सतीश पाटणकर
कोकणी माणसाला नेहमी फणसाची उपमा दिली जाते. मात्र, कोकणची ओळख सांगणारे हे पारंपारिक व वैशिष्ट्यपूर्ण फळ व्यावसायिक स्तरावर दुर्लक्षित आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेले पु. ल. देशपांडे यांनी फणसाची उपमा कोकणी माणसाला दिली. बाहेरून काटेरी आणि आतून गोड असलेला फणस व्यावसायिक दृष्टीने दुर्लक्षितच राहिला. नगदी पीक म्हणून हे फळ फायदेशीर ठरू शकते. दक्षिणेकडील राज्यांतील फणस शेती पाहिल्यास याची साक्ष पटू शकते. अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये या फळाला फार वरचे स्थान आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडूत फणसाचे विविध पदार्थ विकून आणि निर्यात करून चांगली कमाई केली जात आहे.
कोकणात कापा आणि बरका हे प्रमुख दोन प्रकार आढळतात. केवळ वटपौर्णिमेला खपणारे फळ एवढीच फणसाची ओळख सीमित झाली असून या फळझाडाच्या व्यावसायिक लागवडीकडे कुणीच लक्ष दिलेले नाही. मोठय़ा प्रमाणावर फणस लागवड झाल्यास कोकणात त्यावर मोठा प्रक्रिया उद्योग उभा राहू शकेल.कोकणात आंब्याच्या बरोबरीने फणसाचे नाव आवर्जून घेतले जाते. हापूस आंब्याने जगभरातील खवय्यांना वेड लावल्याने त्याची व्यावसायिक लागवड झालेली दिसते. पण याबाबतीत फणस हे चवदार फळ मात्र खूपच उपेक्षित?राहिले, असेच म्हणावे लागेल. घराभोवतालच्या जागेत, शेतावर एखाद् दुसरे फणसाचे झाड पाहायला मिळते, तेवढेच. या फळातूनही चांगले उत्पन्न हाती पडू शकते असा विचारच कोकणी माणसाच्या मनाला कधी शिवू शकला नसेल, याचेच आश्चर्य वाटते.
एखादी शेती किंवा उद्योग यशस्वी झाला की त्याच्या मागे लागण्याची मानसिकताच याला कारणीभूत ठरत असावी. अन्यथा सर्वार्थाने उपयुक्त असलेल्या या झाडाची अशी उपेक्षा झालीच नसती. तामिळनाडूतील पानसरी तालुक्याचा फणस लागवडीत आपण आदर्श घ्यावा असाच आहे. फणसाच्या झाडाला पाणी फार कमी प्रमाणात लागते.सध्या बागायती किंवा इतर शेतीसाठी कळीच्या ठरणा-या हवामानातील बदलाचाही या फळझाडावर फारसा परिणाम होत नाही. लाकूडही टिकाऊ असते. खाण्यापुरते आणि पाहुण्यांना भेट देण्यापलीकडे या फळाचा विचार झाल्यास फार मोठी बाजारपेठ तयार होऊ शकते. फणसाच्या आधारावर व्यापक असा प्रक्रिया उद्योग उभा राहू शकतो. प्रक्रियाकृत पदार्थाना देशविदेशात मोठी मागणी आहे. मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका यांसारख्या आशियाई देशातील खाद्यसंस्कृतीत फणसाला महत्त्वाचे स्थान आहे.
फणसात शरीराला उपयुक्त अशी अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत. फणसातून चांगल्या प्रकारच्या कॅलरीज तर मिळतातच, पण त्यातून अँटी ऑक्सीडंट हा गुण त्याची उपयुक्तता आणखी वाढवतो. फणसाच्या पिवळय़ा गरात प्रो विटॅमिन ए आहे. त्यामुळे सूज, दाह कमी करण्याची क्षमता त्यात आहे.फणसातील हायपोग्लास मधुमेहासाठीही प्रभावशाली ठरत आहे. चीनने फणसावर अधिक संशोधन करून कर्करोग, रक्तदाब, अल्सर यांसारख्या रोगांवरील उपचारांसाठी यातील घटकांचा वापर केला आहे. तसेच फणसापासून टॉनिक विकसित केली गेली आहेत. मानवी शरीरात दारूविरोधी भावना निर्माण करण्यासही फणस मदत करतो. फणसाच्या गऱ्यांप्रमाणे बियासुद्धा पौष्टिक असतात. उलट फणसाच्या बियांमध्ये कबरेदके, प्रथिने व खनिजे तुलनात्मकरीत्या गऱ्यांपेक्षा जास्त असतात. त्यामुळेच फणसाच्या बिया भाजून किंवा उकडून खाणे आपल्याकडे खूपच लोकप्रिय आहे.
आपल्याकडे जेमतेम २५ टक्केच फणसाचा वापर केला जातो. फणस उत्पादनात भारत दुस-या क्रमांकावर आहे. मात्र, फणस वाया घालवण्यात पहिल्या क्रमांकावर आहे. आपल्या आजूबाजूचे देश यापासून विविध खाद्यपदार्थ तयार करत आहेत. फणसाचे चिप्स बनवण्यात व्हिएतनाम आघाडीवर आहे. तेथे फणसाच्या चिप्सचे वीस हजार कारखाने आहेत. त्याची निर्यात चीन, अमेरिका, रशिया, जपान, जर्मनी या देशांत केली जाते. मलेशियाने आपल्या कृषी धोरणात फणसाला अग्रक्रम दिला आहे.इथेही मोठय़ा प्रमाणावर फणसावर प्रक्रिया केली जाते. मलेशियाने नियोजनबद्धरीत्या ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर फणस लागवड केली आहे. फणस हे श्रीलंकेचे राष्ट्रीय फळ आहे. फणसाची क री ते मोठय़ा प्रमाणात निर्यात करत आहेत. आपल्याकडे कोटय़वधी रुपयांचा फणस दरवर्षी वाया जातो. फणसपोळी, तळलेले गरे असे पदार्थ तयार करून स्थानिक बाजारपेठेत विकले जातात. कर्नाटक, लखनौमध्ये तयार होणा-या फणसाच्या चिप्स देशभर लोकप्रिय आहेत. शिवाय फणसाचा जॅम, मुरांबा, लोणची करणारेही काही उद्योग आहेत.
केरळात कोवळय़ा फणसाचे गरे काढून ते विकले जातात. फणसाचे हिरवे गरे सुकवून दिल्यास ते वर्षभर भाजीसाठी वापरता येतात. रेडी टू इट आणि रेडी टू कुक पदार्थ केल्यास त्यांना चांगली मागणी असेल. आपल्याकडे हॉटेलमधून फणसाची भाजी, फणसाची बिर्याणी, आइस्क्रीम, फ्रुट सलाड अशा विविध प्रकारचे स्पेशल मेनू करून त्यांना प्रसिद्धी द्यायला हवी. तरच फणसातील रुची वाढेल. फणस हे नैसर्गिक उत्पादन आहे. त्यात विविध प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे आहेत. तेव्हा त्याचे मार्केटिंग आपल्यालाच करायला हवे. बंगालमध्ये फणसाच्या भाजीला शाकाहारी मटण म्हटले जाते. फणसातील फायबर पचनासाठी उपयुक्त ठरतात.
फणसाच्या लागवड, प्रकियांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी फणसाच्या पदार्थाच्या स्पर्धा, महोत्सव आयोजित केल्यास त्याचे व्यावसायिकीकरण सुलभ होईल. कोकणात लागवडीसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ‘कोकण प्रॉलिफिक’ ही अधिक उत्पन्न देणारी कापा फणसाची जात विकसित केलेली आहे. गरे जाड, पिवळसर पांढरट रंग, खुसखुसीत व उत्तम स्वाद आणि गोडीचे आहेत. एप्रिल-मे महिन्यात फळ तयार होते. त्यामुळे त्यांना जादा दरही मिळतो. अधिक फळे धरण्याची क्षमता व प्रक्रियेस उपयुक्त असलेल्या या जातीची मृदकाष्ट कलमे विद्यापीठात उपलब्ध आहेत. फणसाचे आयुर्वेदिक महत्त्व, फणसा पासून उत्पादित पदार्थांना जागतिक बाजारपेठेत असलेली मागणी व यामधून निर्माण होणारी आर्थिक उलाढाल. या बाबी विचारात घेऊन या फळावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. (लेखक मुख्यमंत्रांचे माजी माहिती अधिकारीआहेत )
———————————————————————————