sindhudurga fort

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संक्षिप्त इतिहास

Spread the love

             ऊज्वल ऐतिहासिक वारसा लाभलेला आणि अलॊकिक नैसर्गिक लावण्यांनी सजलेला जिल्हा म्हणजेच आपला सिंधुदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य कर्तुत्वाची, हिंदवी स्वराज्याची साक्ष देणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्याने ओळखला जाणारा आपला अभेद्य सिंधुदुर्ग. १ मे १९८१ रोजी रत्नागिरी जिल्हाचे विभाजन करून कोकण विभागाचा आर्थिक विकास व्हावा या हेतूने सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना झाली. पूर्वेला भक्कम अभेद्य अशा पर्वतराजीनी नटलेला आणि  पश्चिमेला  पसरलेला 1२०कि.मि.चा विस्तीर्ण  निळाशार सागर किनारा, देवगड, वैभववाडी ,कणकवली, मालवण, वेंगुर्ला , कुडाळ सावंतवाडी दोडामार्ग, या ८ तालुक्यांनी आणि ७४३ गावांनी वसलेला आपला सिंधुदुर्ग.

   पौराणिक कथेनुसार परशूरामाने स्वतःच्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे सिंधु सागराला (अरबी सुमद्राला) मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशुरामाच्या बाणाच्या टप्प्यापर्यंत मागे हटण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे परशुरामाने सह्याद्रीवरून शरसंधान केले व कोकणची भूमी निर्माण केली. त्यानंतर परशुराम सध्या उत्तर कर्नाटकात असलेल्या गोकर्ण क्षेत्री वास्तव्य करू लागले. रत्नागिरी जिल्हा हा शिलाहारांच्या अधिपत्याखाली होता आणि बहुधा त्यांच्या राज्याची राजधानी गोवा होती. ह्या राजधानीचे स्थलांतर नंतरच्या काळात अधिक मध्यवर्ती स्थान जसेकी रत्नागिरीच्या आसपास अथवा खारेपाटण येथे केले गेले असावे.चंद्रपूर हे कोकणातील प्राचीन शहरांपैकी एक आहे. ते बहुधा चालुक्य राजा पुल्केशीन दुसरा याचा मुलगा चंद्रादित्यद्वारा स्थापित करण्यात आले होते. सोळाव्या शतकात संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीज सत्तेचा उदय झाला आणि सिंधुदुर्ग जिल्हा याला काही अपवाद नव्हता. अखेर १६७५ मध्ये सुलतानाच्या हातून हा जिल्हा शिवरायांच्या हाती आला. मराठ्यांनी १८७१ पर्यंत जिल्ह्यावर वर्चस्व राखले मात्र १८७१ मध्ये ब्रिटीश आणि पेशव्यां मधील संघर्ष संपला आणि जिल्हा ब्रिटिशांच्या हातात गेला. इ. स. १८१९ मध्ये दक्षिण कोकण नावाचा वेगळा जिल्हा निर्माण करण्यात आला व त्याचे मुख्यालय प्रथम बाणकोट व नंतर रत्नागिरी येथे ठेवण्यात आले. १८३० मध्ये उत्तरेकडील तीन उपविभाग ठाणे जिल्ह्यात वर्ग केले गेले आणि सिंधुदुर्गला एका उपजिल्ह्याचा दर्जा देण्यात आला.१८३२ मध्ये रत्नागिरी नावाने एक नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. ई.स.१९४५ मध्ये कणकवली नावाचे एक नवे महल (तहसील) निर्माण करण्यात आले. तद्नंतर ई.स. १९४९ मध्ये पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानाचे जिल्ह्यात विलीनीकरण करण्यात आले व तालुक्यांच्या सीमा निश्चित करण्यात आल्या. याच वर्षी सावंतवाडी हा स्वतंत्र तालुका निर्माण करण्यात आला तसेच कुडाळ आणि लांजा असे दोन तहसील ठरवण्यात आले. १९५६ मध्ये राज्यांचे पुनर्वसन होत असताना हा जिल्हा मुंबई प्रांतामध्ये समाविष्ट करण्यात आला व १९६० पासून तो महाराष्ट्र राज्याचा एक भाग आहे. या जिल्ह्याला येथील प्रसिद्ध ‘सिंधुदुर्ग’ किल्ल्याचे नाव देण्यात आले आहे.

 सिंधुदुर्ग जिल्हा हा ५,२०७ चौ.किमी. क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या ८,६८,८२५ एवढी आहे. आधुनिकीकरण करण्यात आलेले सिंधुदुर्गनगरी हे शहर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सिंधुदुर्ग हा पूर्वेकडून अरबी समुद्राने, दक्षिणेकडून बेळगाव जिल्हा (कर्नाटक राज्य) आणि गोवा राज्याने तर उत्तरेकडून रत्नागिरी जिल्ह्याने वेढला गेलेला आहे. हा जिल्हा समुद्र किनारी असल्यामुळे येथील हवामान नेहमी उष्ण व दमट असते त्यामुळे तापमानावर बदलत्या ऋतूंचा फारसा परिणाम होत नाही. येथील कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या प्रमुख शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 तसेच कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी येथील रेल्वे स्थानकांवरून येथे पोचता येते. रत्नागिरी, बेळगाव (कर्नाटक) आणि दाभोली (गोवा) ही जवळील विमानतळे आहेत. हा जिल्हा महाराष्ट्रातला सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. पर्यटन, मासेमारी आणि आंबा, फणस, काजू हे या जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय आहेत. या जिल्ह्यात कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात.

 ऐसपैस कौलारू  घर, त्यासमोरील अंगणात असलेलं छानस  तुळशी वृदावन,, घराभोवती असणारी नारळी  पोफळीची झाडं , केळीची बन, अंगणाला शोभा आणणारी विविध फुलझाडे, पक्षाचा कानाला सुखावणारा किलबिलाट, हे कोकणातल्या प्रत्येक  गावात दिसणार रेखीव चित्र. आणि  देवभोळा असलेला मालवणी माणूस   देवळामध्ये रमतो. प्रत्येक गावात वसलेल आहे ते गावाच ग्रामदेवतेचे रेखीव मंदिर,दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या त्याच्या मोठमोठ्या जत्रा, आणि त्या जत्रेची आतुरतेने वाट पाहणारी आपण मंडळी,रात्र दशावताराच्या विविध प्रकारच्या मनोरंजनाने गाजवणारी.  सिंधुदुर्गला लाभलाय ते डोळ्याच पारणं फेड्णार अलोकिक  निसर्गसौंदर्य.     
 सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण, देवगड, कणकवली, वैभववाडी आणि दोडामार्ग अशा ८ तालुक्यांचा समावेश होतो.