पर्यटनाकडे उद्योगसंधी म्हणून पाहायला हवे

Spread the love

      

 गड-किल्ले, समुद्र किनारे, पौराणिक मंदिरे, तसेच नैसर्गिक स्थळांची समृद्धी लाभलेल्या महाराष्ट्रात पर्यटन व्यवसाय म्हणावा असा बहरला नाही. ही संधी महाराष्ट्राने गेल्या साठ वर्षांत दवडली, असे नाईलाजाने म्हणावे लागते. ‘पर्यटन विकास महामंडळा’ची स्थापना झाल्यानंतर अनेक चांगल्या योजना आल्या; परंतु नव्याचे नऊ दिवस यानुसार तो उत्साह टिकला. नंतर तर त्या योजनांची पाहिजे तशी अंमलबजावणी होऊ शकली नाही. या महामंडळाला व्यावसायिक स्वरूप दिले न गेल्याने, इतर सरकारी मंडळांप्रमाणेच हे महत्त्वाचे महामंडळही नंतर खुरटले. नोकरशाहीवर विसंबून न राहता नेत्यांनी एक मोठी संधी म्हणून, या उद्योगाकडे सुरुवातीपासून पाहिले असते तर, आज महाराष्ट्र राज्य या क्षेत्रातही देशात निश्चितच अग्रेसर राहिले असते. अर्थात अलीकडे ‘पर्यटन विकास महामंडळा’च्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यात पर्यटकांचा पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी, लहान-मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची जोड देत अनुभव जन्य पर्यटनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यात आल्यामुळे व्यवसाय सुलभता येणार असून, राज्यभरातील पर्यटन बहरण्यास हातभार लागणार आहे. हा उत्साह असाच टिकला तर पर्यटन संस्कृती जोर धरेल आणि एका नव्या खात्रीशीर उद्योगाचा श्रीगणेशा होईल!      

महाराष्ट्राची स्थापना दि. १ मे१९६० रोजी झाली.

 1)पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून सन १९६२ साली पर्यटन संचालनालयाची निर्मिती करण्यात आली. यातूनच पुढे हॉटेल्स/रिसॉर्टस उभारणे, पर्यटनाशी निगडित टूर पॅकजेस चालविणे, सोविनियर शॉप चालविणे… यासाठी दि. २० जानेवारी १९७५ रोजी ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा’ची स्थापना झाली.

2) त्यानंतर १९८० च्या दशकात महाबळेश्वर, गणपती पुळे, कार्ला, माथेरान अशा ठिकाणी पर्यटकांसाठी पर्यटन विकास महामंडळातर्फे रिसॉटर्स उभारण्यात आली. पुढे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा व्याप वाढत गेला.

 3)सन १९७५ च्याआसपास आंबोली ते चंद्रपूर-ताडोबा अभयारण्यात रिसॉर्ट उभारण्यात आले. शिर्डी दर्शन, अजिंठा-वेरुळ अशा सहलींचे महामंडळामार्फत आयोजन करण्यात येत होते. त्यानंतरच्या काळात डेक्कन ओडिसी ही लक्झरी ट्रेनही सुरू करण्यात आली.   
4)पर्यटन विभागामार्फत पर्यटन क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधांचा विकास होण्यासाठी, तसेच खासगी गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी १९९३ व १९९९ साली ‘पर्यटन प्रोत्साहन योजना’ जाहीर करण्यात आल्या. पर्यटनस्थळांनी प्रसिद्धी, विपणन अशी पुढची पायरीही गाठली. सन १९९० पासून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून पर्यटनाशी निगडित पायाभूत सुविधांचा विकास केला. दि.

5)२६ ऑगस्ट १९९७ रोजी पर्यटनाच्या क्षमतेनुसार सिंधुदुर्ग जिल्हा, पहिला पर्यटन जिल्हा घोषित करण्यात आला. नंतर नागपूर, औरंगाबाद हे ‘पर्यटन जिल्हे’ म्हणून जाहीर झाले. दि. २१ मार्च २०१८ रोजी जुन्नर तालुक्याला विशेष पर्यटन क्षेत्राचा (स्पेशल टुरिझम झोन) दर्जा बहाल करण्यात आला.   

6)सन १९९७ पासून निवास व न्याहरी योजना सुरू करण्यात आली, तर सन २००७ पासून महाभ्रमण योजना सुरू करण्यात आली. यामुळे सामान्य पर्यटकांना स्वस्त दरात राहण्याची व जेवण्याची सोय झाली.                                                           

           राज्यातील पर्यटनाचा मागोवा घेत असताना, उपरोल्लेखित काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात, त्या सार रूपाने मांडण्याचा हा प्रयत्न आहे. खरेतर गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र हे औद्योगिक व सामाजिकदृष्ट्या पुढारलेले राज्य, असा राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक आहे. परंतु, पर्यटनाच्या अनुषंगाने आपण त्या प्रमाणात विकास केलेला नाही, हे वास्तवही नाकारता येणार नाही. अर्थात पर्यटन ही एक व्यापक संकल्पना आहे आणि यामध्ये केवळ राज्य सरकार किंवा पर्यटन विभाग, त्याच्याशी संबंधित व्यावसायिक एवढ्यापुरताच हा विषय मर्यादित नाही. खरेतर पर्यटन ही एक संस्कृतीआहे. आज जगभरामध्ये ज्या देशांमध्ये पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे, तेथे ही पर्यटन संस्कृती उदयास येऊन जोपासली जात आहे. अर्थात आपल्याही भारतीय संस्कृतीमध्ये ‘अतिथी देवो भव’ ही संकल्पना प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे, परंतु आधुनिक काळात आपल्याकडे आलेल्या पर्यटकांना या संकल्पनेच्या रूपाने, आपल्या खऱ्या संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा आपण प्रयत्न करतो का? याचे विश्लेषण केल्यास अगदी नगण्य प्रमाणात हा प्रयत्न झालेला दिसून येतो.

          त्यासाठी पर्यटनाशी निगडित सर्वच घटकांनी पर्यटन वाढीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. पर्यटकाने महाराष्ट्रामध्ये पाऊल ठेवल्यापासून त्याचा प्रवास सुकर व्हायला हवा आणि तो केवळ रस्त्यांवरील नव्हे तर, त्याच्याशी होणारा संवाद, व्यवहार हा देखील चांगल्याप्रकारे व्हायला हवा. 
       पर्यटनस्थळांच्या ठिकाणी काळाची गरज म्हणून मराठीबरोबरच इंग्रजीतही माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेरून आलेल्या पर्यटकांबरोबर सुसंवाद साधता येईल.

         आधुनिक स्वरूपाचे संकेतस्थळ, ऑडिओ-व्हिडिओ शोज, बहुभाषिक मार्गदर्शक उपकरणे, व्हर्च्युअल रिअॅलिटी, डिजिटल मार्केटिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यटनस्थळांची माहिती सांगणे गरजेचे आहे.

          बऱ्याचदा पर्यटनाशी निगडित बाबी पर्यटन विभागानेच कराव्यात, अशी मानसिकता जाणवते. परंतु शासनामध्येही पर्यटनाशी निगडित अनेक विभाग कार्यरत आहेत. उदाहरणार्थ, रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आहे; ग्रामीण रस्त्यांसाठी जिल्हा परिषद आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग, विमानसेवा, रेल्वे हे विषय केंद्रसरकारकडे आहेत. तसेच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी मूलभूत सुविधा पुरवणे ही बाब प्रामुख्याने तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडित आहे. अर्थातच या सर्व विभागांशी प्रभावी समन्वय साधून पर्यटनस्थळांचा विकास शक्य आहे.

            युरोपातील ज्या देशांबाबत आपल्याला कुतूहल वाटते आणि जे देश पर्यटनातील आदर्श वाटतात, त्या ठिकाणी पर्यटन विभाग हा प्रामुख्याने ब्रँडिंग आणि मार्केटिंगचे काम करतो.        यास्तव पर्यटन यशस्वी करणे ही सामूहिक जबाबदारीआहे आणि त्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, शासनाचे विविध विभाग, स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संघटना या सर्वांनी एकत्र येऊन स्वत:चे कर्तव्य योग्यप्रकारे पार पाडले, तर निश्चितपणे पर्यटन सुविधांमध्ये विकास होऊ शकेल. 

         शासनाच्या संबंधित विभागांनी आपला निधी खर्च करीत असताना पर्यटनाशी निगडित स्थळांना काही प्रमाणात प्राधान्यक्रम दिला तर, पर्यटनस्थळी चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण होऊ शकतील. पर्यटनाशी निगडित व्यावसायिकांचा, पर्यटकांशी किती आदरतिथ्यपूर्वक वागणूक व व्यवहार आहे, यावर त्या पर्यटकाचे त्या ब्रँडबाबतचे मत बनत असते. त्यामुळे त्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे.

           सिंगापूरसारख्या लहानशा देशामध्ये, प्रत्येक हॉटेलवाल्याकडून डिजिटल व प्रिंट फॉर्ममध्ये पर्यटनाबाबतची माहिती उपलब्ध करून दिली जाते. त्याचबरोबर आलेल्या पर्यटकांना कमीत कमी वेळेत रूममध्ये प्रवेश कसा दिला जाईल आणि फिरण्यासाठी, मनोरंजनासाठी आवश्यक सगळ्या सोयी-सुविधांची माहिती देण्याबाबत ते आग्रही असतात. अशा पद्धतीची जबाबदारी आपल्याकडील हॉटेल व्यावसायिक क्वचितच घेताना आढळतात. त्याचबरोबर आपण ज्या भागात राहतो, तेथील संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी प्रयत्न करणेही महत्त्वाचे आहे. आपण बऱ्याचदा म्हणतो, की आपल्याकडे मोठा सांस्कृतिक वारसा आहे. मात्र हा वारसा लहान-मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्वरूपात, पर्यटन स्थळांवरील हॉटेल्स व रिसॉर्टनी दाखवायला सुरू केला तर, अतिशय कमी खर्चात अनुभवजन्य पर्यटनास चालना मिळू शकते आणि त्या माध्यमातून एक चांगला संदेश जाऊ शकतो. याकामी अनेक स्थानिक कलाकार-मंडळांचे सहकार्य मिळू शकते.

          नुकतेच महाराष्ट्र शासनाने कृषी पर्यटन, बीच शॅक धोरण असे काही चांगले निर्णय घेतलेले आहेत. कॅराव्हॅन टुरिझम आणि त्याचबरोबर साहसी उपक्रम धोरणही शासन लागू करणार आहे. या सगळ्या धोरणात्मक बाबी होत राहतीलच; परंतु त्याचबरोबर गाइड, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर्स या सर्वांनी सध्या पर्यटक ज्या ठिकाणी जातात, त्याच्या जवळपास असणाऱ्या नावीन्यपूर्ण पर्यटनस्थळांचा समावेश त्यांच्या पॅकेजमध्ये केल्यास, पर्यटकांची टूर सर्वार्थाने अविस्मरणीय ठरू शकेल. उदाहरणार्थ, आपण कोकणात गेल्यानंतर केवळ समुद्रकिनारे दाखवून चालणार नाही; तर पर्यटकांना नारळ-सुपारीच्या बागांमध्ये घेऊन जाणे, त्यांना लाइव्ह फिशिंगचा अनुभव देणे, अशा काही गोष्टी करता येतील. यामुळे स्थानिक हॉटेल/रिसॉर्ट्स चालक, टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट्स, गाइड यांनी अनुभवजन्य पर्यटनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी स्थानिक खाद्यपदार्थ, स्थानिक कला व सांस्कृतिक कार्यक्रम दाखविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर स्थानिक गावकरी, पदाधिकारी या सर्वांना बरोबर घेऊन त्यांच्या स्थानिक क्षेत्रात ‘इको टुरिझम’, ‘जबाबदार व सुरक्षित पर्यटन’ या संकल्पना रुजविण्यासाठी प्रयत्न केले तर, निश्चितपणे आगामी काळात राज्यातील पर्यटनाचे भवितव्य प्रकाशमान दिसू शकेल. यासाठी पर्यटन संस्कृतीच्या सर्व घटकांनी तत्परतेने, तळमळीने सहभागी होणे आवश्यक आहे. अर्थातच महाराष्ट्राची संस्कृती, पर्यटन संस्कृती म्हणून उदयास येऊन रुजायला हवी.

            काही राज्यांमध्ये पर्यटनाची संस्कृती तयार करण्यावर भर दिला जातो. महाराष्ट्रात पौराणिक-धार्मिक-ऐतिहासिक स्थळे, समुद्रकिनारे, हिलस्टेशन्स अशी विविधता असतानाही, आपण त्याची प्रसिद्धी करण्यात मागे पडत आहोत. विविध मार्गांद्वारे त्यांचे ब्रँडिंग होणे गरजेचे आहे. परराज्यातून, परदेशातून आलेल्या व्यक्तिला सुरक्षित वाटले पाहिजे. त्याची फसवणूक होणार नाही, याची त्याला खात्री असली पाहिजे. अगदी टॅक्सीचालकांपासून टुरिझम कंपन्या, हॉटेल व्यावसायिक किंवा संबंधित कोणत्याही घटकाकडून त्याची अडवणूक होऊ नये. पर्यटनस्थळांचे मूळ स्वरूप जपण्याची गरज आहे; तर लोक ते पाहण्यासाठी आवर्जून येतील. काही पर्यटनस्थळांच्या विकास आराखड्याला मान्यता जरूर मिळते, परंतु पुढे इन्फ्रास्ट्रक्चर वेळेत होत नाही. त्यासाठी तातडी गरजेची आहे. पर्यटनाशी संबंधित विविध सेवांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण होण्याची गरज आहे. अलीकडे पर्यटन विभागाने कात टाकल्याचे दिसून येते. पर्यटनाला उद्योगाचा दर्जा देण्याबाबत मूलगामी निर्णय अलीकडेच घेण्यात आला.

            पर्यटन उद्योगाची लाल फितीच्या कारभारातून सुटका होण्याच्या दृष्टीने परवानासुलभ धोरण करण्यात आले. आदरातिथ्य व्यवसायाला लागणारे परवाने, कालबद्ध व ऑनलाइन दिले जाणार आहेत. प्रथमच पर्यटन विभागास युवा पर्यटन मंत्री व राज्य पर्यटनमंत्री लाभले आहेत. त्यामुळे यांच्याकडून पर्यटनातील मरगळ दूर होऊन उद्योग क्षेत्राप्रमाणे, पर्यटन क्षेत्रातही महाराष्ट्राला अग्रगण्य स्थान मिळेल, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील किल्ले, गुंफा, वनसंपदा, समुद्र किनारे, बॉलिवूड टुरिझम, कृषी पर्यटन, ट्रेकिंग… यांसारखे यूएसपी जगाला दाखविण्याचा प्रयत्न झाल्यास, राज्यातील पर्यटन उज्ज्वल होईल, यात शंका नाही!

येत्या पाच वर्षांत पर्यटन क्षेत्रात दुप्पट उत्पन्न निर्माण करून मनुष्यबळ विकास, उत्पादन विकास, पर्यटन वाढ आणि गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी नवीन धोरण तयार केले आहे. मनुष्यबळ विकासात कौशल्य विकासावर भर असून गाइड ट्रेनिंग, टॅक्सीचालकाला शिष्टाचाराचे धडे, लहान व मध्यम पर्यटन घटकांवर भर आणि मोठ्या पर्यटन घटकांना विशेष प्रोत्साहन देण्याचा धोरणाचा उद्देश आहे. विशेष पर्यटन विकास अभ्यासक्रमासाठी प्रत्येक व्यक्तीला साडेबारा हजार रुपये आणि गाइड प्रशिक्षणासाठी पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तसेच दहा पर्यटनस्थळी पोलिस बंदोबस्त, पोलिसांना उजळणी प्रशिक्षण आणि पर्यटनाशी संबंधित माहिती देण्यात येईल. विशेष पर्यटन क्षेत्र, विशेष पर्यटन जिल्हे यांची आवश्यकतेनुसार जाहीर करण्यात येणार आहेत. धार्मिक, वैद्यकीय, निसर्ग आणि कृषी पर्यटनालाही चालना मिळणार आहे. कृषी पर्यटन केंद्रांवर शैक्षणिक सहल नेणे शाळांना बंधनकारक करण्यात येणार आहे. पर्यटकांच्या माहिती व सुरक्षिततेसाठी ‘मोबाइल अॅप’ विकसित करण्यात येईल. नवीन धोरणात पर्यटनाला उद्योगाच्या सवलती दिल्या आहेत. राज्याची पाच क्षेत्रांत विभागणी केली असून मेगा, अल्ट्रामेगा, लार्ज, मीडियम, स्मॉल आणि मायक्रो असे गुंतवणुकीसाठी वर्गीकरण आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालकीच्या जागेसाठी अकृषक करात सूट देण्यात येणार आहे. महिला उद्योजकांचे पर्यटन प्रकल्प, अपंगाचे पर्यटन प्रकल्प, माहिती प्रदर्शन केंद्रांचे पर्यटन प्रकल्प, शाश्वत पर्यटन प्रकल्पासाठी प्रोत्साहन प्रस्तावित आहे. दरम्यान, नवीन धोरण व्यापक असले तरी स्थानिक पातळीवर त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी पर्यटन व्यावसायिकांनी केली आहे. वेरूळ-अजिंठा लेणी, देवगिरी किल्ला, गौताळा अभयारण्य, बीबी-का-मकबरा येथे लाखो पर्यटक येतात. मात्र, पुरेशा सुविधा नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होतो. या धोरणात सुविधांवर भर देण्याची गरज आहे.


स्वतंत्र संचालनालय  
राज्य मंत्रिमंडळाने पर्यटन संचालनालयाच्या निर्मिती प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या संचालनालयाच्या माध्यमातून पर्यटन धोरणाची परिणामकारक आखणी आणि अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीतून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात येतील. या संचालनालयाचे प्रमुख पर्यटन संचालक राहणार असून नागपूर, औरंगाबाद, अमरावती, सिंधुदुर्ग व पुणे ही पाच प्रादेशिक कार्यालये असतील.

सिटी मार्केटिंग अत्यंत महत्त्वाचे असते. दळणवळणाच्या सुविधा देऊन औरंगाबाद शहराला इतर शहरांशी जोडले पाहिजे. शहराचा पर्यटन व्यवसाय दहा महिन्यांवरून चार महिने उरला आहे.



गाइड व टॅक्सीचालकाला प्रशिक्षण देण्याचा निर्णय चांगला आहे. ‘मेक इन इंडिया’ साकार करण्यासाठी धोरणाच्या अंमलबजावणीची गरज आहे. रोजगाराची संधी हवी असल्यास प्रयत्न पाहिजे. नवीन पर्यटन धोरण उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.


Solar MPPT charger