कार्तिक स्वामी मंदिर-” हिंदळे “

Spread the love

सतीश पाटणकर

       देवगड-आचरा-मालवण मार्गावर देवगड पासून सुमारे २६ कि.मी. अंतरावर अतिशय निसर्गसंपन्न असे हिंदळे गाव आहे. घनदाट झाडी, आंबा-पोफळीच्या बागा, हिरवेगार डोंगर आणि जवळच खाडी अशा सान्निध्यात् वसलेल्या या गावात बरीच लहान-मोठी मंदिरे आहेत. त्यापैकी कार्तिकीस्वामी हे एक प्रसिध्द पुरातन मंदिर आहे. गावाच्या एका बाजूस नदी, शेजारी मोर्वेवाडी, दुस-या बाजूस नारिंग्रे, तिस-या बाजूस आदिमाया भगवती देवीचे मुणगे येथील मंदिर व चौथ्या बाजूस समुद्र असा चतु:सीमांनी परिवेष्टित असून जवळच हाकेच्या अंतरावर शेतजमिनीत देवगड-आचरा मार्गावर अगदी रस्त्यालगत श्रीदेव कार्तिक स्वामींचं पुरातन मंदिर आहे. देवळापर्यंत उत्तम डांबरी रस्ता आहे.

         श्री देव कार्तिकस्वामी मंदिर हे कौलारू असून डबल माडीचे आहे. गाभाऱ्यात कार्तिकस्वामींची संगमरवरी पूर्णाकृती मूर्ती असून तिची उंची सुमारे तीन फूट असून मोराच्या वाहनावर ती आरूढ झालेली आहे. मूर्तीला पुढे तीन व मागे तीन अशी सहा मुख व सहा हात असलेली षडानन रूपातील असून तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळी आयुधे आहेत. पाठीमागे चार फूट उंचीचा आरसा असल्याने त्यात मागील मुखांचं प्रतिबिंब भाविकांच्या दृष्टीस पडते. मंदिराची रचना तीन भागात असून १० बाय १० फुटांचा गाभारा, ३० बाय ३० फुटांचा मधला चौक व २५ बाय २५ फुटांचे प्रारंभीचा सभागृह मंडप असून एकूण १२ खांबांवर मंदिराचे छत बांधलं आहे. गाभाऱ्याच्या बाहेर डावीकडे गणेशाची सुबक मूर्ती असून उजवीकडे शिवपिंडी आहे. त्याच्या मागील भागी एक पावलाचा ठसा असलेले शिल्प दिसून येते. अन्य मंदिराप्रमाणे येथे मंदिराबाहेर एकही दीपमाळ नाही, हे विशेष!

       मंदिराचे मानकरी देवानंद गोरे यांनी सांगितल्याप्रमाणे, ‘मंदिर सुमारे १५० वर्षापूर्वीचे असून त्याला ब्रिटिश सनद असल्याने दिवाबत्तीसाठी सालाना ११ रुपये शासनाची मदत मिळते. सुमारे २० वर्षापूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे त्यांनी नमूद केले.मंदिराच्या शेजारी श्री विठ्ठल-रखुमाईचे स्वतंत्र मंदिर बांधण्यात आले आहे. त्याचाही अलीकडेच जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिरासमोर तुळशीवृंदावन व निशाणाचा चबुतरा असून रस्त्यालगत जुनाट पिंपळवृक्षाच्या छायेखाली छोटंसं हुनमान मंदिर असून सुमारे ३० बाय ३० फूट सिमेंटचा चौथरा बांधण्यात आला आहे.

      संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्री कार्तिकस्वामींचं हे एकमेव असं मंदिर असल्याने दरवर्षी तिथे त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. कार्तिक महिन्यात कृत्तिका नक्षत्रावर पौर्णिमा असते, तेव्हा श्री देव कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग येतो. कारण अन्य दिवशी या मंदिरात महिलांना प्रवेश नसल्याने महिला व विशेषत: नवदाम्पत्यांनाही एक पर्वणीच असते. इतर दिवशी पुरुष भाविकांना दर्शन घेता येते, परंतु गाभारा बंद असतो. या दिवशी दर्शन घेऊन पूजा केली तर बुद्धी व अर्थवृद्धी होत असल्याची भाविकांची श्रद्धा असल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होण्याच्या आशेने शेजारच्या कर्नाटक व गोवा राज्यांसह जिल्हा-परजिल्हयांतील भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी असते. जेव्हा हा योगकाळ अत्यंत कमी असतो, तेव्हा महिलांनाच विशेष प्राधान्य दिले जाते. स्कंद षष्ठी हा भाद्रपद महिन्यातील योगही महत्त्वाचा मानला जात असला तरी त्याचा योग काळ अत्यंत कमी असतो.

        कार्तिक महिन्यात कृत्तिका नक्षत्रावर पौर्णिमा असते तेव्हा या देवतेच्या दर्शनाचा योग महत्वाचा मानला जातो. त्या दिवशी मुली व स्रियांना दर्शन घेण्याची परवानगी असते. इतर दिवशी नाही. या दिवशी दर्शन व पूजा केली तर बुध्दीमत्तेत वाढ होते आर्थिक स्थिती सुधारते अशी भाविकांची श्रध्दा आहे. स्कंद षष्ठी ही भाद्रपद शुध्द षष्ठी हा योगही महत्वाचा मानला जातो. या मंदिरात दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो.

       जिल्ह्यातील हे एकमेव मंदिर व श्रद्धास्थान असल्याने देवगड, मालवण, कणकवली व राजारापूर येथून हिंदळे येथे सहज जाता येते. येथे राहण्याची व्यवस्था नसल्याने देवगड, कुणकेश्वर, मालवण वा कणकवली येथे आश्रयाला जावे लागते. धार्मिक पर्यटकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.

—————————————————————————————