाजतगाजत देवीसमोर आणले जाते. मंदिराच्या उजव्या बाजूला पातोळी आहे. तिथे डुकराचे मांस सुटे करून ‘कोष्टी’(प्रसाद) म्हणून वाटले जाते. यानंतर देवीला कौल लावून यात्रेची तारीख ठरवली जाते.

        नवसाला पावणारी म्हणून देवीची ख्याती असली तरी कोंबड्या-बक-यांच्या बळीचे नवस मात्र यात्रेमध्ये आढळत नाही. देवीला सोन्या-चांदीच्या नाण्यासह ओटी भरणे, साडी चोळी, नारळाचे तोरण घातले जाते. ज्याचा नवस असेल त्याच्या वजनाएवढी साखर, नारळ, गूळ, तांबे याची तुलाभार करून देवीला वाहिली जाते. तुलाभार हा नवसाचा प्रकार पाहण्यासाठी झुंबड उडालेली असते. याशिवाय आगळावेगळा नवस म्हणजे भिक्षा मागण्याचा. जत्रेच्या दिवशी कडक उपवास करून रात्री देवीला दाखवलेल्या प्रसादापैकी शिते भिक्षा मागून ग्रहण केली जातात. त्यानंतरच उपवास सोडला जातो. यात्रेदिवशी रात्री नऊनंतर देवीचे दर्शन बंद केले जाते. मंदिराची साफसफाई झाल्यावर देवळात ताटे लावणे (देवीचा महाप्रसाद) हा कार्यक्रम असतो. उत्सवाच्या दिवशी आंगणे कुटुंबीय उपवास करतात. आंगणेच्या प्रत्येक घरातील एक सुवासिनी प्रसादाची ताटे घेऊन मंदिराकडे येतात. त्या उत्सवात सामील होणार्‍या आंगणे कुटुंबीयांच्या लेकी व सुनांनी ओटीचे सामान (खण, नारळ इत्यादी) व नवस असेल तर साडी आपल्या सोबत आपल्या घरूनच घेऊन यावे, अशी पूर्वापार प्रथा आहे.

         यात्रोत्सवात आंगणे ग्रामस्थ आंगणेवाडीत पोचलेल्या भक्तांना देवीचे दूत समजून त्‍यांच्‍या भोजनाची व्यवस्था करतात. भक्तांची संख्या लाखोंच्या घरात गेली असल्याने भोजनव्यवस्था सर्वांपर्यंत पोचवणे शक्य होत नाही. पूर्वी, यात्रेच्या दिवशी मध्यरात्री देवीला प्रसाद दाखवल्यानंतर तो प्रसाद भक्तांकडे उडवला जायचा. ती प्रथा बंद करण्यात आली असून, देवीचे दर्शन झाल्यानंतर भक्ताला लगेच प्रसाद दिला जातो.

            उत्सवादिवशी देवीची स्वयंभू अशी पाषाण मूर्ती अलंकारांनी सजवली जाते. पाषाणाला मुखवटा घालून साडीचोळी नेसविली जाते. भाविक देवीचे ते देखणे रूप जेव्हा पाहतो तेव्हा कृतकृत्य होतो. मातेच्या प्रांगणात पोहोचल्यानंतर मनातील इच्छा पूर्ण होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. यात्रोत्सवाच्या आदल्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन यात्रोत्सवादिवशी देवीची ओटी भरण्यास पहाटे तीन वाजताच प्रारंभ होतो. भाविक देवीच्या दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहत शिस्तबद्ध रीतीने देवीचे दर्शन घेतात. उत्सवादिवशी देवीचे रूप अवर्णनीय असते.

        भाविकांकडून देवीस मोठ्या प्रमाणात नवस केले जातात. ते नवस पूर्ण होत असल्याने नवसफेड करण्यासाठी भाविकांना रांग लावावी लागते. यात्रेचा दुसरा दिवस जत्रेचा असतो. सूर्योदयाच्यावेळी सूर्यकिरणांचा कवडसा देवीच्या मुखावर पडल्यानंतर देवीची ओटी भरून यात्रेस सुरुवात होते. दुसर्‍या दिवशी वाडीतील सर्व आंगणे ग्रामस्थ देवीची ओटी भरून दर्शन घेतात. त्याला मोडजत्रा म्हणतातत्यानंतर एकवीस ब्राह्मण येऊन सम्राज्ञा होते, देवळाचे शुद्धीकरण आदी विधी होतात. देवीने जत्रोत्सव सुरळीतपणे पार पाडून घेतला म्हणून देवीप्रती कृतज्ञता व्यक्त होते.

            एखाद्या जत्रेत गृहोपयोगी आणि धार्मिक साहित्य खरेदीला येत असेल, पण आंगणेवाडीच्या जत्रेत मासेविक्री होते. त्यासाठी विशिष्ट जागा निश्चित करण्यात आलेली असते. शेतीस उपयोगी लोखंडी वस्तू यांच्या खरेदीसाठी विशेष गर्दी होते. मुंबईकर चाकरमानी, सेलिब्रिटी मोठ्या संख्येने दाखल होत असल्याने जत्रेची ख्याती ‘चाकरमान्यांची यात्रा’ म्हणून वाढत आहे. चाकरमान्यांबरोबर अनेक प्रवर्गातील मंडळी मोठ्या संख्येने तेथे येतात.

        भराडीदेवीचे छायाचित्र कुणीही काढू नये अथवा प्रसिद्ध करू नये असा प्रघातच आहे. त्यामुळे आंगणेवाडीच्या आंगणे कुटुंबीयांच्या घरीसुद्धा छायाचित्र सापडणार नाही. आंगणेवाडीच्या यात्रेत हजारो भक्तांच्या शुभेच्छांचे जे फलक झळकतात त्यावर केवळ मंदिराचा फोटो असतो. मात्र इंटरनेटवर शोध घेतला असता भराडीमातेचा फोटो आढळला.

         साधारणत: तीनशे वर्षांपूर्वी देवीची स्‍थापना झाल्याचे सांगण्यात येते. चिमाजी अप्पा यांनी इनाम म्हणून देवीस साधारण दोन हजार एकर भरड व शेतजमीन दिली आहे, असे ऐतिहासिक दाखले आढळतात. महाराष्‍ट्राचे उद्योगमंत्री नारायण राणे सहकुटुंब गेली पंचवीस वर्षे आंगणेवाडीत यात्रेस उपस्थित राहून भराडीमातेचे दर्शन घेतात.

 मालवण तालुक्यातील आंगणेवाडीतील आंगणे कुटुंबीयांच्या भराडीमातेचा वार्षिक उत्सव शनिवारी १४ फेब्रुवारी २०१३ रोजी साजरा होत आहे. ती यात्रा पहाटे तीन वाजल्यापासून सुरू होईल. रात्री नऊ वाजता ओट्या भरण्याचे काम थांबणार असून रात्री बारानंतर पुन्हा ओट्या भरण्यास सुरुवात होणार आहे. यासाठीची सुविधा दुस-या दिवशी १५ फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत भाविकांसाठी खुली राहणार आहे.

   आंगणेवाडीच्या यात्रेत जशी भक्तांची गर्दी असते, तशीच हौशे-नवशे-गवशांचीही असते. चाकरमान्यांमध्ये आंगणेवाडीच्या यात्रेत जाण्याची क्रेझ असते. आम्ही आंगणेवाडीच्या जत्रेला चाललो असे सांगत कोकण पर्यटनाची सैर करणारे अनेक हौशी ग्रूप यात्रा कालावधीत आंगणेवाडीत पोचतात आणि पर्यटनासाठी मार्गस्थ होतात.

———————————————————————————-