business man

कोकणातील माणसात व्यावसायिकता येण्याची गरज

Spread the love

सतीश पाटणकर      

           सिंधुदुर्गातील काही पर्यटनस्थळांवर हजारो पर्यटक येत असतात. कस्तुरी मृगाच्या कुपीत चिजा दडलेल्या असतात. परंतु त्या मृगालाच माहिती नसते की आपल्याकडे असे काही मौल्यवान आहे. कोकणातील माणसाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. ‘आमचा काय हा, हे डोंगर आणि झाडापेडा बघून पोट भराचा न्हाय’ अशा शेलक्या मालवणी शब्दातून कोकणचा माणूस इथल्या निसर्गसौंदर्याचे वर्णन करून मोकळा होतो. कोकणातील जनतेमध्ये व्यावसायिकता आली पाहिजे.

       कोकणात पर्यटनासाठी मोठय़ा प्रमाणात गेल्या काही वर्षात पर्यटक येऊ लागले आहेत. १९९८ साली सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आणि त्यानंतर ख-या अर्थाने इथल्या निसर्गसौंदर्याची भुरळ येणा-या पर्यटकांना पडू लागली. सिंधुदुर्गातील काही पर्यटनस्थळांवर हजारो पर्यटक येत असतात. कस्तुरी मृगाच्या कुपीत चिजा दडलेल्या असतात. परंतु त्या मृगालाच माहिती नसते की आपल्याकडे असे काही मौल्यवान आहे. कोकणातील माणसाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. कोकणातील जनतेमध्ये व्यावसायिकता आली पाहिजे. ही व्यावसायिकता येताना कोकणातील आदरातिथ्याचा लाभ येणा-या पर्यटकांना झाला पाहिजे. ‘होया तर घे, नाय तर जा’ ही वृत्ती आपल्या मुलखातल्या व्यावसायिकांनी सोडली पाहिजे. येणारा पर्यटक पुन्हा आपल्याकडे यायला हवा. त्या ग्राहक पर्यटकाला पुन्हा यावेसे वाटले पाहिजे. एवढी व्यावसायिकताही असायला हवी आणि आपलेपणाची भावनाही असावी. तरच संपूर्ण कोकणचे अर्थकारण बदलणारा हा पर्यटन व्यवसाय बहरेल आणि याच पर्यटन व्यवसायातून कोकणची जनता आर्थिकदृष्टय़ा समृद्ध होईल.

          सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्गात तीन पंचतारांकित हॉटेल्सनी पसंती दिली पण प्रत्यक्षात आजच्या घडीला एका पंचतारांकित हॉटेल्सची उभारणी होत आहे . आज या क्षेत्रातील अनेक मोठ्या जागांच्या शोधात आहेत .मात्र गेल्या दहा वर्षात जिल्ह्यात अनेक लहान मोठी रिसॉर्ट उभी राहिली आहेत .पूर्वी राष्ट्रीय महामार्गावर हाताच्या बोटावर हॉटेल्स होती .मात्र गेल्या पाच वर्षात यामार्गावर पावलोपावली हॉटेल्स उभी राहिली आहेत .सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सिमेवर गोवा राज्य आहे . या राज्यात एकसाइज ड्युटी कमी असल्याने यामार्गावरून गोव्यात जाणारा पर्यटक सिंधुदुर्गात न थांबता थेट गोव्यात जातो .सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा असल्याने राज्यशासनाने विशेषबाब म्हणून सिंधुदुर्गापुरता हा टॅक्स कमी केल्यास पर्यटकांची रांग या जिल्हात लागू शकेल . तसेच या जिल्हाच्या किनारी भागात काही पायाभूत सुविधा नव्याने निर्माण करण्याची गरज आहे.

            गेल्या पंधरा वर्षात कोकणात पर्यटक येत आहेत. वर्ष अखेरीस तारकर्लीच्या किना-याला अनेक सेलिब्रेटीज, राजकीय नेते चार-पाच दिवस वास्तव्यास असतात. यावरून इथला पर्यटन व्यवसाय कसा व किती प्रमाणात वाढला आहे हे दिसून येते. मालवण, वेंगुर्ले, देवगड या किनारपट्टीवर तर हंगामामध्ये हॉटेल व्यवसाय चांगलाच चालला आहे. जिल्हय़ातील अनेक समुद्रकिना-यावर आता पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. पावसाळी हंगामातही कोकणातील धबधब्यांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक येत आहेत. कोकणात कोसळणारा पाऊस अनुभवण्यासाठी देखील उर्वरित महाराष्ट्रातून किंवा देश-विदेशातून कोकणात येणा-या पर्यटकांची संख्याही काही कमी नाही.

        सिंधुदुर्गच्या जवळच असणा-या गोवा राज्यात देश-विदेशातून पर्यटक येत असतात. परंतु गोवा राज्यातील समुद्रकिनारे शांत-नीरव आणि सुरक्षितही राहिले नाहीत. यामुळेच पर्यटक गोवा राज्याच्या सीमेवरच्या कोकणात येऊ लागले आहेत. कोकणात येणा-या पर्यटकांमध्ये वेगवेगळय़ा प्रकारचे पर्यटक आता पर्यटनासाठी येऊ लागले आहेत. आंबोलीसारख्या पर्यटनस्थळी लाखभर पर्यटक एकाच दिवसात येतात आणि मग पर्यटनाचा आनंद घेणे बाजूला राहते. याउलट पर्यटकांच्या ग्रुपमध्ये कधी आपआपसात हाणामारीचे प्रकार एवढे वाढले की आहेत की या अशा दारू पिऊन धिंगाणा घालणा-यांमुळे जे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत अशा पर्यटकांना आनंदच घ्यायला मिळत नाही. पर्यटनस्थळांच्या या लोकांकडून आगळीक केली जाते आणि मग पर्यटनस्थळेच बदनाम होतात.

            मांगेली येथील धबधब्यावरही गोवा राज्यातून मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. कोकणातील सर्वच धबधब्यांवर महाराष्ट्रातील उर्वरित भागातील पर्यटक येतात. तसेच गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमधून येणा-या पर्यटकांची संख्याही वाढतीच आहे. अनेक पर्यटनस्थळांवर पायाभूत सुविधा नाहीत. कोकणात अनेक ठिकाणचे धबधबे असे आहेत तेथे चहा देखील मिळत नाही. पर्यटन हा व्यवसाय आहे. कोकणातील जनतेमध्ये व्यावसायिकता आली पाहिजे. ही व्यावसायिकता येताना कोकणातील आदरातिथ्याचा लाभ येणा-या पर्यटकांना झाला पाहिजे. ‘होया तर घे, नाय तर जा’ ही वृत्ती आपल्या मुलखातल्या व्यावसायिकांनी सोडली पाहिजे. येणारा पर्यटक परत यायला हवा असं वाटत असेल तर काही पथ्ये आपल्याला पाळावी लागतील. त्यांना माफक दरात जेवण आणि निवास बरोबरच त्यांचे चांगले आदरातिथ्यही व्हायला हवे.  येणारा पर्यटक पुन्हा आपल्याकडे यायला हवा. त्या ग्राहक पर्यटकाला पुन्हा यावेसे वाटले पाहिजे. एवढी व्यावसायिकताही असायला हवी आणि आपलेपणाची भावनाही असावी. तरच संपूर्ण कोकणचे अर्थकारण बदलणारा हा पर्यटन व्यवसाय बहरेल आणि याच पर्यटन व्यवसायातून कोकणची जनता आर्थिकदृष्टय़ा समृद्ध होईल.

     सरकार बदलले की धोरणे बदलतात. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने यावर्षीपासून महाराष्ट्र ‘वॉटर स्पोर्ट्स’ पॉलिसी अमलात आणली आहे. सिंधुदुर्गात जलक्रीडा व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत असताना त्याकडे मेरिटाईम बोर्डाने दुर्लक्ष केले आहे. (लेखक मुख्यमंत्रांचे माजी माहिती अधिकारीआहेत )

————————————————————————————————–