देवराई हा जंगलाचा समृद्ध असा भाग किंवा वेगळे असे एक जंगल होय. देवराई नावाचा अर्थ देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन. इंग्रजी भाषेत याला (Sacred grove) सेक्रेड ग्रोव्ह म्हणतात. सहसा, अशी अरण्ये सरकारच्या वनखात्याने सांभाळलेली नसून परंपरेने समाजाने सांभाळलेली असतात. अशा वनांना अनेकदा शरणवन, अभयारण्य किंवा अभयस्थान असेही म्हटले जाते. देवराया जशा भारतभर विखुरलेल्या आहेत तशा त्या भारताबाहेरही आहेत. काही भागांत देवरायांना ‘चर्च फॉरेस्ट’ असेही म्हटले जाते.
इतिहास
देवराईचे मूळ वैदिक संस्कृतीपासून सुरू झाल्याचे दिसून येते. देवराई या संकल्पनेचा उगम कसा झाला याविषयी अनेक मतप्रवाह आहेत. या संकल्पनेचा मूळ गाभा श्रद्धा या विषयावर बेतला असल्याने, तोच मूळ उद्देश असावा असे अनेक जाणकार मानतात. अश्मयुगीन काळात जेव्हा शेतीसाठी जंगलतोड सुरू झाली तेव्हा जंगलाचे महत्त्व देखील लक्षात आले असावे. त्यातून मानवाच्या देवावरील श्रद्धायुक्त भीतीचा योग्य वापर जंगलाच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी केला गेला.
पर्यावरण आणि जैव विविधता हे शब्द जरी आज आले असले तरीही त्यांच्या संवर्धनाची व संरक्षणाची ची सोय आपल्या पूर्वजांनी फार पूर्वीपासूनच करून ठेवली हीच होती देव राहील एखादं छोटसं दगडी बांधकामाचे देऊळ किंवा कमरेत वाकलेले या झाडाखालचा एक चौथरा आणि उघड्या वर बसलेला तो देव मग तो म्हसोबा, भुतोबा, चाळोबा, वेताळबा, अथवा नावलाई, घाटजाई, वाघजाई, जननी-माता सारखी देवी आणि आसपासच्या परिसरातील एखाद्या वाळवंटातील मरुस्थळ सारखा हिरव्यागार पाचूचा झाडोरा म्हणजेच देवराई
देवराईतील देवता
देवराई म्हणजे एक समृद्ध असा जंगलाचा तुकडा. देवराई ही एक परिपूर्ण परिसंस्था असते असे मानण्यास काही अडचण नाही. या सर्व वन-राज्यावर देखरेख करणारी एक सामर्थ्यशाली देवता देवराईत असते. ही शक्तिमान देवता बहुतेक तांदळा म्हणजे निराकार पाषाणाची असते. ५० ते ६० टक्के या देवता मातृदेवता असतात. त्या काही ठिकाणी एकेकट्या तर काही ठिकाणी समूहाने असतात. डॉ. धर्मानंंद कोसंंबी यांनी नमूद केल्याप्रमाणे या मातृदेवतांचे वैशिष्ट्य म्हणजे या देवतांपैकी कुणालाही पुरुषसहचर नाही. शिरकाई, वरदाई अशी यांची नावे असतात. पुरुष देवता जेथे आहेत तेथे त्यांची नावे चेलोबा, म्हसोबा, बाजीबुवा, भैरोबा अशी दिसून येतात.
पर्यावरणीय महत्त्व
देवाच्या नावाने राखून ठेवले असल्याने या वनाला वृक्षतोडीपासून एकप्रकारचे संरक्षण कवच असते. भारताच्या केवळ पश्चिम घाटासह संपूर्ण भारतात दाट जंगलांचे हे पुंजके आढळतात.
जगभरातही अशा प्रकारची वने आहेत. ही वने अत्यंत निबिड असतात. देवराईमध्ये उंचउंच वृक्ष, जाडजाड खोडे असलेल्या व कधीकधी जमिनीवर पसरलेल्या महालता, पाऊल बुडेल असा पाचोळ्याचा थर, त्यातून धावणारे नानाविध प्राणी, मधूनच दिसणारे विविध पक्षिगण आणि प्राणी आढळू शकतात. देवराईतील पाण्याचा बारमाही झऱ्यांचा उपयोग आजूबाजूच्या वाड्यावस्त्यांसाठी, गुराढोरांनाही होतो. या देवराया अनेक औषधी वनस्पतींचे भांडार असतात.
वनस्पतिशास्त्राच्या विद्यार्थ्यांना देवराई या विषयावर अभ्यास करण्यासाठी वाव आहे. या देवरायांत विविध प्रकारची शैवाले, भूछत्रे, कवकवर्गी नेच्यांचे अनेकविध नमुने, ओंबळसारखी अनावृत्तबीजी महावेल, आणि अनेक पुष्पवंत वनस्पती, झाडाच्या फांद्यांवर वाढणारी सुगंधी ऑर्किड्स असू शकतात. सर्वेक्षणांनुसार प्राण्यांच्या अनेक दुर्मिळ, नष्ट होत असलेल्या प्रजाती, धोक्याच्या पातळीवर असलेल्या प्रजाती फक्त देवरायात आढळतात. उदा. उत्तर कन्नड जिल्ह्यातील देवरायात असणारे सिंहपूछ वानराचे अस्तित्व.
देवराई म्हणजे नुसते देवाचे ठिकाण किंवा जंगल न्हवते, तर गावाची समृद्धी, संस्कार, परंपरा, व एकोपा याच देवरांनी जपलेला आहे देवराईतील झाडामुळे गारवा तर मिळतोच पण इथल्या वनस्पतींचे जमिनीवरील आच्छादन जमिनीची धूप थांबते या झाडावर यामुळे जमिनीची पाणी धारण क्षमता चांगली राहते आजही एंटडा अश्वगंधा शतावरी सारख्या दुर्मिळ औषधी वनस्पती या देवराईत सहज मिळतात याच देवराईत मोठाल्या वृक्षात आपले घरटे करणारे मलबारी धनेश सारखे पक्षी देखील आढळतात गुळवेल हिरडा अर्जुन शतावरी सारख्या वनस्पती मिळतात तर वेगवेगळी उघडे धनेश इत्यादी पक्षी पाहायला मिळतात या देवराईत महाकाय गारबी पिठगुलीच्या वेली लोम्बकळताना दिसतात अनेक दुर्मिळ वनस्पतींची रोपे आणि उत्तम प्रतीच्या बियांचा खजिना या देवराईत सापडतो त्याबरोबरच शुद्ध प्राणवायू हा देखील मिळतो. (देवराई -धडा एकपर्यावरणाचा २०१२,उमाकांत चव्हाण)
देवराईचे कार्य
देवरायांच्या अनेकविध कार्यांपैकी वन्य पशु-पक्ष्यांना आसरा देणे,त्यांचे अधिवास म्हणून काम करणे हे एक अत्यंत मूलभूत कार्य आहे.एखाद्या देवराईची प्राणी विविधता किती संपन्न असते हे पुढील घटकांवर अवलंबून असते.त्यातील काही प्रमुख घटक:[२१]
१. देवराईचे भौगोलिक स्थान
२. देवराईचा आकार
३.वनस्पतींची विविधता
४.पंचक्रोशीतील वनांची अवस्था
५.सद्यस्थिती व मानवी हस्तक्षेप
रक्षणाचे प्रयत्न
शहरीकरणाची लाट खेड्यापाड्यापर्यंत पोचली त्यामुळे देवराई ही संकल्पना हळूहळू काळाच्या ओघात धोक्यात आली आहे.[२२] मात्र १९९२ च्या ‘वसुंधरा परिषदे‘ने ‘निसर्ग वाचवा’ अशा धोरणाला अनुसरून जैव विविधता टिकवण्यासाठी, भारतीय उपखंडात दोन मर्मस्थळे ‘हॉट स्पॉट्स‘ म्हणून घोषित केलीत. पैकी एक ईशान्य हिमालय [२३] आणि दुसरा पश्चिम घाट. हे दोन्हीही पर्जन्यवनांचे प्रदेश आहेत.
ओळख
१. देवरायांचा उदय, त्यांचे अस्तित्व व संवर्धन याला परंपरा आहे. प्रत्येक देवराईच्या काही विशिष्ट श्रद्धा, संकेत आणि परंपरा आहेत. हजारो वृक्ष आणि त्याच्या शेकडो प्रजातीनी मिळून देवराया बनल्या आहेत. त्यामुळे देऊळ बांधून त्याच्या आजूबाजूला १०-१२ झाडे लावली की त्याला देवराई म्हणता येणार नाही. देवराईचे क्षेत्र केवढे असावे याला बंधन नाही; मात्र संबंधित गावाशी नाळ त्या क्षेत्राशी जोडलेली असली पाहिजे, असे किमान बंधन आहे. त्याचे संवर्धन करण्याचे काम गावकरी करत असले पाहिजेत.
२. वन विभागाने पाश्चात्य झाडे लावून वाढवलेल्या जंगलास देवराई म्हणता येणार नाही.
३. कोणीही देवराईतील झाडाची फांदीही तोडत नाहीत. सुकलेल्या झाडाची काटकीही घरी घेऊन जात नाहीत. झाडावरचे किंवा झाडावरून खाली पडलेले फूलही देवाला वाहत नाहीत. देवराईत चप्पल घालून जायचे नाही. असे संकेत पाळले जात असतील तरच त्या जंगलाला “देवराई’’ म्हणायचे.