ऐनारी डोंगरातील लेणी

Spread the love

                

 

        वैभववाडी तालुक्यातील ऐनारी गावात डोंगरामध्ये प्राचिन गुंफा असून त्यामध्ये कोरीव लेणी आहेत. सुमारे १५० वर्षांपूर्वी या गुंफेचा शोध लागला. गुंफा अद्याप दुर्लक्षित असून आत काळोख असल्याने बॅटरी घेऊनच आत जावे लागते.      

    ऐनारी गावातून सह्याद्रीच्या गर्द जंगलात शिरताना वाटेत राकसवाडा मिळतो. हेच बकासुराचे निवासस्थान.. बकासुराने गाडाभर अन्न आणि माणूस पाठविण्याचे दिलेले आदेश आणि त्यानंतर भीमाने त्याची उडवलेली दाणादाण याची आठवण हजारो वर्षानंतरही गाववासीय जपत आहेत. आजही या भागात गाडाभर धान्य बकासुराच्या नावाने दिले जाते. आणि भीमाचा जयजयकार होतो. अलीकडे प्रतिकात्मक गाडा तयार केला जातो. परंतु वर्षातून एकदा ही आठवण जाणीवपूर्वक केली जातेच. राकसवाडय़ापासून काही अंतरावर ब्राह्मणाची राई आहे. या भागात गच्च वृक्षराई वगळता काही नाही; परंतु या भागातून भीमाने गाडी नेली आणि त्या भागात ब्राह्मणाचे घर होते अशी लोककथा गाववासीय उराशी जपून आहेत. इतकी वर्ष सरली तरी बकासुराची भीती आणि भीमाची शक्ती याबाबत ऐनारीवासीय कमालीची आस्था जपत आहेत, हेही नवलच म्हणायला हवे.

       भीमाने बकासुराला कसे मारले याची कथा लहानपणी आम्ही ऐकत असू तेव्हा बकासुर इथे आला तर काय होईल? याच्या नुसत्या कल्पनेने अंगावर शहारे यायचे, भीतीने गाळण उडायची. भीमाने त्याला कसे मारले हे ऐकायला मजा वाटायची. ज्या ठिकाणी भीमाने बकासुराला मारले तो भाग कुठे असेल? ही दंतकथाच असेल असे वाटायचे पण ही कथा आपल्याच भागात घडली आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल..

      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात भुईबावडापासून अगदी जवळ समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर ऐनारी गुहा आहे. या गुहेच्या परिसरात काही वैशिष्टय़पूर्ण खोदकाम करण्यात आले आहे. याला पांडवकालीन असे म्हणण्याचा प्रघात आहे. हजारो वर्षापूर्वीचे अवशेष येथे दिसतात. ऐनारी गावाच्या नावावरून गुहेला नाव ठेवण्यात आले आहे. या ऐनारी गावात गुहेच्या पायथ्याशी राकसवाडा आहे. हाच तो बकासुराचा प्रदेश.. येथे ज्या ठिकाणी भीमाने बकासुराला मारले तो भाग लोककथांमध्ये सांगितला जातो. आज तेथे कोणतेही अवशेष नाहीत मात्र दोघांमध्ये झालेल्या भयंकर झटापटीत त्यांनी एकमेकांवर अजस्त्र वृक्ष फेकले. ते वृक्ष ज्या परिसरातून काढले गेले त्या परिसरात म्हणे आजतागायत मोठे वृक्ष पुन्हा उभे राहिले नाहीत.. पिढय़ान् पिढय़ा येथे बकासुराची आठवण जपली जाते. याला पुरावे नाहीत. मात्र परंपरा आहेत.

         बकासुराला गाडीभर अन्नधान्य लागायचे. एक माणूस खायला हवा असायचा. एके दिवशी या भागातील ब्राह्मणाच्या घराची पाळी आली. त्याच्या घरातील मंडळी रडू लागली. आज घरातील एका माणसाला पाठवावे लागणार याचा त्यांना शोक होता. त्यांचा मोठमोठय़ाने आक्रोश सुरू झाला. या भागात अज्ञातवासाच्या भ्रमंतीत असणा-या पांडवांना हा आक्रोश ऐकू आला. भीमाने आवाजाचा शोध घेतला तेव्हा तो एका झोपडीसमोर पोहोचला. त्याने आक्रोशाचे कारण विचारले आणि बकासुराची हकिगत कळली. आपला एकुलता एक मुलगा आता त्याच्याकडे पाठविण्याची पाळी आहे. त्यामुळे शोक करण्यापलीकडे आमच्या हातात काही नाही असे त्या गरीब बिचा-या ब्राह्मणाने सांगितले. ग्रामस्थांवर कोसळलेले संकट भीमाला समजले, त्याने बकासुरापासून कायमची मुक्ती दिली जाईल, असे सर्वाना अभिवचन दिले. भीमाने ब्राह्मणाला शांत करत तुमच्या मुलाऐवजी आज मी गाडाभर धान्य घेऊन त्याच्या ठरलेल्या ठिकाणी जातो असे सांगितले. बकासुराच्या भेटीला तो गाडी घेऊन गेला. त्याचे अन्न स्वत:च खाऊन टाकले. यामुळे क्रोधीत झालेल्या बकासुराने भीमाला मारहाण केली. यावेळी झालेल्या जंगी कुस्तीत भीमाने बकासुराला ठार मारले. हे ज्या भागात युद्ध झाले तो भाग आजही कुस्ती पठार म्हणून चर्चेत आहे. या दोघांच्या युद्धात हे पठार झाले असावे अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. भीमाने बकासुराचे शव त्याच गाडीत भरून त्याने वेशीवर आणून टाकले. गाववासीयांना बकासुराचे संकट दूर झाल्याची माहिती मिळताच गावाने भीमाचा जयघोष केला, ही कथा तुम्हाला माहीत आहे. या कथेच्या काही पाऊलखुणा आजही ऐनारीत दाखविल्या जातात. बकासुराच्या वाडय़ाचा चौथरा आजही दाखविला जातो. ज्या भागात बकासुराचे भ्रमण असायचे तो भाग आज राकसवाडा म्हणून प्रचलित आहे. या जंगल परिसराला हे नाव कसे पडले, कोणी ठेवले याबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत. या राकसवाडय़ात बकासुराची भीती आजही शेतक-यांना आहे. या जंगल परिसरात दाट झाडीत गुरांना घेऊन कुणी गेले अथवा या परिसरात कुणी फिरायला गेले तरीही सूर्यास्त होण्यापूर्वी घरी मागे फिरावे असा अलिखित नियम ग्रामस्थांनी आजही जपला आहे. या भागात पिढय़ान् पिढय़ा मांडवकर, भोसले, काळके, साईल ही ऐनारी गावातील मंडळी नाचणी-वरीची शेती करतात. सध्या या डोंगरातील  बराच भाग अभयारण्यासाठी वनविभागाने आपल्या ताब्यात घेतला असला तरी या लगत असणा-या खासगी जमिनी राकसवाडय़ाच्या काही क्षेत्रात येतात. बकासुराचा या भागात संचार असायचा. त्याची स्मृती म्हणून दरवर्षी येथील शेतकरी प्रतिकात्मक बैल करून छोटीशी बैलगाडी जुंपतात. त्यावर छोटय़ा छोटय़ा भाताच्या गोण्या आणि शिजवलेला भात ठेवतात. ही बैलगाडी या भागात घेऊन जात हा?भात राकसवाडय़ात फेकला जातो. शेतीला सुरुवात करण्यापूर्वी?ही परंपरा पूर्ण केली जाते.  काही वर्षापर्यंत पिठाचे बाहुले करून बकासुराच्या नावाने ते तोडले जायचे आज ही परंपरा नव्या पिढीने बाजूला केली आहे. या धान्याच्या रूपाने का होईना जंगली पशू-पक्षांना अन्न मिळते हेही विशेष..

      नाचणीची शेती करणारी मंडळीही आता कमी झाली आहेत. परंतु राकसवाडय़ावर वर्षातून एकदा भाताचा प्रतिकात्मक का असेना गाडा नेला जातो. या राकसवाडय़ापासून काही अंतरावर असणा-या ब्राह्मणाच्या राईत पूजा-अर्चा?केली जाते. आणि भीमाच्या नावाने जयघोष होतो.आमची शेती चांगली होऊ दे, त्यावर कोणतेही संकट येऊ नये असे साकडे घातले जाते. राकसवाडय़ात एकटे कुणी फिरत नाही. गर्द जंगलामुळे अनेक श्वापदे येथे भ्रमंती करत असतात याची भीती असतेच. या राकसवाडय़ातूनच पुढे ऐनारीच्या जंगलात शिरावे लागते. अर्जुन कडय़ाला वळसा घालून डुब्याच्या कडय़ावरून सुमारे दीड कि.मी. पूर्वेकडे चालावे. डुब्याचा कडा गाठण्यासाठी दोन कि.मी.ची अवघड वाट पार करण्यासाठी तेवढीच मनाची जिद्द असावी लागते. मग प्राचीन संस्कृतीचा ठेवा असलेली ऐनारीची विशाल गुहा दृष्टीस पडते. या गुहेची कथा विलक्षण आहे. ही पांडवकालीन असावी असा सगळय़ांचाच समज आहे. तशा अनेक लोककथा आहेत. ऐनारीला कुशीत घेतलेला सह्याद्रीत अनेक गुहा आहेत. या  परिसरात सुमारे ९ गुहा आहेत. यातील सात गुहा या कोरलेल्या आहेत. गुहेच्या शेजारी २० फुटांवर वैशिष्टय़पूर्ण अशी विहीर आहे. या परिसरात भीमाची पावले आहेत. अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. या ऐनारीतल्या गुहा सध्या ग्लोबल वॉर्मिगच्या पडछायेखाली आल्या आहेत. झपाटय़ांने या गुहांचे खच्चीकरण होत असून त्या कोसळू लागल्या आहेत. मुख्य ऐनारी गुहेचे सहा खांब गेल्या काही वर्षात कोसळले.

        ही गुहा सह्याद्रीत झाकून गेली होती. ऐनारीच्या ग्रामस्थांनी एकत्र होत श्रमदानाने गुहेच्या प्रवेशद्वारावरची माती मोठय़ा कष्टाने बाजूला करत गुंफेचे तोंड खुले केले.काही वर्षापूर्वी येथे भुईबावडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिक्षक असलेले पी. एन बगाडे आपल्या मित्रांबरोबर या परिसरात शिकारीसाठी गेले होते. त्यांच्या सोबत बाळा सुर्वे आणि अन्य मंडळी होती. साळींदराचा पाठलाग करताना ते साळींदर एका गुहेत शिरले. ते किती खोल असावे याचा अंदाज येत नव्हता म्हणून त्यांनी काठी घातली. तर काठीचाही ठाव लागेना. म्हणून बगाडे अन्य सहका-यांच्या मदतीने आत शिरले तर आत मोठा वाडाच असल्याचे त्यांना दिसले. यानंतर मोठी चर्चा झाली. अनेकांची उत्सुकता वाढली. ऐनारीची गुहा प्रसिद्धीला आली. यानंतर अनेक इतिहास संशोधकांनी या भागाची पाहणी केली. सुमारे आठ हजार वर्षापूर्वीची ही गुहा असावी असा कयास काहींचा आहे. गेल्या वर्षी या गुहेचे तोंड ऐनारीवासीयांनी मोकळे केले. पूर्वी प्रकाशाची सोय करून एकटा माणूस जेमतेम आत शिरायचा मग अंतर्गृहात प्रवेश करायचा. आता गुहेच्या तोंडावरची माती बाजूला केल्यानंतर गुंफेची विशालता दृष्टीस पडते आहे.

          गुहेचे अंतर्गृह वैशिष्टय़पूर्ण आहे. आत शयनगृह आहेत. पाण्याची कुंडे आहेत. १२ खांबांचे सभागृह आहे. शेजारी ६ शयनगृह बरोबर समोर गर्भगृह, त्याच्या शेजारी आणखी एक छोटीशी जागा. प्रत्येक  खांब १२ ते १४ फूट उंचीचा. प्रत्येक खांबामध्ये १० फुटांचे अंतर आणि खांबाचा व्यास दोन फूट अशी रचना आज दृष्टीस पडते. ही गुहा गेली काही वर्षे बुजली गेली. आता खांबाची उंची १२ फूट मिळते; परंतु अंतर्गृहात हीच उंची १४ फूट मिळते. शयनगृहात दगडी पलंग आहेत. शेजारी पाण्याची कुंडे आहेत. अंतर्गृहात प्रकाशाची व्यवस्था कुठे दिसत नाही. परंतु गुहेपासून २० फुटांवर पाण्याची विहीर आहे. कडय़ाला उभा छेद मारून खोदण्यात आलेल्या विहिरींच्या काटकोनात थेट भुयार काढण्यात आले आहे. या भुयारांचे एक टोक गुहेत संपते. याच मार्गाने वातानुकूलित व्यवस्थापन करण्यात आले होते हे स्पष्ट होते. अर्धा डोंगर डोक्यावर घेऊन हजारो वर्षापूर्वी खोदलेली ही गुहा पांडवांची आहे असा एक समज आहे. गुहेपासून हाकेच्या अंतरावर मोठी शिळा आहे. पांडवांनी गुहेचे काम सुरू असताना पहाट होण्यापूर्वी आपल्याला सांगावा धाडावा असे एकाला सांगून त्याची रवानगी टेकडीवर केली होती. मात्र पहाट झाली तरी तो तेथेच झोपून राहिला म्हणून क्रोधीत होऊन भीमाने त्या टेहेळणीसाठी ठेवलेल्या माणसाची मान धडावेगळी केली. त्याचीच ती शिळा अशी आख्यायिका आहे.

————————————————————————————–

या गुहेपासून २ कि.मी.वर वेसरप गावाची हद्द सुरू होते. येथे एका डोहाला भीमाचे नाव देण्यात आलेले आहे. शेजारच्या अर्जुन कडय़ावर अशीच गुंफा दिसते. सध्या या गुंफांमधून प्राणी आणि वटवाघळांचा मुक्त संचार आहे. गगनगड या भागापासून ६ कि.मी. अंतरावर आहे. या गुहेच्या उत्तरेकडे ही गुंफा आहे. या परिसरात अनेक छोटय़ा-मोठय़ा गुहा आहेत. एक प्राचीन खजिना या परिसरात जपला गेला आहे. राकसवाडा म्हणून जपल्या गेलेल्या प्रदेशात अनेक वनौषधींचा खजिनाच जपला गेला आहे. या भागातील जंगलात अनेक विषारी वेली आहेत. या वेलीने झालेली जखम सहसा पटकन बरी होत नाही.. म्हणूनच आजही परिसरातील लोक बकासुराच्या जंगलात पाऊल ठेवायला घाबरतात..

ऐनारीला कसे जावे..

मुंबई-गोवा महामार्गावरून भुईबावडा घाटातून चार कि. मी. आत ऐनारी गाव आहे. या गावापासून सह्याद्रीत जाणारी पायवाट आहे. ही पायवाट थेट ऐनारीकडे पोहोचते. समुद्र सपाटीपासून १५०० मीटर उंचीवर असणा-या या गुहेकडे जाण्यासाठी सध्या असणारी पायवाट प्रचंड बिकट आहे. तरीही आपल्या गावातील गुहा बघायला बाहेरचे कुणी आले आहे असे समजल्यावर येथील ग्रामस्थ मोठय़ा आनंदाने गुहा दाखवायला आणि त्यांना सर्वतोपरी मदत करायला पुढे असतात.

ऐनारीच्या कुशीत आश्चर्य

ऐनारी गावात राकसवाडापासून अलीकडच्या भागात काही ग्रामस्थांनी घरे बांधली आहेत. या घरांसाठी खोदकाम करताना काही अंतरावर प्राचीन साहित्य मिळाल्याचे गावकरी सांगतात. मात्र या परिसराच्या उत्खननाच्या भीतीमुळे कुणी वाच्यता केली नाही. यामुळे या भागात निश्चितच काही गूढ जपले गेले आहेत. त्याची उकल झाल्यास एक नवे आश्चर्य उलगडेल.

तिलारी धरण:

तिलारी धरण हा प्रकल्प येथे साकारल्याने येथील निसर्गनिर्मित सौंदर्यात आणखीनच भर पडल्याने येथे येणारा पर्यटक स्थिरावल्याशिवाय राहणार नाही. येथील उन्नेयी बंधारा व नागनाथ मंदिर दिलखेचक आहे. तर पारगड किल्ला ऐतिहासिक ठेव आहे. सिंधुदुर्गातील पर्यटनस्थळांचा विकास होण्याच्या दृष्टीने शासन पातळीवरून आराखडे तयार होत असून निधीचाही विचार होत आहे.

धामापूर तलाव :

धामापूरच्या भगवती मंदिरासोबत एकदा उल्लेख केलेला असताना धामापूर तलावाचा पुन्हा वेगळा उल्लेख केल्याने पर्यटक वाचकांना कदाचित नवल वाटेल. परंतु, हा तलाव विशेष उल्लेखास पात्र असा अव्दितिय तलाव आहे. हा जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव आहे.

हा मानव निर्मित तलाव १५३० साली राजा नागेश देसाई याने बांधला असून त्याच्या दोन्ही बाजुंना सुंदर पर्वतरांगा आहेत. यातील पाणी अगदी नितळ असून शेजारी आंबे, नारळ, पोफळीची दाट झाडे आहेत. ही कोकण भागातील प्रसिद्ध फळझाडे आहेत. जंगल आणि बागायतीने वेढलेला असल्यामुळे हा तलाव महाराष्ट्रातील सर्वात सुंदर तलाव झाला आहे. एकदा या ठिकाणी आल्यावर पर्यटकांना वातावरणात झालेला बदल सहज जाणवू शकेल. या भागात जैवविविधताही भरपूर आहे.

मांगेली पर्यटन स्थळ

दोडामार्ग वरून मांगेली धबधबा अवघ्या काही अंतरावर वसलेले गाव आहे . धबधब्याला जाण्याचा मार्ग दोडामार्ग , भेडशी ..खोक्रल .. मांगेली असा जाणारा एक रस्ता आहे. तर दुसरा झरेबांबर ..खोक्रल ..मांगेली अशा प्रकारे दोन रस्ते आहेत. जाताना रत्याच्या दोन्ही बाजूला नाचणीची शेती बघायला मिळते. तळेवाडी गावात हायस्कूलच्या पाठीमागे एक लहानसा धबधबा वाहतो . तीथुन पुढं गेल्यावर गावात कीतीतरी वर्षा पासून उभं असलेलं वडाचे झाड बघताना डोळे दिपून जातात.पुढचा मार्ग हा गावातुन धबधब्याला जातो . धबधबा पाण्याने फेसाळलेला पांढरा शुभ्र दिसतो . पर्यटक गोवा, कर्नाटक, कोल्हापूर , सिंधुदुर्ग इथुन पर्यटक विक एण्डं म्हणुन येतात . इथे हवामान थंड धुक्यात हरवलेलं वातावरण . पर्यटक इथे चांगल्याप्रकारे आनंद लुटतात . तुम्ही पण जरुर एकदा तरी प्रत्यक्षात भेट द्या.