सतीश य. पाटणकर
सावंतवाडी मधील जगप्रसिद्ध लाकडी खेळण्यांची बाजारपेठ. भारतातील लाकडी खेळण्यांचे मुख्य मार्केट.महाराष्ट्रतील सावंतवाडी तालुक्यात असलेली हि जगप्रसिद्ध बाजारपेठ, चितार अळी.सावंतवाडी बस डेपो, मोती तलाव आणि राजवाडा यापासून चालत फक्त ५ ते १० मिनिटे अंतरावर आहे, ही चितार अळी. येथे पांगारा लाकडा पासून खेळणी आणि वस्तू बनवले जातात.सावंतवाडी संस्थानाला ३५० ते ४०० वर्षांचा इतिहास आहे. जवळ जवळ तेव्हा पासूनच हि कला येथे जोपासली जात आहे. सावंतवाडीच्या सावंत भोंसले घराण्याने नेहमीच कला आणि शिक्षणाला प्रोत्साहन आणि राजाश्रय दिला आहे.
आधी या वस्तूंचा वापर दैनंदित जीवनात होत असे. लग्न करून सासरी जाणाऱ्या मुलींना, त्याकाळी अशा लाकडी वस्तू, भेट म्हणून देण्याची परंपरा होती.लाकडापासून बनवलेली फळं एवढी खरी वाटत असतात कि लोकांना ती खाण्याचा मोह झाला नाही तर नवलच. पांगारा झाडाची लाकडं वनामध्ये मुबलक प्रमाणात मिळतात. पावसात भिजवून नंतर वर्षभर उन्हामध्ये सुकवली कि हि लाकडं हलकी होतात. त्यानंतर कारागीर आपल्या कौशल्याच्या सहाय्याने वेगवेगळी फळं, खेळणी आणि वस्तू बनवतात. चितारअळी पासून ४ ते ५ किलोमीटर अंतरावर याचे कारखाने आहेत.या लाकडी वस्तूंच्या बाजारपेठेमुळे सावंतवाडीचे नाव जगभर पसरले आहे. आता जवळ जवळ चौथी ते पाचवी पिढी हि कला येथे सांभाळत आहे. आजकालच्या लहान मुलांना मोबाइल हे एकच खेळणे माहीत आहे. त्यांना या सर्व वस्तू ओल्ड फॅशन वाटतात. पण इथे आल्यावर तुम्हाला तुमच्या लहानपणाची आठवण नक्कीच होईल.सध्या चिनी खेळण्यांची घुसखोरी, नवीन मशिनरी, कारीगरांची कमतरता या सर्वांना तोंड देत हि चितारअळी आजही आपलं अस्तित्व टिकवून आहे . म्हणून जर कोकणात आलात तर सावंतवाडीला या चितारअळीला जरूर भेट द्या.
———————————————————————————-